आता पहाटे नाहीतर, योग्य वेळीच शपथ दिसेल! - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Monday, November 23, 2020

आता पहाटे नाहीतर, योग्य वेळीच शपथ दिसेल!

 आता पहाटे नाहीतर, योग्य वेळीच शपथ दिसेल!

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसाचं सूचक विधान...


औरंगाबाद ः
भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी गेल्यावर्षी आजच्या दिवशी सरकार स्थापन केलं होतं. त्यावरून सोशल मीडियावर दोन्ही नेत्यांची खिल्ली उडवली जात आहे. त्यावर देवेंद्र फडणवीस यांनी सूचक विधान केलं आहे. आता पहाटे नाही तर योग्य वेळीच शपथ दिसेल, असं विधान फडणवीस यांनी केल्याने पुन्हा एकदा तर्कवितर्कांना उधाण आलं आहे.  औरंगाबादमध्ये प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना देवेंद्र फडणवीस यांनी हे सूचक विधान केलं आहे. ठाकरे सरकार हे बेईमानी करून आलेलं सरकार आहे. हे सरकार किती काळ टिकेल हे माहीत नाही. यावर आता बोलणं योग्य नाही. मात्र, या पुढे पहाटे शपथ घेणार नाही. योग्य वेळी शपथ घेतली जाईल, असं सूचक विधान करतानाच अशा गोष्टी आठवणीत ठेवायच्या नसतात, असं ते म्हणाले. तसेच ज्या दिवशी सरकार पडेल त्या दिवशी राज्यात दुसरं सरकार देऊ, असं विधानही त्यांनी केलं आहे.
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्री तर अजित पवार यांना उपमुख्यमंत्रीपदाची शपथ दिली. पण फडणवीस आणि अजितदादांची खेळी फार काळ टिकाव धरु शकली नाही आणि त्यांची ही सत्ता अल्पजीवी ठरली. भाजपला बहुमतासाठी 40 आमदारांची गरज होती. भाजपचे 105, अन्य छोटे पक्ष आणि अपक्ष असे 15 आणि अजित पवारांसोबत राष्ट्रवादीचे 38 आमदार असा बहुमताचा आकडा पार करता येईल, अशी फडणवीसांना आशा होती.
मात्र ती केवळ आशाच राहिली. कारण, राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी अजित पवार यांच्यासह त्यांच्यासोबत गेलेल्या काही आमदारांचं बंड मोडून काढलं आणि पवार यांनी शिवसेना आणि काँग्रेससोबत नवी मोट बांधली. त्यामुळे 23 नोव्हेंबरला पहाटे झालेल्या शपथविधीनंतरचं फडणवीसांचं मुख्यमंत्रीपद अल्पजीवी ठरलं. त्यांना अवघ्या 80 तासांत मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला.
कालच भाजपचे नेते आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुका झाल्यानंतर राज्यात सत्ताबदल होईल, असं विधान केलं होतं. त्यानंतर फडणवीस यांनी आज हे सूचक विधान केल्याने पुन्हा एकदा राज्यातील सत्ताबदलाच्या चर्चांनी जोर धरला आहे. त्याआधीही दिवाळीनंतर राज्यात शंभर टक्के ऑपरेशन लोटस होणार असल्याचा दावा करून भाजप नेते नारायण राणे यांनी खळबळ उडवून दिली होती. भाजपच्या महत्त्वाच्या नेत्यांकडूनच सत्ताबदलाचे संकेत दिले जात असल्याने राज्यात आगामी काळात मोठ्या घडामोडी घडणार असल्याचं बोललं जात आहे. दरम्यान, कराची बेकरीच्या मुद्द्यावरून फडणवीस यांनी शिवसेनेला सुनावले आहे. कराची बेकरी बाबत त्यांनी त्यांच्या लोकांना सांगावं. आम्ही अखंड भारतावर विश्वास ठेवतो. कराची पुन्हा भारताचा भाग होईल याबाबत आम्हाला विश्वास आहे, असं ते म्हणाले. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पंतप्रधानांवर वाचलेली कविता पाहता, अश्या लोकांनी बोलू नये, असा टोला त्यांनी लगावला. राज्यातील काही कोविड सेंटर बंद असतील. पण वेळ आली तर हे कोविड सेंटर पुन्हा सुरू करता आलं पाहिजे, असं ते म्हणाले. यावेळी त्यांनी भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्या नाराजीचं वृत्त फेटाळून लावलं. ज्या दिवशी माध्यमांकडे बातम्या नसतात, त्या दिवशी पंकजा मुंडे नाराज असल्याच्या बातम्या दाखवल्या जातात, असं ते म्हणाले.

No comments:

Post a Comment