लहुकुमार चोभे, सुनिल हारदे, संजय ठोंबरे, अविनाश निमसे यांना नगर पंचायत समितीचे पत्रकारिता पुरस्कार जाहीर - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Saturday, January 8, 2022

लहुकुमार चोभे, सुनिल हारदे, संजय ठोंबरे, अविनाश निमसे यांना नगर पंचायत समितीचे पत्रकारिता पुरस्कार जाहीर

लहुकुमार चोभे, सुनिल हारदे, संजय ठोंबरे, अविनाश निमसे यांना नगर पंचायत समितीचे पत्रकारिता पुरस्कार जाहीर.


अहमदनगर -
मराठी पत्रकार दिनानिमित्त येथील नगर तालुका पंचायत समितीच्या वतीने दरवर्षी दिले जाणारे पत्रकारिता पुरस्कार या वर्षी दैनिक पुढारीचे लहुकुमार चोभे, दैनिक नवा मराठाचे सुनिल हारदे, दैनिक लोकमतचे संजय ठोंबरे व दैनिक नगरी दवंडीचे अविनाश निमसे यांना जाहीर झाले असल्याची माहिती सभापती सौ. सुरेखाताई संदीप गुंड व उपसभापती डॉ.दिलीप पवार यांनी दिली.

या पुरस्कारांचे वितरण शनिवारी दि.8 जानेवारी रोजी दुपारी 3 वाजता हॉटेल यश पॅलेस येथील सभागृहात  लोकनेते आ. निलेश लंके यांच्या हस्ते व शिवसेनेचे जिल्हा प्रमुख प्रा.शशिकांत गाडे यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. यावेळी जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष प्रताप पाटील शेळके, जिल्हा परिषद सदस्य संदेश कार्ले, बाळासाहेब हराळ, शरद झोडगे यांच्यासह पंचायत समितीचे सर्व सदस्य व तालुक्यातील विविध मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
नगर पंचायत समितीचे पत्रकारिता पुरस्कार जाहीर झालेल्या पुरस्कार्थींचा अल्प परिचय -
लहुकुमार गुलाबराव चोभे - पुरस्कार प्राप्त लहुकुमार चोभे हे बाबुर्डी बेंद गावचे रहिवासी असून दैनिक पुढारी मध्ये ते बातमीदार आहेत.तालुका पत्रकार संघाचे ते माजी अध्यक्ष आहेत. रयत शिक्षण संस्थेच्या वाळकी येथील न्यु इंग्लिश स्कूल मध्ये कार्यरत असलेल्या चोभे यांनी 1996 मध्ये दैनिक लोकसत्तामध्ये पत्रकारितेला सुरुवात केली.14 वर्षे लोकसत्ता त्यानंतर देशदूत, सार्वमत, सकाळ, पुढारी अशा विविध वृत्तपत्रातून लेखन केले.पत्रकारिता करत असताना गावच्या राजकारण, समाजकारण आणि धार्मिक कार्यात त्यांचा नेहमीच सक्रीय सहभाग राहिलेला आहे. तालुक्यातील सर्वपक्षीय राजकीय नेत्यांशी त्यांचे मैत्रीचे संबंध आहेत. या मैत्रीचा उपयोग त्यांनी गावात विविध विकासकामे करण्यासाठी केलेला आहे.
पत्रकारीतेबरोबरच त्यांना अभिनय कलेची आवड आहे. कॉलेज जीवनापासुनच त्यांनी विविध नाटकांमध्ये अभिनय केलेला आहे. गावरान मेवा या मराठी विनोदी वेबसेरीजमुळे ते एक विनोदी कलाकार म्हणून घराघरात पोहोचले आहेत. त्यांनी गावरान मेवा, गावरान मस्ती, तुमच्या साठी काय पण, उचापत्या या मराठी वेब सेरीज मध्ये अभिनय केलेला आहे. याशिवाय घुमा, रे राया, ट्रिपल सीट या मराठी चित्रपटांमध्येही भुमिका केल्या आहेत. त्यांना माणस आणि पुस्तके वाचण्याची आवड आहे.

