महाविकास आघाडीचं उद्या मुंबईत शक्तिप्रदर्शन. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Friday, December 16, 2022

महाविकास आघाडीचं उद्या मुंबईत शक्तिप्रदर्शन.

 महाविकास आघाडीचं उद्या मुंबईत शक्तिप्रदर्शन.

महामोर्चाला दीड लाख लोक येणार, बॅनर्स झळकले, टी शर्ट तयार; आघाडी शक्तीप्रदर्शनाच्या तयारीत; महामोर्चा ऐतिहासिक ठरणार?

शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी, विविध डावे पक्ष, शेकाप, विविध संघटनांनी या मोर्चाला पाठिंबा जाहीर केला आहे. जे. जे. रुग्णालयाजवळून हा मोर्चा निघेल व आझाद मैदानात त्याचा समारोप होईल. आझाद मैदानाजवळ नेतेमंडळींची भाषणे होतील. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासह राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार तसेच काँग्रेस अध्यक्ष मल्लीकार्जुन खरगे हे उपस्थित राहणार आहेत. सोमवारपासून सुरू होणाऱया विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी शिंदे गट आणि भाजपाला अडचणीत आणण्याची ही खेळी आहे. शिवसेनेला मुंबईत आपली ताकद दाखवायची आहे. या आंदोलनाच्या निमित्ताने शिवसैनिकांमध्ये जोश निर्माण करण्याचा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा प्रयत्न असेल. काँग्रेस आणि राष्ट्रवादीला शक्तिप्रदर्शनाची संधी मिळाली आहे. गेल्या काही वर्षांत मुंबईतील काँग्रेस संघटनेत मरगळ आली आहे. राष्ट्रवादीची संघटना मुंबईत फारच कमकुवत आहे. मोर्चाच्या निमित्ताने सर्वच पक्ष आपापल्या कार्यकर्त्यांमधील मरगळ झटकण्याचा प्रयत्न करतील.



मुंबई:
महापुरुषांच्या अवमाना विरोधात उद्या शनिवार दि. 17 डिसेंबर रोजी होणार्‍या महामोर्चाची महाविकास आघाडीने जय्यत तयारी सुरू केली आहे. शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीने आपआपल्या पातळीवर या महामोर्चाची जोरदार तयारी सुरू केली आहे. या महामोर्चासाठी बसेस भरून भरून लोक येणार आहेत. जवळपास दीड लाख लोक या मोर्चात सहभागी होणार असल्याचं सांगितलं जात आहे. महाविकास आघाडीचा हा महामोर्चा ऐतिहासिक ठरणार असून या महामोर्चाच्या माध्यमातून आघाडीकडून शक्तीप्रदर्शन केलं जाणार असल्याचं सांगितलं जात आहे. त्यामुळे या महामोर्चाकडे संपूर्ण राज्याचचं नव्हे तर देशाचंही लक्ष लागलं आहे.
उद्या निघणार्‍या महामोर्चाला आज परवानगी देण्यात आली आहे. महाविकास आघाडीने महामोर्च्याची जय्यत तयारी सुरू केली आहे. महामोर्चाला राज्याच्या कानाकोपर्‍यातून लोक येणार आहेत. तब्बल दीड लाख लोक येण्याचा अंदाज वर्तवला जात आहे. मुंबईत या मोर्चाची जय्यत तयारी करण्यात आली असून मुंबईभर बॅनर्स लावण्यात आले आहेत. या मोर्चासाठी खास टीशर्टही तयार करण्यात आले आहेत. त्यावर हल्लाबोल असं लिहिलं आहे. तसेच महाविकास आघाडीचा महामोर्चा, शिवसेना असंही या टीशर्टवर लिहिलं आहे.
मोर्चाला येणार्‍या लाखो लोकांची नीट व्यवस्था व्हावी यासाठी महाविकास आघाडीचे कार्यकर्ते अपार मेहनत घेत आहेत. महाविकास आघाडीच्या महामोर्चाचे मुंबईत ठिकठिकाणी बॅनर्स लावण्यात आले आहेत. शिवसेना ठाकरे गट, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस पक्षाकडून हे बॅनर्स लावण्यात आले आहेत. या मोर्चा दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून ठिकठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. तसेच मोर्चा नीट पार पडावा म्हणून महाविकास आघाडीकडून स्वयंसेवकही तैनात ठेवण्यात येणार असल्याची माहिती आहे.
मोर्चेकर्‍यांच्या बसेस भायखळा जंक्शनपर्यंत येतील. त्यानंतर बसमधील लोक रिचर्डसन अ‍ॅण्ड क्रूडास कंपनीमध्ये जमतील. या कंपनीत दीड लाख लोक जमा होऊ शकतील इतकी व्यवस्था आहे. लोक जमा झाल्यानंतर त्यांना मोर्चाचे नियम समजावून सांगितले जातील. तसेच शिस्तचं पालन करण्याचं आवाहनही करण्यात येईल. त्यानंतर क्रूडास कंपनीतून हा मोर्चा निघेल. भायखळ्याच्या क्रुडास कंपनी ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथील टाइम्स ऑफ इंडियापर्यंत हा मोर्चा निघणार आहे. त्यामुळे मोर्चेकर्‍यांसाठी या मार्गावर जागोजागी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्ता आली आहे. मोर्चाच्या नियोजनाची जबाबदारी प्रत्येकाला ठरवून दिली जात आहे.
छत्रपती शिवाजी महाराज, डॉ, बाबासाहेब आंबेडकर, शाहू महाराज यांचा राज्यपाल भगतसिंह कोश्यारी तसेच विविध भाजप नेत्यांकडून करण्यात येणारा अपमान, सीमा प्रश्वावर भाजपशासित कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांची चिथावणीखोर भाषणे यांच्या निषेधार्थ महाविकास आघाडी तसेच विविध समविचारी पक्षांनी आयोजित केलेल्या मोर्च्याच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर शक्तिप्रदर्शन करण्यात येणार आहे.
सुमारे लाखभर लोक जमवून सरकारला इशारा देण्याचा प्रयत्न आहे. विरोधकांनी दबाव आणला म्हणून भाजपचे केंद्रीय नेते राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी लगेचच बदलण्याचीही शक्यता कमी आहे. पण राष्ट्रपुरुषांच्या अपमानावरून भाजपची कोंडी करण्याची महाविकास आघाडीची खेळी आहे.

No comments:

Post a Comment