आ. रोहित पवारांनी घेतली पर्यटन, महिला व बालविकास मंत्र्यांची भेट. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Tuesday, September 6, 2022

आ. रोहित पवारांनी घेतली पर्यटन, महिला व बालविकास मंत्र्यांची भेट.

 आ. रोहित पवारांनी घेतली पर्यटन, महिला व बालविकास मंत्र्यांची भेट.


जामखेड -
विधानसभा मतदारसंघाचे आमदार रोहित पवार यांनी नुकतीच पर्यटन तसेच महिला व बालविकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांची मुंबईत भेट घेतली आहे. मतदारसंघातील बालसंगोपन योजनेतील लाभार्थ्याचे थकीत अनुदान मिळावे व पर्यटन विभागाशी संबंधित रोहितदादांनी मंजुरी मिळवलेल्या कामांवर सरकारने आणलेली स्थगिती उठवावी याबाबत या भेटीमध्ये आमदार रोहित पवार यांनी मंत्र्यांशी चर्चा केली आहे. 
दरम्यान, कर्जत-जामखेड मतदारसंघाचे आमदार रोहित पवार यांच्या माध्यमातून व प्रशासनाच्या मदतीने दोन्ही तालुक्यातील बालसंगोपन योजनेचा पात्र लाभार्थ्यांना लाभ मिळावा यासाठी विशेष शिबिरांचे आयोजन करण्यात आले होते. या योजनेंतर्गत पालकांचे छत्र हरवलेल्या आणि संरक्षणाची गरज असलेल्या 18 वर्षांखालील निराधार मुलांना शासनाच्या वतीने आर्थिक सहाय्य केले जाते व त्यांची काळजी घेतली जाते. आयोजित शिबिरांच्या माध्यमातून जामखेड तालुक्यातील 658 तर कर्जत तालुक्यातील 766 पात्र लाभार्थ्याना ही योजना मंजूर करण्यात आली होती. यासाठी खास सर्वेक्षण कर्जत जामखेड मध्ये आमदार रोहित पवार यांच्या माध्यमातून करण्यात आले होते व लाभार्थ्यांची निवड केलेला आकडा हा अहमदनगर जिल्ह्यातील सर्वात मोठा लाभार्थ्यांचा आकडा देखील आहे.  सदरील योजना गेल्या कित्येक महिन्यांपासून मंजूर झालेली असतानाही बाल संगोपन योजनेच्या लाभार्थ्यांना त्याचे अनुदान अजूनही मिळालेले नाही. त्याबाबत आमदार रोहित पवार यांनी महिला व बालविकास मंत्र्यांकडे निवेदन देऊन हे अनुदान लवकरात लवकर लाभार्थ्यांना मिळवून द्यावे, अशी विनंती केली आहे. तसेच या योजनेअंतर्गत सध्या जे अनुदान मिळणार आहे त्यात देखील दुप्पटीने वाढ व्हावी असा देखील प्रस्ताव सरकारकडे विचाराधीन आहे. 
बाल संगोपन योजनेच्या लाभार्थ्यांमध्ये काही लाभार्थी हे कोरोना काळात एक किंवा दोन पालक गमावलेले असून बहुतांशी लाभार्थी हे गरीब, शेतकरी, शेतमजूर, भूमिहीन वर्गातील आहेत. आर्थिक दुर्बल घटकातील हे लाभार्थी असल्यामुळे या योजनेच्या मदतीने त्या कुटुंबाला आर्थिक लाभ जर झाला तर त्या लहान मुलांचे शिक्षण थांबणार नाही व त्यांना शिक्षण पूर्ण होण्यास मदत होईल. त्या अनुषंगाने आर्थिक मदतीची असलेली गरज लक्षात घेऊन आमदार रोहित पवार यांनी आपल्या मतदारसंघातील लाभार्थ्यांना शासनाकडून अनुदान मिळावे यासाठी पाठपुरावा करून प्रयत्न सुरू केले आहेत. लवकरच त्यांना अनुदान मिळून शासनाची मदत मिळेल अशी अपेक्षा आमदार रोहित पवार यांनी व्यक्त केली आहे. यासोबतच पर्यटन मंत्रालयही मंगल प्रभात लोढा यांच्याकडे आहे. त्यामुळे कर्जत-जामखेड तालुक्यातील पर्यटन मंत्रालयाच्या कामांना मिळालेली स्थगिती देखील उठवण्यात यावी अशी विनंतीही रोहित पवार यांनी मंत्र्यांकडे केली आहे. 
पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर यांच्या जन्म गावी चौंडी येथे स्वागत कमान, संग्रहालय बांधकाम, बारव व नदी काठावरील घाटाचे काम तसेच खर्डा येथील संत भगवान बाबांचे गुरु श्री संत गीते बाबा यांच्या समाधी स्थळांच्या सुशोभीकरणाचे काम व संत सिताराम बाबा यांचे समाधीस्थळाचे सुशोभीकरण तसेच राशीन येथील प्रसिद्ध व भक्तांचे श्रद्धास्थान असलेले जगदंबा देवस्थान सुशोभीकरण व मांदळी येथील लालागिर स्वामी मंदिर येथील सभामंडप स्वयंपाक खोली बांधकाम इत्यादी कोट्यवधींच्या कामांना आ. रोहित पवार यांनी मंजुरी मिळवून आणली होती.  या कामांवर सध्याच्या सरकारने लावलेली स्थगिती उठवावी यासाठी आमदार रोहित पवार यांनी प्रयत्न सुरू केले आहेत. तसेच याबाबतही पर्यटन मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्याशी त्यांनी चर्चा करून विनंती केली आहे. यासोबतच वनविभागाच्या परवानगी अभावी रस्त्यांची काही कामे मतदारसंघात प्रलंबित आहेत, त्याबाबत लक्ष घालावं अशी विनंती वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना देखील भेटून आमदार रोहित पवार यांनी केली आहे.

No comments:

Post a Comment