नगर तालुक्यातील घटना; जागेच्या वादातून एकाचा खून.. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Monday, June 5, 2023

नगर तालुक्यातील घटना; जागेच्या वादातून एकाचा खून..

नगर तालुक्यातील घटना; जागेच्या वादातून एकाचा खून..
नगर - गावातील जागेवर अतिक्रमण करून घराचे बांधकाम केल्याचा जाब विचारण्यासाठी गेलेल्या एकाला शनिवारी रात्री मारहाण करण्यात आली. त्यानंतर त्याला दुचाकीवरून अज्ञातस्थळी नेऊन हत्याराने वार करून खून केल्याची घटना देहरे (ता. नगर) शिवारात घडली. मठण मोहन गांगुर्डे (वय 38 मूळ रा. देहरे, हल्ली रा. डिग्रज ता. राहुरी) असे मयताचे नाव आहे. काल (रविवारी) सकाळी हा प्रकार उघडकीस आला आहे.
मयत मठण गांगुर्डे यांचा भाऊ विठ्ठल मोहन गांगुर्डे (वय 36 रा. देहरे) यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून हनीफ उर्फ भैय्या शेख, त्याचे दोन मुले सोहेल हनीफ शेख, शोएब हनीफ शेख, संजय वाघ (सर्व रा. देहरे) यांच्याविरूध्द खून, अ‍ॅट्रोसिटी आदी कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मठण गांगुर्डे यांच्या देहरे गावातील जागेवर हनीफ उर्फ भैय्या शेख याने घर बांधले आहे. याबाबत मठण यांनी शेख याला, आमच्या जागेवर अतिक्रमण करून घर का बांधले, आमची जागा आम्हास मोकळी करून द्या, असा जाब विचारला होता.या कारणावरून शनिवारी रात्री देहरे गावातील बाजारतळावर हनीफ व त्याच्या दोन मुलांनी मठण गांगुर्डे यांना शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. तु उद्याचा दिवस पाहत नसतो, तुझ्याकडे आम्ही पाहून घेतो, असा दम दिला. त्यानंतर रात्री मठण याला हनीफ, त्याची दोन मुले व संजय वाघ यांनी एकत्र येत दुचाकीवर बसवून अज्ञात स्थळी नेले. तेथे त्याच्यावर हत्याराने वार करून खून केला. मठण याचा मृतदेह देहरे शिवारातील मारूती पाटलाचा कॉर्नर, रेल्वे पटरीजवळ टाकून दिला.
सदरचा प्रकार एमआयडीसी पोलिसांना कळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. मृतदेह ताब्यात घेत मारहाण करणार्‍या संशयीतांवर गुन्हा दाखल केला असून अधिक तपास पोलीस उपअधीक्षक (नगर ग्रामीण) संपत भोसले करीत आहेत.

No comments:

Post a Comment