पारनेर पोलिसांची मोठी कारवाई; जादूटोणा करणारा भामटा भोंदू गजाआड.. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Friday, June 23, 2023

पारनेर पोलिसांची मोठी कारवाई; जादूटोणा करणारा भामटा भोंदू गजाआड..

 पारनेर पोलिसांची मोठी कारवाई; जादूटोणा करणारा भामटा भोंदू गजाआड..


पारनेर -
तालुक्यातील एका व्यक्तीच्या घरातील दुखणे दुर करण्यासाठी जादू टोणा करण्याच्या नावाखाली साडेपाच लाख रूपये उकळणारा, त्याच घरातील तरुणीवर एअरगणचा धाक दाखवून अत्याचार करणारा तसेच पैशांचा पाऊस पाडण्याच्या नावाखाली पैसे उकळणारा योगी महादेवनाथ बाबा उर्फ ज्ञानदेव तुकाराम कांबळे रा शिर्सुफळ, अटोळे वस्ती, बारामती, जि. पुणे याच्या पारनेर पोलीसांनी मुसक्या आवळल्या आहेत. त्याच्यावर पारनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याने पारनेर तालुक्यात आणखी कोणाची फसवणूक केली आहे याचा पोलीस शोध घेत आहेत.
यासंदर्भात पिडित तरुणीने पारनेर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यात नमुद करण्यात आले आहे की, घरातील मेंढया व माणसे सतत आजार पडत असल्याने सन २०२० मध्ये महादेवनाथ बाबा याने तुमच्या कुटूंबावर करणी केली असल्याने दोन होम करावे लागतील त्यासाठी १ लाख १० हजार रूपये खर्च येईल असे भोंदू बाबाने सांगितले. एवढे पैसे नसल्याने पिडितेच्या वडिलांनी विचार करून सांगतो असे सांगितले होते.
घरातील आजारपण दूर होत नसल्याने हतबल झालेल्या पिडितेच्या वडिलांनी बाबा त्यावर इलाज करेल या आशाने होम हवनासाठी पैशांची जमवाजमव केली. योगी महादेवबाबा यास फोन केला असता आंबी, घारगांव, ता. संगमनेर येथील मठावर मी असून तेथे पैसे आणून द्या असे त्याने सांगितले. पैसे नेऊन दिल्यानंतर घरी येऊन होम हवन केले. तुमची पीडा कमी होईल असे सांगून बाबा निघून गेला. दोन महिन्यांनंतर तीस हजार रूपये घेऊन बाबाने दुसरा होम केला. मात्र दोन तीन महिन्यांत काहीही फरक पडला नाही. मेंढया मरत होत्या. पिडितेसह तीचा भाऊ हे सतत आजारी पडत होते.
घरातील पीडा दुर होत नसल्याचे बाबाला कळविण्यात आल्यानंतर घरासमोरील लिंबाच्या झाडाखाली जमिनीवरून तुमचे ज्यांच्याशी वाद झाले आहेत त्यांनी ९ लाख रूपये भरून तुमच्यावर करणी केली असल्याचे बाबाने सांगितले. त्यापैकी सडा वाघापूर येथे साडेचार लाख रूपये भरावे लागतील असे तो म्हणाला. पैसे देण्यास असमर्थता दर्शविण्यात आल्यानंतर सध्या ५० हजार द्या मी तेथे पैसे भरून येतो. त्याच्या सांगण्यावरून पिडितेच्या वडिलांनी त्यास ५० हजार रूपये दिले. पिडिता आजारी असल्याने तीच्यावर खाजगी रूग्णालयात उपचार सुरू होते. फरक मात्र पडत नव्हता.
वरील कारवाई ही मा. पोलीस अधीक्षक श्री. राकेश ओला, मा. अपर पोलीस अधीक्षक श्री. प्रशांत खैरे, मा. उपविभागीय पोलीस अधिकारी सो, नगर ग्रामीण विभाग, अहमदनगर श्री. संपतराव भोसले, यांचे मार्गदर्शनाखाली पारनेर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड, पोलीस उपनिरीक्षक हनुमान उगले. सहा फौज. शिवाजी कडूस, पो.हे.कॉ. गणेश डहाळे, जालींदर लोंढे, पो.ना. गहिणीनाथ यादव, पो. कॉ. सुरज कदम, अनिल रोकडे, मयुर तोरडमल, सारंग वाघ, सागर धुमाळ व विवेक दळवी व पथकाने केली आहे.
पारनेर पोलीसांतर्फे पारनेर तालुक्यातील जनतेला अवाहन करण्यात येते की, सदर व्यक्तीने वेगवेगळ्या नावांचा वापर करून वेगवेगळे आजार दूर करण्यासाठी किंवा अडचणी दूर करण्यासाठी जर कोणाची फसवणू केली असेल तर त्यांनी तात्काळ पारनेर पोलीस स्टेशनला संपर्क करावा.

No comments:

Post a Comment