बोल्हेगाव रस्ता दुरावस्थेची मुख्यमंत्री कार्यालयाकडून दखल - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Thursday, September 17, 2020

बोल्हेगाव रस्ता दुरावस्थेची मुख्यमंत्री कार्यालयाकडून दखल

 बोल्हेगाव रस्ता दुरावस्थेची मुख्यमंत्री कार्यालयाकडून दखल

शिवसेनेचे अक्षय कातोरे यांच्या पाठपुराव्यास यश


नगरी दवंडी/प्रतिनिधी
अहमदनगर ः बोल्हेगाव येथील प्रभाग क्रमांक 7 मधील गणेश चौक ते बोल्हेगाव गावठाण रस्त्याची मोठी दुरावस्था झाली असून, तातडीने रस्ता दुरुस्ती करण्याची मागणी शिवसेनेचे अक्षय कातोरे यांनी केले आहे. सदर प्रश्नी महापालिकेत पाठपुरावा करुन देखील प्रश्न मार्गी लागत नसल्याने मुख्यमंत्री कार्यालयास निवेदन पाठविण्यात आले होते. सदर निवेदनाची मुख्यमंत्री कार्यालयाकडून दखल घेण्यात आली असून, याबाबत कार्यवाहीसाठी मुख्यमंत्री कार्यालयाने सार्वजनिक बांधकाम विभागास कळविले आहे.प्रभाग क्रमांक 7 मधील गणेश चौक ते बोल्हेगाव गावठाण रस्ता 2009 साली 11 वर्षापुर्वी करण्यात आला होता. यानंतर या रस्त्याचे कोणत्याही प्रकारचे काम झाले नाही. पावसामुळे रस्त्याची अत्यंत दुरावस्था झाली असून, यामुळे स्थानिक नागरिक त्रस्त झाले आहेत. नागरिकांनी अनेक वेळा नगरसेवकाच्या माध्यमातून महापालिकेला सदर प्रश्न मार्गी लावण्याचे सांगितले. परंतु महापालिकेचे कोणताही अधिकारी किंवा महापौर या भागात फिरकले नाहीत. तर महापालिकेत निवेदन देऊन देखील त्याची दखल घेण्यात आलेली नाही.रस्त्यावर प्रचंड प्रमाणात खड्डे पडले असून, त्यामध्ये पाणी साचले आहे. या खड्डेमय रस्त्यामुळे दररोज लहान-मोठे अपघात घडत आहेत. नागरिकांना जीव मुठीत धरुन या रस्त्याने जावे लागत आहे. रस्ता खराब झाल्याने स्थानिक व्यवसायिकांच्या व्यवसायावर देखील परिणाम झाला आहे. तर रात्री या रस्त्यावर असलेले पथदिवे बंद असल्याने नागरिक रस्त्याच्या खड्ड्यात पडत आहे. सदर रस्त्याची तातडीने दुरुस्ती होण्याबाबत शिवसेनेचे अक्षय कातोरे यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना निवेदन पाठविले होते. नुकताच मुख्यमंत्री कार्यालयाकडून कातोरे यांना सदर प्रश्नी कार्यवाहीसाठी मुख्यमंत्री कार्यालयाने सार्वजनिक बांधकाम विभागास कळविले असल्याचे मेल पाठविले आहे. एका प्रभागातील छोट्या रस्त्याची मुख्यमंत्र्यांनी दखल घेतली असून, या संदर्भात मुख्यमंत्र्यांचे स्वीयसहाय्यकांशी फोनवर बोलणे झाले आहे. रस्त्याचे काम मार्गी लावण्याचे आश्वासन मिळाले असून, स्थानिक नागरिकांच्या वतीने मुख्यमंत्र्यांचे आभार मानण्यात आले असल्याचे कातोरे यांनी म्हंटले आहे.

No comments:

Post a Comment