माझ्यासारख्या फकिराला दिलेले वचन सरकारने पाळले नाही.. आता जगण्याची इच्छा राहिली नाही- अण्णा हजारे! - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Tuesday, December 22, 2020

माझ्यासारख्या फकिराला दिलेले वचन सरकारने पाळले नाही.. आता जगण्याची इच्छा राहिली नाही- अण्णा हजारे!

 माझ्यासारख्या फकिराला दिलेले वचन सरकारने पाळले नाही..

आता जगण्याची इच्छा राहिली नाही- अण्णा हजारे!
भाजपा नेते
राळेगणसिद्धीत...
कायदे हिताचे असल्याची
दिली ग्वाही

नगरी दवंडी/प्रिंतनिधी

अहमदनगर ः गेल्या आठवड्यात केंद्रीय कृषी मंत्र्यांना शेतकर्यांच्या प्रलंबित प्रश्नांसंबंधी पत्र लिहून आंदोलनाचा इशारा दिला होता. 23 मार्च 2018 रोजी दिल्ली येथील रामलिला मैदान आणि 30 जानेवारी 2019 रोजी राळेगणसिद्धी येथे केलेल्या आंदोलनाच्या वेळी पंतप्रधान कार्यालय आणि केंद्रीय कृषी मंत्री यांनी लेखी आश्वासन दिले होते. पण दोन वर्षात या आश्वासनाचे पालन झाले नाही .सरकारने दिलेले लेखी आश्वासन हे वचन आहे. 45 वर्षे मंदिरात राहणार्या एका फकिराला दिलेले वचन सरकारला पाळता येत नसेल तर सामान्य जनतेचे काय? असा प्रश्न जेष्ठ समाजसेवक आण्णा हजारे यांनी यावेळी उपस्थित केला आहे.
ज्येष्ठ समाजसेवक अण्णासाहेब हजारे यांनी शेतकरी प्रश्नावर आंदोलनाचा इशारा दिल्यानंतर भाजपा प्रणित केंद्र सरकारच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. आज भाजपाचे ज्येष्ठ नेते विधानसभेचे माजी सभापती आ. हरिभाऊ बागडे व राज्यसभेचे खासदार डॉ. भागवत कराड यांनी राळेगणसिद्धी येथे अण्णांची भेट घेऊन चर्चा केली. अण्णांनी उपोषणाचा निर्णय घेऊ नये अशी विनंती त्यांनी यावेळी केली. यावेळी नगर जिल्हा भाजपाचे माजी जिल्हाध्यक्ष भानुदास बेरड, जिल्हा सरचिटणीस सुनिल थोरात हे उपस्थित होते.
सरकारने दिलेल्या लेखी आश्वासनानुसार केंद्रीय कृषी मूल्य आयोगाला संपूर्ण स्वायत्तता व स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशीनुसार शेतीमालाला सी2 अधिक 50 टक्के हमीभाव यासंबंधी निर्णय घेऊन अंमलबजावणी केली तर शेतकर्यांना आंदोलन करावेच लागणार नाही, असेही अण्णांनी सांगीतले. या दोन्ही महत्त्वपूर्ण मुद्द्यांवर केंद्र सरकारने लिखित वचन दिले होते. पण त्याचे पालन होत नसल्याने अशा राज्यात आता जगण्याची इच्छा राहिली नाही असा उद्विग्न इशाराही हजारे यांनी दिला.
अण्णांनी केलेल्या मागण्या शेतकरी हिताच्या असून त्यासंबंधी चर्चेतून योग्य मार्ग काढण्यात येईल. अण्णांचे वय पाहता त्यांनी आता उपोषणाचा मार्ग अवलंबून नये असा आग्रह भाजपा नेत्यांनी अण्णांना केला.आमदार बागडे आणि खासदार डॉ. भागवत कराड यांनी यावेळी अण्णांना सुधारित कृषी कायद्याची मराठी आवृत्ती दिली. हे कायदे शेतकर्यांच्या हिताचे असून लवकरच देशातील शेतकर्यांचे हित झाल्याचे पहायला मिळेल असे भाजप नेत्यांनी सांगीतले.

No comments:

Post a Comment