श्रध्दाज फोक फिटनेसच्या टिमला रास दांडियात व्दितीय पारितोषिक - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Thursday, October 17, 2019

श्रध्दाज फोक फिटनेसच्या टिमला रास दांडियात व्दितीय पारितोषिक

श्रध्दाज फोक फिटनेसच्या टिमला रास दांडियात व्दितीय पारितोषिक

सकल राजस्थानी मंचचे आयोजन, बहारदार नृत्याविष्काराला उपस्थितांची दाद

अहमदनगर ः  रंगीबेरंगी राजस्थानी साडी, घेरदार लेहंगा असा पेहराव, डोक्यावर बिंदी, कानात झुमके, कंबरपट्टा, पैंजण अशा साजश्रृंगारासह आलेल्या युवतींपासून महिलांपर्यंत सर्वांचा रास दांडियाचा थक्क करणारा कलाविष्कार नगरमध्ये नुकताच पहायला मिळाला. सकल राजस्थानी मंचने आयोजित केलेल्या या विशेष कार्यक्रमात नगरमधील श्रध्दाज फोक फिटनेसच्या टिमने सर्वांची मने जिंकणारे सादरीकरण करून स्पर्धेत व्दितीय क्रमांक पटकावला. या टिममध्ये जवळपास 34 युवती, महिलांचा सहभाग होता. ताळमेळ, अचूकता व उत्साहाचा संगम त्यांच्या सादरीकरणात असल्याने उपस्थितांनी तोंड भरून या टिमचे कौतुक केले.

नगरमधील सकल राजस्थानी मंच आयोजित दांडिया स्पर्धेत सर्वांनीच उत्कृष्ट रास दांडिया, गरबा सादर केला. श्रध्दा देडगांवकर यांच्या मार्गदर्शनाखाली श्रध्दाज फोक फिटनेसची टिमही यात सहभागी झाली होती. या टिमने आगळेवेगळे सादरीकरण करून रास दांडियांचे पारंपरिक रंग आपल्या अदाकारीने खुलवले. मध्यभागी गोवर्धन पर्वताची प्रतिकृती, राधा व श्रीकृष्णाची जोडी व त्याभोवती दांडिया सादरीकरण असे मंत्रमुग्ध करणारे दृष्य येथे पहायला मिळाले. डोक्यावर आकर्षक सजवलेला कलश आणि दिवे घेवून पारंपरिक गीतांच्या चालीवर बहारदार असा पारंपरिक नृत्याविष्कार सादर करण्यात आला. विशेष म्हणजे 15 वर्षांच्या मुलींपासून 48 वर्षांच्या महिलांनीही तितक्याच उत्साहात या सादरीकरणात सहभाग घेवून अतिशय उत्साहाने नृत्य केले. परिक्षकांनीही या टिमची वाहवा करीत व्दितीय क्रमांकाचे पारितोषिक जाहीर केले. संपूर्ण टिमने मोठा जल्लोष करीत या बक्षिसाचा आनंद साजरा केला. श्रध्दा देडगांवकर म्हणाल्या की, शिल्पा गार्डन येथे झालेल्या या रास दांडिया स्पर्धेत सर्वांनीच अतिशय उत्साहात सहभाग घेतला. दोन अडीच महिन्यांपासून या स्पर्धेची तयारी चालू होती. उत्कृष्ट सादरीकरण करण्याची जिद्द ठेवली होती, त्याला पारितोषिकही मिळाल्याने संपूर्ण टिमचा आनंद व्दिगुणित झाला. 

No comments:

Post a Comment