शालेय विद्यार्थ्यांना लागलीय तंबाखूची चटक. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Friday, February 18, 2022

शालेय विद्यार्थ्यांना लागलीय तंबाखूची चटक.

 शालेय विद्यार्थ्यांना लागलीय तंबाखूची चटक.

ग्लोबल युथ टोबॅको सर्व्हे 4 चा धक्कादायक निष्कर्ष.


मुंबई -
राज्यात गुटखा बंदी असताना गुटखा कुठेही मिळतोय. युवा पिढी गुटख्याच्या आहारी जात असताना शालेय मुलं-मुली ही तंबाखूच्या आहारी जात असल्याचा सर्वे ग्लोबल युथ टोबॅकोनं आरोग्य मंत्री राजेश टोपेंच्या उपस्थितीत प्रकाशित केला आहे. शालेय विद्यार्थ्यात तंबाखू अथवा अन्य तंबाखू उत्पादने सेवनाचे प्रमाण 5.1 टक्के आहे आणि विशेष म्हणजे यात विद्यार्थिनींची संख्या सुद्धा लक्षणीय असून तंबाखूजन्य पदार्थ शाळेजवळील दुकाने, पान टपर्‍यांवर मुलांना सहज उपलब्ध होत आहेत. देशातील अन्य राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रात किशोर गटात धुम्रपानाचे प्रमाण जास्त असल्याचे या सर्वेत समोर आलंय.
ग्लोबल युथ टोबॅको सर्व्हे चार चा अहवाल राज्याचे आरोग्य मंत्री डॉ. राजेश टोपे यांनी टाटा मेमोरियल मध्ये सादर केला. या सर्व्हेक्षणात 35 शाळांमधील 4360 विद्यार्थी सामील होते. त्यातील 5.1 टक्के विद्यार्थ्यांनी तंबाखू, सिगारेट सेवन करत असल्याची कबुली दिली. त्यात विद्यार्थिनी सुद्धा सामील आहेत. राज्यातील 33 हजार शाळा तंबाखू मुक्त घोषित केल्या गेल्या असून नियमानुसार शाळेपासून 100 मीटरच्या आत या पदार्थांच्या विक्रीला बंदी आहे. हा नियम मोडल्यास दंड होतो आणि गेल्या पाच वर्षात दंडापोटी मोठी रक्कम वसूल केली गेल्याचेही सांगितले जात आहे.  2016 मध्ये नियम मोडल्यामुळे 1 लाख रुपयाचा दंड वसूल केला गेला होता. 2021-22 मध्ये ही रक्कम 5.5 कोटींवर गेली असल्याचे समजते.
तंबाखू सेवनाच्या व्यसनांविरोधात लोकचळवळ उभारायला हवी. याबाबतच्या कोटपा कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करायला हवी. या प्रक्रियेत जनतेने सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन सार्वजनिक आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केले. श्री टोपे यांनी सांगितले की, शालेय विद्यार्थी विशेषतः महिला आणि मुलींमध्ये तंबाखू सेवनाचे प्रमाण वाढत आहे. ही अतिशय चिंताजनक बाब आहे. तंबाखू सेवन आरोग्याला हानिकारक आहे, याबाबत लोकांत जाणिव निर्माण करण्याची आवश्यकता आहे. तंबाखू सेवन आरोग्याला धोकादायक आहे याची जाणीव असूनही तंबाखू सेवन केले जाते. तंबाखूजन्य उत्पादनाची मागणी कमी व्हावी यासाठी सार्वजनिक आरोग्य विभाग , पोलीस, अन्न आणि औषध प्रशासन आणि शालेय शिक्षण विभागाने एकत्रित येऊन काम करण्याची आवश्यकता आहे.
यावेळी आरोग्य विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव डॉ प्रदीप व्यास यांनी तंबाखू सेवनाचे दुष्परिणामाबाबत मुलांना शिक्षित करायला हवं. रंगपंचमीला धोकादायक रंगाचा वापर करु नये, ध्वनिप्रदूषण रोखण्यासाठी फटाके वापरु नये याबाबत मुलांच्यामध्ये जाणीव जागृती निर्माण केली गेली. त्यामुळे फटाके आणि रंगाचा वापर कमी झाला. त्याचप्रमाणे तंबाखूबाबत मुलांना शिक्षित करण्याची आवश्यकता आहे, असे सांगितले. सार्वजनिक आरोग्य विभागाच्या संचालक डॉ साधना तायडे, उपसंचालक डॉ पद्मजा जोगेवार, टाटा मेमोरियल सेंटरचे राजेंद्र बडवे दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित होते. डॉ. शर्मिला पिंपळे यांनी सूत्रसंचालन तर सहाय्यक संचालक डॉ. संजीव कुमार जाधव यांनी आभार मानले. सार्वजनिक आरोग्य विभाग, एनएचएम आणि टाटा मेमोरियल सेंटरच्या वतीने आयोजित कार्यक्रमात आवाहन केले. यावेळी स्टेट लेव्हल यूथ टोबॅको सर्व्हेचे - महाराष्ट्र फॅक्ट शीटचे प्रकाशन टोपे यांच्या हस्ते करण्यात आले. टाटा मेमोरियल सेंटर येथे झालेल्या या कार्यक्रमाला टोपे दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित होते. यावेळी आरोग्य विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव डॉ प्रदीप व्यास, सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाचे महासंचालक डॉ. एल. स्वस्तिचरण, डॉ. राजेश दीक्षित आदी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here