आजपासून नो व्हॅक्सीन, नो एंट्री. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Saturday, December 25, 2021

आजपासून नो व्हॅक्सीन, नो एंट्री.

 आजपासून नो व्हॅक्सीन, नो एंट्री.

जिल्ह्यात ओमिक्रॉनचा रुग्ण आढळला.
नगर जिल्ह्यात नवे निर्बंध लागू.


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः जिल्ह्यातील सर्व सरकारी, निमसरकारी, खासगी आस्थापना व कार्यालये, व्यावसायिक व औद्योगिक आस्थापना, हॉटेल, मॉल, नाट्यगृहे, सिनेमागृहे, लॉन्स, मंगल कार्यालय, बाजार समिती, समारंभ, मेळावे तसेच सार्वजनिक ठिकाणी व कार्यक्रमात लसीकरण नाही-प्रवेश नाही असे निर्बंध लागू करण्यात आले आहेत. आस्थापनांनी त्यांच्या ठिकाणी येणार्‍या नागरिकांनी लसीकरणाची किमान एक मात्रा घेतल्याची खात्री करणे बंधनकारक राहील असे सांगण्यात आले आहे. त्याशिवाय प्रवेश नाकारण्यात येईल. तसेच करोना प्रतिबंधक नियमांचे पालन करणे बंधनकारक असेल नाहीतर, दंडात्मक कारवाई केली जाईल असा इशारा जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी दिला आहे.
जिल्ह्यात गेल्या तीन आठवड्यात परदेशातून एकूण 493 नागरिक नगर जिल्ह्यात परतले आहेत. त्यातील अधिक धोका असलेल्या देशातून आलेले 261 तर कमी धोका असलेल्या देशातून 232 नागरिक परतले आहेत. तर, त्यातील 492 जणांचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले होते. यातील तिघे करोनाबाधित आढळले आहेत. तर 44 जणांचे अहवाल प्रलंबित असल्याचे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले आहे. अहमदनगर जिल्ह्यामध्ये ओमिक्रॉनचा रुग्ण आढळल्याने खळबळ उडाली आहे. नायजेरिया येथून आलेल्या एक महिला व तिच्या मुलाची तपासणी केली असता कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे तपासणीत समोर आलं होते. त्यामुळे ओमिक्रॉनची तपासणी करण्यासाठी नमुने पुणे येथे पाठविण्यात आले होते. काल त्यांचा अहवाल आला असून, त्यामध्ये महिलेला ओमिक्रॉनची बाधा झाली असल्याचे समोर आले आहे. तर श्रीरामपूर शहरांमध्ये पहिला रुग्ण आढळला आहे. गेल्या आठ दिवसापूर्वी श्रीरामपूर शहरामध्ये नायजेरिया मधून आलेली 41 वर्षीय महिलेला ओमिक्रॉनची लागण झाली आहे.

No comments:

Post a Comment