लोणी मावळाच्या अल्पवयीन मुलीवरील अत्याचार व खून प्रकरणातील तीन आरोपींची फाशी कायम - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Friday, October 18, 2019

लोणी मावळाच्या अल्पवयीन मुलीवरील अत्याचार व खून प्रकरणातील तीन आरोपींची फाशी कायम

लोणी मावळाच्या अल्पवयीन मुलीवरील अत्याचार व खून प्रकरणातील तीन आरोपींची फाशी कायम


पारनेर : तालुक्यातील लोणी मावळा येथील तृप्ती तुपे या अल्पवयीन मुलीवर अत्याचार करुन तिची निर्दयपणे हत्या करणार्‍या तीनही आरोपींना नगरच्या सत्र न्यायालयाने दिलेली फाशीची शिक्षा मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने कायम केली. न्यायमूर्ती टी.व्ही. नलावडे व न्यायमूर्ती के. के. सोनवणे यांच्या खंडपीठाने हा निर्णय दिला.
संतोष लोणकर, मंगेश लोणकर व दत्तात्रय शिंदे अशी या घटनेतील त्या नराधम आरोपींची नावे आहेत. मानव जातीला कलंक लावणारी ही घटना 21 ऑगस्ट 2014 रोजी घडली होती. या घटनेमुळे तालुक्यातच नव्हे तर संपूर्ण राज्यात खळबळ माजली होती. याबाबत सविस्तर माहिती अशी की, दहावीत शिकणारी पीडिता तृप्ती ठुबे ही लोणीमावळा येथून शाळेसाठी अळकुटी येथे  एस.टी. बसने रोज ये-जा करीत  असे. ती रोज कोणत्या रस्त्याने शाळेत जाते यावर त्यांनी पाळत ठेवली होती. 21 ऑगस्ट 2014 रोजी संध्याकाळी शाळा सुटल्यावर तृप्ती अळकुटी येथून लोणीमावळा येथे एस.टी. बसने आली. लोणीमावळाच्या बस थांब्यापासून सुमारे 2 कि.मी. अंतरावर तुपे वस्ती आहे. तृप्ती घरापासून काही अंतरावर असताना जोरदार पाऊस सुरु झाला. त्यामुळे ती रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडाच्या आडोशाला थांबली. त्यावेळी तिच्या पाठलागावर असलेले वरील तिघेही जण तेथे आले व त्यांनी तृप्तीला बळजबरीने ओढत जवळच असलेल्या कुकडी कालव्याच्या कोरड्या चारीत नेले व तिघांनीही तिच्यावर अत्याचार केले. ती ओरडू नये म्हणून आरोपी संतोष लोणकरने तिच्या नाकातोंडात चिखल कोंबला. हा चिखल श्वास नलिकेद्वारे तिच्या फुफ्फुसापर्यंत पोहचला. अत्याचारानंतर आरोपी दत्तात्रय शिंदे याने तिचे पाय धरुन ठेवले. तर आरोपी मंगेश लोणकरने तिच्या डोक्यात दगड घातला.एवढ्यावर आरोपींचे समाधान झालेनाही तर त्यांनी तिच्या शरीरावर स्क्रू ड्रायव्हरने अनेक ठिकाणी निर्दयपणे वार केले. नाका तोंडात चिखल गेल्याने व शरीरावरील जखमांमुळे तृप्तीचा मृत्यू झाला. त्यांनतर आरोपींनी तिचा मृतदेह चारीखालील पुलाखाली लपविला.
तत्कालीन पोलिस निरीक्षक शरद जांभळे यांनी या प्रकरणाचा तपास करीत 24 तासाच्या आत आरोपींना अटक केली. आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी व हा खटला जलदगती न्यायालयत चालावा, या खटल्यात विशेष सरकारी वकील म्हणून उज्ज्वल निकम यांची नियुक्ती व्हावी या मागण्यांसाठी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या मार्गदर्शनाखाली मोठे जनआंदोलन उभे झाले होते. नगर सत्र न्यायालयात अ‍ॅड. निकम यांनी याखटल्याचे कामकाज चालविले. नगरच्या तत्कालीन जिल्हा व सत्र न्यायाधीश सुवर्णा केवले यांनी तीनही आरोपींना फाशीची शिक्षा ठोठावली. सत्र न्यायालयाच्या या निर्णयाविरोधात आरोपींनी उच्च न्यायालयात धाव घेतली मात्र तेथीही त्यांची फाशीची शिक्षा कायम करण्यात आली. या निर्णयामुळे तुपे कुटुंबियांनी समाधान व्यक्त केले असून न्याय व्यवस्थेवर आपला विश्वासअसल्याचे सांगितले.

No comments:

Post a Comment