दोन अधिकार्‍यांना 6 वर्षाची सक्त मजूरीची शिक्षा. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Thursday, December 29, 2022

दोन अधिकार्‍यांना 6 वर्षाची सक्त मजूरीची शिक्षा.

 दोन अधिकार्‍यांना 6 वर्षाची सक्त मजूरीची शिक्षा.

वसंतराव नाईक महामंडळातील प्रकरण अडीच कोटींच्या निधीचा अपहार.


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळ, अहमदनगर या महामंडळामध्ये दोन कोटी 50 लाखांच्या शासकीय निधीचा अपहार केल्याप्रकरणी महामंडळाचा तत्कालीन जिल्हा व्यवस्थापक अशोक विश्वनाथ नागरे व बीड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचा उपव्यवस्थापक योगेश बाबासाहेब सानप यांना अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी पी.बी. रेमणे यांनी सहा वर्षे दोन महिने शिक्षा ठोठावली आहे. अ‍ॅड. नीलम अमित यादव यांनी सरकार पक्षातर्फे काम पाहिले.
वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळामध्ये 15 सप्टेंबर 2012 ते 30 मार्च 2013 या कालावधीत नऊ जणांनी संगनमत करून 50 बोगस लाभार्थी अर्जदारांचे बनावट कागदपत्रे तयार करून ’एनबीसीएफडीसी’ नवी दिल्ली योजनेअंतर्गत कर्जासाठी प्रकरणे दाखल केली. या 50 बोगस लाभार्थ्यांचे नावे प्रत्येकी पाच लाख रुपये प्रमाणे कर्ज मंजूर करून घेतले होते. त्यानंतर वसंतराव महामंडळाचे अलाहाबाद बँकेतील खात्याचे 50धनादेश घेऊन ते बीड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक या बँकेतून वटवून घेतले. महामंडळाची दोन कोटी 50 लाख रुपयांची फसवणूक झाली होती. या प्रकरणी कोतवाली पोलिस ठाण्यात 2016 मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता.
या खटल्यात सरकार पक्षातर्फे एकूण 34 साक्षीदार यांची साक्ष नोंदविण्यात आली. हस्ताक्षर तज्ज्ञांचा अहवाल महत्त्वाचा ठरला. बीड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचा उपव्यवस्थापक योगेश सानप यांच्यावर बँकेच्या खातेदारांची कागदपत्रे तपासण्याची महत्त्वाची जबाबदारी होती. त्यांनी कर्तव्यात कसूर केला होता. साक्षी पुरावे आणि सरकारच्या वतीने सर्वोच्च आणि उच्च न्यायालयाचे महत्त्वाचे 22 न्यायनिवाडे सादर करण्यात आले. न्यायालयाने हा युक्तिवाद ग्राह्य धरला. आरोपी अशोक विश्वनाथ नागरे व आरोपी योगेश बाबासाहेब सानप यांना न्यायालयाने दोषी धरून शिक्षा ठोठावली असून इतर सात जणांची सबळ पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. या खटल्यात पैरवी अधिकारी म्हणून पोलिस अंमलदार याकूब सय्यद, अशोक शिंदे, वसुधा भगत यांनी साहाय्य केले.

No comments:

Post a Comment