सिमेंट काँक्रीटच्या रस्त्यावर केले डांबरीकरण, मनपाचा प्रताप.. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Saturday, May 27, 2023

सिमेंट काँक्रीटच्या रस्त्यावर केले डांबरीकरण, मनपाचा प्रताप..

 सिमेंट काँक्रीटच्या रस्त्यावर केले डांबरीकरण, मनपाचा प्रताप..

'हे तर १०० वर्ष टिकणारे जागतिक तंत्रज्ञान', भिंगाद्वारे पाहणी करत किरण काळेंचा उपरोधिक टोला.


नगर
 : नगर  शहरात चक्क सिमेंट काँक्रीटच्या रस्त्यावर डांबरीकरण करण्याचा प्रताप मनपाच्या अभियंत्यांनी केला आहे. अवघ्या चार महिन्यांपूर्वीच लाखो रुपये खर्चून या रस्त्याचे सिमेंट काँक्रिटीकरण करण्यात आले होते. शहर काँग्रेस जिल्हाध्यक्ष किरण काळे यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेस कार्यकर्त्यांच्या अभ्यास गटाने भिंगाद्वारे या रस्त्याची पाहणी करत अभ्यास केला आहे. हे तर किमान शंभर वर्षे टिकेल अशा दर्जाचे जागतिक तंत्रज्ञान आहे. असा उपरोधिक टोला यावेळी बोलताना काळे यांनी लगावला आहे.

शहरातील रस्त्यांच्या निकृष्ट कामांचा काँग्रेस कडून भांडाफोड सुरू आहे. यात रोज नवनवीन प्रताप समोर येत आहेत. दोन-तीन दिवसांपूर्वी हा धक्कादायक प्रकार घडला आहे. प्रभाग क्रमांक १४ मधील बुरूडगाव रोड लगत असणाऱ्या एके वन सोसायटी समोरील आयटीआय महाविद्यालया गेट ते भोसले आखाडा रस्त्यावर हा अनोखा प्रयोग करण्यात आला आहे. यावेळी पाहणी करणाऱ्या काँग्रेसच्या अभ्यास गटामध्ये काळे यांच्यासह ब्लॉक काँग्रेस अध्यक्ष मनोज गुंदेचा, माजी नगरसेवक तथा ओबीसी काँग्रेस शहर जिल्हाध्यक्ष संजय झिंजे, अल्पसंख्यांक काँग्रेस शहर जिल्हाध्यक्ष अनिस चुडीवाला, युवक काँग्रेस उपाध्यक्ष आकाश आल्हाट, काँग्रेस सामाजिक न्याय युवा विभाग शहर जिल्हाध्यक्ष प्रणव मकासरे, युवक सरचिटणीस आनंद जवंजाळ, राजू क्षेत्रे, अशोक जावळे आदींसह कार्यकर्त्यांचा चमू यामध्ये सहभागी झाला होता

यावेळी फेसबुक लाईव्हद्वारे हे तंत्रज्ञान नगरकरांना दाखवण्यात आले. सोशल मीडियात हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत असून चर्चेला उधाण आले आहे. नागरिकांच्या तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. काळे म्हणाले की, हा धक्कादायक प्रकार घडल्यानंतर या परिसरातील सुजाण नागरिकांनी मला फोनद्वारे ही माहिती दिली. मात्र त्यांनी त्यांचं नाव उघड होऊ नये अशी विनंती केली. त्यांच्या बोलण्यात भीती जाणवत होती. नगर शहरात दहशत आहे. नागरिकांना चुकीच्या गोष्टींबद्दल तक्रार करताना सुद्धा भीती वाटते. माझे नगरकरांना अवाहन आहे, नगरकरांनी बोलते झाले पाहिजे. देशात कायद्याचे राज्य आहे. आपण घाबरतो म्हणून घाबरवणारे दहशत करतात. तुमचे नाव गुपीत ठेवले जाईल. तुम्हाला काँग्रेस पूर्ण संरक्षण देईल. मात्र भ्रष्टाचाराला वाचा फोडण्याच्या या जनआंदोलनात नागरिकांनी असेच धाडसी बनत सहभागी व्हावे, असे आवाहन काळे यांनी केले आहे. 

No comments:

Post a Comment