तलाठी कार्यालय नेमकं चालवतोय कोण ? - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Thursday, July 23, 2020

तलाठी कार्यालय नेमकं चालवतोय कोण ?

तलाठी कार्यालय नेमकं चालवतोय कोण ?

नगरी दवंडी/प्रतिनिधी
श्रीरामपूर ः श्रीरामपूर तालुक्याच्या ठिकाणी असलेले येथील तलाठी कार्यालयाच्या अनागोंदी कारभारामुळे सर्वसामान्य नागरिक प्रचंड वैतागले असून तलाठी कधी वेळेवर सापडत नाही तर तेथे काम करणारे त्याचे अडली लोकांकडून अव्वाच्या सव्वा पैसे मागत असल्यामुळे तलाठी कार्यालय नेमकं चालवतोय कोण ? असा प्रश्न जनतेतून विचारला जात आहे .
येथील कर्मवीर भाऊराव पाटील चौकामध्ये नगरपालिकेच्या स्टेडियम मध्ये तलाठी कार्यालय असून याठिकाणी जुन्या गावठाणा सहित शहरातील व परिसरातील लोकांना वेगवेगळ्या प्रकारचे दाखल्यासाठी यावे लागते . परंतु येथे तलाठी कधीही वेळेवर सापडत नाही. अधिक चौकशी केली असता सदरचे तलाठी भाऊसाहेब यांच्याकडे बेलापूर येथील चार्ज असून दररोज दुपारी दोन नंतर या ठिकाणी येतात. तासभर थांबतात व पुन्हा आपल्या पुढील कामासाठी निघून जातात अशी माहिती मिळाली.
या कार्यालयांमध्ये चार-पाच लोक तलाठी भाऊसाहेबांचे मदतनीस म्हणून काम पाहतात . ते अधिकृत तलाठी कार्यालयाचे कर्मचारी नसल्याचे समजते . मग या लोकांना पगार कोण देतो ? तलाठी ऑफिस मध्ये दाखल्यासाठी येणार्या गोरगरीब लोकांकडून मनमानी पद्धतीने पैसे घेतले जात असल्याच्या तक्रारी मोठ्या प्रमाणात आहेत.येथे काम करणारे तलाठी भाऊसाहेबांचे आडली हे लोकांशी नीट बोलत नाही . याबाबत चौकशी केली असता तुमचं काय काम आहे ते सांगा . इतरांची चौकशी करू नका . उद्या या. नंतर या. अशा पद्धतीने उत्तरे दिली जातात . वीस रुपये दाखला फी असलेल्या उतार्‍याचे शंभर, दोनशे रुपये तर शेतकर्‍यांच्या फेरा नोंदणीसाठी   हजारो रुपये मागितले  जात असल्याचे तक्रारी सुद्धा याठिकाणी करण्यात आल्या आहेत. शहरातील तलाठी कार्यालय असल्याने व वाढती लोकसंख्या पाहता या ठिकाणी नागरिकांची मोठी गर्दी असते . त्यासाठी येथे पूर्णवेळ तलाठी असणे आवश्यक आहे . याबाबत श्रीरामपूरचे तहसीलदार व प्रांताधिकारी यांनी तलाठी कार्यालयाचा कारभार सुरळीत कसा चालेल या बाबीकडे लक्ष देण्याची गरज आहे.

No comments:

Post a Comment