सागर भांड टोळीचं सिनेमा स्टाईल पलायन. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Saturday, December 18, 2021

सागर भांड टोळीचं सिनेमा स्टाईल पलायन.

 सागर भांड टोळीचं सिनेमा स्टाईल पलायन.

कुविख्यात मोक्का लागलेल्या गुन्हेगार
ब्रिटिश कालीन राहुरी कारागृहाची सुरक्षित तटबंदी भेदली.

कारागृहाच्या खिडकीचे गज कापले. 2 कैदी पुन्हा गजाआड, 3 फरार.


राहुरी -
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या दौर्‍यात गुंतलेल्या पोलीस प्रशासनाला बेसावध ठेवत अहमदनगर जिल्ह्यात दरोडे, जबरी चोर्‍या, लुटमार, घातक शस्त्राने हिंसाचार अशा विविध गुन्ह्यांतील धुमाकूळ घालणार्‍या व नुकतीच महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा (मोक्का) अंतर्गत कारवाई केलेल्या राहुरीच्या कारागृहातील पोलिस पुत्र कुख्यात सागर भांड टोळीने आज पहाटे तीन वाजून पाच मिनिटांनी खिडकीचे गज कापून सिनेस्टाईल पलायन केले.
पळालेल्या पाच कैद्यांपैकी दोन जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले. तीन कैदी पसार आहेत. त्यांचा पोलिस शोध घेत आहेत. या घटनेनं पोलिस प्रशासनाच्या अब्रूची लक्तरे वेशीवर टांगली गेली आहेत.
राहुरी कारागृहात बराक नंबर चार मध्ये एकूण सतरा कैदी ठेवले आहेत. त्यात, टोळी प्रमुख कुख्यात सागर भांड सह पाच जण न्यायालयीन कोठडीत होते. कारागृहाच्या मागील भिंतीच्या छता जवळील खिडकीचे नऊपैकी तीन गज कापण्यात आले. बराक मधील इतर कैद्यांना धाक, दहशत निर्माण करुन, टोळीतील पाच जण शनिवारी पहाटे तीन वाजून पाच मिनिटांनी खिडकीतून बाहेर पडले. बाहेरील लोखंडी जाळी तोडून, कारागृहाची सुरक्षा भेदून त्यांनी पलायन केले. सागर अण्णासाहेब भांड (वय 25, रा. ढवण वस्ती, नगर, हल्ली रा. संकल्प सिटी, शिरूर, जि. पुणे), किरण अर्जुन आजबे (वय 26, रा. भिंगार),  नितीन उर्फ सोन्या मच्छिंद्र माळी (वय 22, रा. मोरे चिंचोली, ता. नेवासा), रवी पोपट लोंढे (वय 22, रा. घोडेगांव, ता. नेवासा), जालिंदर मच्छिंद्र सगळगिळे (वय 25, रा. टाकळीमिया, ता. राहुरी) अशी कारागृहातून पळालेल्या कैद्यांची नावे आहेत. पैकी भांड व आजबे यांना पोलिसांनी पाठलाग करून ताब्यात घेतले.
कारागृहाच्या समोरच्या बाजूने रखवाली करणार्‍या पोलिस कर्मचार्‍यांना कैदी पळाल्याची अजिबात खबर लागली नाही. दोन कैदी नगर- मनमाड रस्ता ओलांडून राहुरी न्यायालयाच्या बाजूच्या रस्त्याने पळतांना पोलिसांच्या रात्रीच्या गस्ती पथकाला दिसले. पोलिस कॉन्स्टेबल रंगनाथ ताके, दीपक फुंदे, देविदास कोकाटे, विकास साळवे यांनी पळणार्‍या दोघांचा पाठलाग केला. टोळी प्रमुख सागर भांड व किरण आजबे यांना अवघ्या पंधरा मिनिटात पोलिसांच्या पथकाने ताब्यात घेतले. नंतर पोलिसांना कैद्यांनी पलायन केल्याचे लक्षात आले. अत्यंत सुरक्षित समजल्या जाणार्‍या ब्रिटिशकालीन राहुरीच्या कारागृहाची सुरक्षित तटबंदी भेदून एकाच वेळी पाच कैद्यांनी पलायन करण्याची पहिलीच घटना आहे. पोलिस अधीक्षक मनोज पाटील, सहाय्यक पोलिस अधिक्षक डॉ. दीपाली काळे, पोलिस उपअधीक्षक राहुल मदने, नगरच्या स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक अनिल कटके, राहुरीचे पोलीस निरीक्षक राजेंद्र इंगळे, तहसीलदार फसियोद्दीन शेख यांनी आज सकाळी कारागृहाची पाहणी केली. राहुरी पोलिस ठाण्याची पाच व स्थानिक गुन्हे शाखेची दोन अशी सात पोलिस पथके पळालेल्या तीन गुन्हेगारांचा शोध घेत आहेत.
राहुरी पोलिस ठाण्यात फिर्यादी मयूर दिलीप देवकर यांनी दरोडा, जबर मारहाण, आर्म अ‍ॅक्टनुसार (-ीा -लीं) गुन्हा दाखल केला होता. कुप्रसिद्ध सागर भांड टोळीने गुन्हा केल्याचे निष्पन्न झाल्यानंतर त्याच्यासह टोळीतील अन्य पाच जणांना अटक करण्यात आली होती. ही टोळी कोणताही कामधंदा न करता संघटीतपणे बेकायदेशिररित्या स्वतःच्या आर्थिक फायद्याकरिता हिंसाचाराचा वापर करून, हिंसाचार करण्याची धमकी देऊन, धाक दपटशहा दाखवून जबरदस्तीने जबरी चोरी, दरोडा टाकून दहशत करीत होती. विशेष म्हणजे टोळीप्रमुख सागर भांड याचे वडील पुणे पोलिस दलामध्ये कार्यरत होते. या टोळीवरील गुन्ह्यांची गंभीर दखल घेऊन, पोलिस उपअधिक्षक संदीप मिटके, राहुरीचे पोलिस निरीक्षक राजेंद्र इंगळे यांनी मोक्का अंतर्गत कारवाईचा प्रस्ताव तयार करून, पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांच्यामार्फत पाठविला होता. त्यास, नाशिकचे विशेष पोलिस महानिरीक्षक बी.जी. शेखर यांनी मागील आठवड्यात मंजुरी दिली. टोळी प्रमुख सागर भांड याच्यावर राहुरी, एमआयडीसी (चखऊउ), कोतवाली, भिंगार कॅम्प, शिक्रापूर, संगमनेर शहर, सुपा येथील पोलिस ठाण्यात एकूण 27 गुन्हे दाखल आहेत. रवी लोंढे याच्यावर राहुरी, एमआयडीसी पोलिस ठाण्यात एकूण सहा गुन्हे दाखल आहेत. नितीन उर्फ सोन्या माळी याच्यावर राहुरी पोलिस ठाण्यात एकूण पाच गुन्हे दाखल आहेत. किरण आजबे याच्यावर कोपरगाव, राहता, शिर्डी, राहुरी पोलिस ठाण्यात एकूण नऊ गुन्हे दाखल आहेत. जालिंदर सगळगिळे याच्यावर राहुरी पोलिस ठाण्यात पाच गुन्हे दाखल आहेत.

No comments:

Post a Comment