‘अनिल भैय्या अमर रहे’च्या घोषणांनी आसमंत दणाणला.. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Wednesday, August 5, 2020

‘अनिल भैय्या अमर रहे’च्या घोषणांनी आसमंत दणाणला..

‘अनिल भैय्या अमर रहे’च्या घोषणांनी आसमंत दणाणला..
भैय्या अनंतात विलीन!
अहमदनगर (प्रतिनिधी) ः
शिवसेनेचे उपनेते तथा माजी मंत्री अनिल राठोड यांचे आज पहाटे हृदयविकाराने निधन झाले. दुपारी सव्वा बारा वाजता त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या अंत्यदर्शनासाठी हजारो शिवसैनिकांनी अहमदनगर शहरातील अमरधाम येथे गर्दी केली होती. आज पहाटे त्यांना हृदयविकाराचा त्रास झाला. त्यातच त्यांचा मृत्यू झाला. राठोड यांच्या निधनाची वार्ता वार्‍यासारखी अहमदनगर शहरासह राज्यात पसरली. शिवसेनेचे पक्षप्रमुख तथा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अनिल राठोड यांच्या जाण्याने मोठा आघात झाला असल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली. त्यापाठोपाठ राष्ट्रवादीचे नेते तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही शोक व्यक्त केला. अनिल राठोड यांच्या अंत्यदर्शनासाठी यावेळी हजारो शिवसैनिक नगर शहरात जमा झाले होते. कोणताही अनुचित प्रकार होऊ नये म्हणून पोलिसांनी मोठा पोलिस बंदोबस्त ठेवला होता. अनिल राठोड यांच्या आठवणींना शिवसैनिकांनी उजाळा दिला. त्यावेळी शिवसैनिकांना अश्रू अनावर झाले होते.

त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुली, एक मुलगा, सुना, नातवंडे, असा परिवार आहे. अनिल राठोड यांच्या अंत्य यात्रेला सकाळी 11 वाजता सुरुवात झाली. राठोड यांच्या निधनाचे वृत्त समजताच साईदीप हॉस्पिटलजवळ हजारो शिवसैनिकांनी गर्दी केली होती. भैय्या अमर रहे... जय भवानी जय शिवाजी... कोण आला रे कोण आला शिवसेनेचा वाघ आला... शिवसैनिकांच्या अशा घोषणांनी हॉस्पिटलचा परिसर दणाणला होता. यावेळी शहर पोलिसांनी मोठा बंदोबस्त ठेवला होता. पोलीस अधीक्षक अखिलेशकुमार सिंह,  अतिरिक्त पोलीस अधीक्षक सागर पाटील, शहर पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके, आयुक्त श्रीकांत मायकलवार आदी यावेळी उपस्थित होते. राठोड यांची अंत्ययात्रा सर्जेपुरामार्गे नगर शहरातुन अमरधाम येथे पोहचली.
हजारो शिवसैनिक या अंत्ययात्रेत सहभागी झाले आहेत. प्रशासकीय पातळीवर सुरुवातीला अंत्ययात्रेचा मार्ग लालटाकीमार्गे दिल्लीदरवाजा, असा ठरला होता. मात्र शिवसैनिकांनी अंत्ययात्रेच्या पुढे असलेल्या शहर पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके आणि शहर वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश मोरे यांच्या वाहनांना आडवे झाले. शिवसैनिकांनी विनंती केली. त्यानंतर अंत्ययात्रा सर्जेपुरा मार्गे शहरातून घेण्याची विनंती केली. मिटके यांनीही शिवसैनिकांची भावना ओळखून अंत्ययात्रा नगर शहरातून घेतली. चितळे रोडवर यावेळी मोठा पोलीस बंदोबस्त होता.अंत्ययात्रा चितळे रोडवर आली असताना. शहर पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके यांनी हा चौकात अंत्ययात्रा थांबणार नाही, अशा सूचना पोलिसांना दिल्या होत्या. त्यानुसार पोलिसांकडून नियोजन करण्यात आले होते. राठोड यांची अंत्ययात्रा चितळेरोडवर येताच कार्यकर्त्यांनी मोठी घोषणाबाजी केली. भैया... भैया... भैया... एवढ्याच घोषणांनी चितळे रोड परिसर दणाणून गेला. शेकडो शिवसैनिकांच्या डोळ्यातील अश्रू थांबत नव्हते. काही कार्यकर्ते घोषणा देताना रडत होते.शिवसेना उपनेते अनिल राठोड यांचे अंत्ययात्रा दिल्ली दरवाजा येथे दाखल झाली. त्यांच्या अंत्यदर्शनासाठी दिल्ली दरवाजा येथेही शिवसैनिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. यावेळी त्यांच्या अंतरावर पुष्पवृष्टी करण्यात आली.

No comments:

Post a Comment