अहमदनगरचे नामांतर आणि विभाजनही होईल - प्रा. राम शिंदे. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Monday, January 9, 2023

अहमदनगरचे नामांतर आणि विभाजनही होईल - प्रा. राम शिंदे.

अहमदनगरचे नामांतर आणि विभाजनही होईल - प्रा. राम शिंदे.
अहमदनगर : अहमदनगर जिल्ह्याचे नामांतर आणि विभाजन यावरून भाजपमध्येच दोन वेगळे मतप्रवाह असताना अहिल्यादेवी होळकर यांचे वंशज आणि विधान परिषदेचे भाजपचे आमदार प्रा. राम शिंदे यांनी नामांतर आणि विभाजन याबद्दल मोठं वक्तव्य केलं आहे. आपण अहमदनगरचे पालकमंत्री असतानाच जिल्हा विभाजनाचा प्रस्ताव पाठविला होता. त्यासाठी पाठपुरावाही सुरू आहे. आता ही विभाजन आणि नामांतराची प्रकिया पुन्हा वेग घेत आहे. ज्यावेळी राज्यात जिल्ह्यांच्या विभाजनाचा निर्णय होईल, त्यात अहमदनगरला प्राधान्य असेल. सोबतच जिल्ह्याचं नामानंतर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर नगर असं केलं जाईल, असा विश्वास प्रा. शिंदे यांनी व्यक्त केला.
आमदार शिंदे यांनी सोमवारी अहमदनगरमध्ये प्रसार माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी सध्या सुरू असलेल्या नामांतर आणि विभाजनाची मागणी आणि चर्चांविषयी ते बोलले. जिल्ह्याचा विस्तार मोठा आहे. त्यामुळे प्रशासन अवघड जाते. आपण पालकमंत्री असतानाच सुमारे आठशे कोटी रुपये खर्चाचा विभाजनाचा प्रस्ताव दिला होता. त्यावेळी राज्यातील इतरही काही जिल्ह्यांच्या विभाजनाचे प्रस्ताव आले. मात्र खर्च वाढत असल्याने सगळेच प्रस्ताव मागे पडले. आता विभाजन आणि त्यासोबत नामांतरही व्हावे, अशी आमची अग्रही मागणी आहे.
नामांतरावर विधिमंडळात चर्चा होऊन प्राथमिक प्रक्रिया सुरू झाली आहे. अहिल्यादेवी केवळ धनगर समाजाच्यासाठीच आदर्श नाहीत तर सर्वांसाठी त्या आदर्श आहेत, त्यांचे कामही सर्वांसाठी आहे. अडीचशे वर्षांपूर्वी जेव्हा हिंदू धर्म अडचणीत आला होता, त्यावेळी त्यांनी धर्मरक्षणासाठी देशभर मोठे काम केले. त्यांचे जन्मस्थळ चौंडी या जिल्ह्यात असल्याने त्यांचेच नाव देणे संयुक्तिक आहे. इतर नावांचे प्रस्ताव असले तरी यातून चर्चा करून सर्वसंमती मिळविली जाईल. जेव्हा यासंबंधी पक्षाकडूच सूचना येतील, तेव्हा पक्षातील नेत्यांचेही यावर एक मत होईल, असे शिंदे म्हणाले.
जिल्ह्याचे विभाजन आणि नामांतरासंबंधी भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांच्या मागणीला खासदार डॉ. सुजय विखे पाटील आणि पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा विरोध असल्याकडे लक्ष वेधलं असता शिंदे म्हणाले, विखे पाटील जेव्हा विरोधीपक्ष नेते होते, तेव्हा त्यांचा विभाजनाला पाठिंबा होता. आता ते सत्तेत आहेत. त्यांनी त्यांची भूमिका बदलू नये. नामांतराची प्रक्रिया आता सुरू झाली आहे. पक्षाकडून सूचना आल्यानंतर सर्वांचा एक सूर होईल. पडळकर यांनी पूर्वीच मागणी केली होती, त्यावेळी त्यांनी माझ्याशी चर्चा केली होती. आताही आम्ही सर्व मिळून, सर्व संमतीने हा मुद्दा पुढं नेणार आहोत. अर्थात लोकशाहीत प्रत्येकाला स्वतंत्र मत मांडण्याचा आधिकार आहे. सध्या विखे पाटील असं का बोलतात हे मला माहिती नाही, मात्र यावर नक्कीच सर्व सहमती होऊन नगरचं विभाजन आणि नामांतरही नक्कीच होईल, असेही प्रा. शिंदे म्हणाले.

No comments:

Post a Comment