सुनिल अर्जुन हारदे - पुरस्कार प्राप्त सुनिल हारदे हे सारोळा कासार गावचे रहिवासी असून दैनिक नवा मराठा मध्ये ते उपसंपादक म्हणून 13 वर्षांपासून कार्यरत आहेत. त्यांनी शालेय शिक्षण घेत असताना लोकमत युवा मंच प्रतिनिधी म्हणून पत्रकारितेस सुरुवात केली. दि.1 जानेवारी 2003 रोजी दैनिक सार्वमत मध्ये पूर्णवेळ उपसंपादक म्हणून रुजू झाले. त्यानंतर दैनिक गावकरी, दैनिक प्रभात मध्येही काही काळ काम केलेले आहे. जिल्ह्यातील राजकारण, गुन्हेगारी विषयक पत्रकारिता, सामाजिक कृषी, जलसंधारण, वृक्षसंवर्धन तसेच जिल्ह्यातील सहकारी संस्थाविषयी विपुल लिखाण केलेले आहे. प्राथमिक शिक्षक बँक, महापालिका, बाजार समिती, पंचायत समिती येथील राजकारणाचा त्यांचा मोठा अभ्यास आहे.
याशिवाय साहित्य, कला क्षेत्रातही त्यांना आवड आहे. त्यांनी 3 नाटकांमध्ये अभिनय, तुमच्या साठी काय पण या मराठी वेब सेरीजची निर्मिती केलेली आहे. वाचनाची प्रचंड आवड असल्याने त्यांच्याकडे 4500 विविध पुस्तकांचा संग्रह आहे. पत्रकारीतेबरोबरच गावातील सामाजिक, धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रमात त्यांचा गेल्या 20-22 वर्षांपासून सक्रीय सहभाग राहिलेला आहे. सारोळा कासार गावाला सन 2001 मध्ये ग्राम स्वच्छता अभियानात तालुक्यात प्रथम क्रमांकाचे बक्षीस तसेच सन 2019 मध्ये पाणी फौंडेशनच्या वॉटर कप स्पर्धेत तालुक्यात तृतीय क्रमांकाचे 4 लाखांचे बक्षीस मिळवून देण्यात त्यांचा मोठा वाटा राहिलेला आहे. गावातील जलसंधारण आणि वृक्षसंवर्धनाच्या कामात ते कायमच सक्रीय राहिलेले आहेत. त्यांना यापूर्वी शिर्डी येथील इंस्टीट्युट फॉर मिडिया रिसर्च अँड डेव्हलपमेंट या संस्थेचा जिल्हा स्तरीय महात्मा फुले पत्रकारिता पुरस्कार, अहमदनगर प्रेस क्लब चा पुरस्कार तसेच नगर बाजार समितीचा पत्रकारिता पुरस्कार मिळालेला आहे.  

संजय वसंतराव ठोंबरे - पुरस्कार प्राप्त संजय ठोंबरे हे चिचोंडी पाटील येथील रहीवासी असुन गेली पंचवीस वर्षा पासुन पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. सन 1994 साली टिळक महाराष्ट्र विद्यापीठाची बी. जे. पदवी प्राप्त केली. त्यानंतर सार्वमत, केसरी, सकाळ आदी वृत्तपत्रात काम करत सध्या लोकमत चे चिचोंडी पाटील प्रतिनिधी म्हणुन तर हिंदी दैनिक लोकमत समाचार चे अहमदनगर बातमीदार म्हणुन काम करत आहेत. त्यांनी आपल्या पत्रकारितेतुन ग्रामीण समस्या वर प्रकाश टाकून त्या सोडविण्यास मदत केली. यात शेती विषयक समस्या मांडल्या. ग्रामीण क्षेत्रास मंजुर चिचोंडी पाटील ग्रामीण रुगणालय ची आरोग्य सुविधा मिळवण्यास निरंतर पाठपुरवा करून ते चिचोंडी पाटील मध्ये सुरु होई पर्यत प्रयत्न केले.

अविनाश धोंडीबा निमसे - पुरस्कारप्राप्त अविनाश धोंडीबा निमसे हे साकतखुर्द येथील रहिवासी असून दैनिक नगरी दवंडी वृत्तपत्राचे  नगर शहर व तालुका प्रतिनिधी व नगर तालुका पत्रकार संघांचे ते विद्यमान उपाध्यक्ष आहेत. तसेच अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या नवभारत माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय देहरे येथे शिक्षक म्हणून कार्यरत आहेत.
त्यांनी दैनिक नगर सह्याद्री वृत्तपत्रा मधून 2014 पासून पत्रकारितेला सुरुवात केली. त्यापाठोपाठ प्रभात, सार्वमत यासारख्या वृत्तपत्रा मध्ये देखील त्यांनी पत्रकारिता केली.
नगर तालुक्यातील दुष्काळी परिस्थिती व उपाय योजना, विनाअनुदानित शिक्षकांच्या व्यथा, नगर शहरातील  आरंभ पॉलिटिव्ह कॅन्सर सेंटर मार्फत कॅन्सर ग्रस्तांसाठी चालवल्या जाणार्‍या सामाजिक कार्याची दखल वृत्तपत्रिय लेखाच्या माध्यमातून घेतली. भोयरे पठार सारख्या दुर्गम भागातील बंद पडलेली एस टी बस  सेवा व त्यामुळे विद्यार्थी, वृद्ध यांची होणारी गैरसोय वृत्त पत्रात मांडून एस टी बस सेवा पूर्ववत करण्यास भाग पाडले. चार वर्षांपूर्वी दुष्काळी परिस्थितीमुळे घडलेल्या नगर तालुक्यातील शेतकर्‍यांना आत्महत्या सत्रावर सडेतोड लेखन केले. कोरोना काळात गोरगरीब गरजूच्या धावून जाणार्‍या वैद्यकीय सेवेतील डॉक्टरांच्या सामाजिक कार्यावर प्रकाशझोत टाकला.

No comments:

Post a Comment