वेदांतनगरमधील भगवान श्रीदत्तात्रेय जन्मोत्सव सोहळा उत्साहात संपन्न - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Wednesday, December 30, 2020

वेदांतनगरमधील भगवान श्रीदत्तात्रेय जन्मोत्सव सोहळा उत्साहात संपन्न

 वेदांतनगरमधील भगवान श्रीदत्तात्रेय जन्मोत्सव सोहळा उत्साहात संपन्न

नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः येथील वेदांतनगरमधील श्रीदत्तक्षेत्रमध्ये भगवान श्रीदत्तात्रेय जन्मोत्सव सोहळा शासकीय निर्देशांचे तंतोतंत पालन करत मोठ्या श्रध्देने व उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. श्री दत्त देवस्थान ट्रस्टने या सोहळ्याची जय्यत तयारी केली होती.
    पहाटे 5 वाजता पंचसुक्त पवमान पठणाने व रूद्रावर्तनाने भगवान श्रीदत्तात्रेयांच्या मूर्तीला 111 लिटर दुधाचा अभिषेक करण्यात आला. या सोहळ्याचे पौरोहित्य देवस्थानच्या पुजारी वृंदांनी केले. सकाळी 11.30 ते 12 यावेळेत वेदमंत्रांच्या घोषात जन्मोत्सव महापूजा झाली. श्रीक्षेत्र गाणगापूर येथील प्रथेप्रमाणे दुपारी 12 वाजता शंखध्वनीच्या निनादात भगवान श्रीदत्तात्रेय जन्मोत्सव सोहळा झाला. उपस्थितांनी दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा असा गजर केला. भगवान श्रीदत्तात्रेयांची बालमूर्ती फुलांनी सजवलेल्या पाळण्यामध्ये विराजमान करण्यात आली होती. महाआरतीत देवस्थानचे विश्वस्त सचिव संजय क्षीरसागर, विश्वस्त देवराज काशीकर, दिनेश पटवर्धन, प्रदिप जोशी, तुषार कर्णिक आणि कर्मचारी वृंद सहभागी झाले होते.
सर्व भक्तांच्या कल्याणासाठी देवस्थानच्या यज्ञशाळेत बुधवार दि.23 डिसेंबर 2019 पासून सुरू असलेल्या श्रीदत्तयाग सोहळ्याची विधीवत सांगता सकाळी 11 वाजता पूर्णाहुतीने करण्यात आली. देवस्थानचे माजी विश्वस्त श्री. विलास देशपांडे यांनी श्रीदत्तयाग सोहळ्याचे यजमानपद भूषविले. वेदमूर्ती श्री.संदिप टेंगसे (गोवा) यांनी पौरोहित्य केले. त्यांना 12 वेदमूर्तींनी सहाय्य केले.
भगवान श्रीदत्तात्रेय जन्मोत्सव सोहळ्यानिमित्त श्रीदत्तक्षेत्रचा संपूर्ण परिसर केळीच्या खुंटांनी, आंब्याच्या पानांच्या व फुलांच्या तोरणांनी, आकर्षक रांगोळ्यांनी आणि रंगीबेरंगी फुलांच्या सजावटीने सुशोभित करण्यात आला होता. विद्युत दिव्यांची आकर्षक रोषणाईही करण्यात आली होती. भगवान श्रीदत्तात्रेयांच्या मंदिरातील गर्भगृह व प.पू.श्री.रामकृष्ण क्षीरसागर महाराजांचे अधिष्ठान अनेकविध फुलांनी आकर्षकरित्या सजवले होते.
   प.पू.श्री.रामकृष्ण क्षीरसागर महाराजांनी घालून दिलेल्या प्रथेप्रमाणे वेदांत विद्यापीठमधील सर्व विद्यार्थ्यांना श्रीदत्तात्रेय जन्मोत्सवाच्या पूर्वसंध्येला नवीन वस्त्रे देण्यात येतात. त्याप्रमाणे सोमवार दि.28  डिसेंबर 2020 ला देवस्थानचे विश्वस्त सचिव संजय क्षीरसागर, विश्वस्त सर्वश्री देवराज काशीकर, दिनेश पटवर्धन, प्रदिप जोशी व तुषार कर्णिक या उपस्थित विश्वस्तांच्या हस्ते श्रीमहालक्ष्मी मंडपामध्ये धोतर आणि उपरण्यांचे वाटप करण्यात आले.
प.पू.श्री.रामकृष्ण क्षीरसागर महाराजांच्या अधिष्ठानमध्ये दुपारी 3 ते 4.30 या वेळेत सत्संग मंडळांतर्फे गुरूजींमार्फत संकल्पाने पादुकांची पूजा करण्यात आली. पाद्यपूजा सोहळ्यात अमेरिकेसह 13 सत्संग मंडळे सहभागी झाली होती. वेदांत विद्यापीठाचे अध्यापक, विद्यार्थी आणि विश्वस्त मंडळाचे सचिव श्री.संजय क्षीरसागर, विश्वस्त सर्वश्री देवराज काशीकर, दिनेश पटवर्धन, प्रदिप जोशी व तुषार कर्णिक यांनीही पाद्यपूजा केली. पाद्यपूजा सोहळ्याचे सूत्रसंचलन वेदमूर्ती श्री. राजाराम धर्माधिकारी यांनी केले. प.पू.श्री.रामकृष्ण क्षीरसागर महाराजांच्या आशीर्वादाची ध्वनिफीत ऐकविण्यात आली. आरती व पसायदानाने पाद्यपूजा सोहळ्याची सांगता करण्यात आली. सायंकाळी 7 वाजता आरती व पदे झाल्यावर पालखी सोहळा सुरू झाला. भगवान श्रीदत्तात्रेय मंदिराच्या सभामंडपातच फुलांच्या पायघड्या घालण्यात आल्या होत्या. वेदांत विद्यापीठमधील उपस्थित विद्यार्थ्यांनी वेदपठण केले. नेहमीप्रमाणे श्रीदत्तक्षेत्रमध्ये पालखी सोहळा न होता यावेळी तो मंदिरातच पुजार्‍यांच्या उपस्थितीत पार पडला. फटाक्यांची नयनरम्य आतषबाजीही करण्यात आली. अत्यंत भक्तीपूर्ण वातावरणात श्रीदत्तक्षेत्रमध्ये भगवान श्रीदत्तात्रेय जन्मोत्सव सोहळा साजरा झाला.

No comments:

Post a Comment