मतदारांचा कौल कोणाला? - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Tuesday, December 21, 2021

मतदारांचा कौल कोणाला?

 मतदारांचा कौल कोणाला? नगरपंचायत निवडणूक रणधुमाळी

मनपा प्रभाग क्र.9 पोटविडणुकीत मतदार राजा उदासीन...

राष्ट्रवादीचे 3 आमदार, भाजपा खासदार, आघाडीच्या 2 मंत्र्यांची प्रतिष्ठा पणाला.

दुपारी 3 वाजेपर्यंत, कर्जत ः 46.6%  पारनेर ः 60% अकोला ः 60%
मनपा प्रभाग क्र.9ः 20% मतदा


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः कर्जत, अकोला नगरपंचायत व पारनेर नगर परिषद, नगर मनपा प्रभाग क्र. 9 पोटनिवडणुकीसाठी आज सकाळी मतदानास सुरुवात झाली. सकाळी थंडी जास्त असल्यामुळे मतदारांनी मतदान केंद्राकडे पाठ फिरविली पण सकाळी 9 नंतर थंडीचे प्रमाण कमी झाल्यावर मतदार घराच्या बाहेर पडू लागल्याचे दिसून आले. मनपा प्रभाग क्र. 9 पोटनिवडणुकीच्या मतदानासाठी मतदार फारसे उत्साही नसल्याचे दिसून आले. कर्जत नगरपंचायत निवडणुकीत आ. रोहित पवार भाजपा प्रदेशाध्यक्ष राम शिंदे, पारनेर नगरपरिषदेसाठी राष्ट्रवादीचे आ. निलेश लंके माजी आ. विजय औटी तर अकोले नगरपंचायत निवडणुकीसाठी आ किरण लहामटे व माजी आ. मधुकर पिचड पिता-पुत्र यांची प्रतिष्ठा पणाला लागली असून मतदारांचा कौल कोणाला हे निवडणूक निकालानंतर स्पष्ट होणार आहे.
दुपारी 3 वाजेपर्यंत मनपा प्रभाग क्र. 9 मधील पोटनिवडणुकीसाठी अतिशय कमी 20% मतदान झाले. कर्जतला 44% पारनेरला 60% अकोल्याला 60% मतदान झाल्याची आकडेवारी निवडणूक प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
सकाळी 11 नंतर मतदानाचा वेग वाढला. ठिकठिकाणी मतदारांचे स्वागत करण्यासाठी व मतदारांना मतदान केंद्रावर मतदानास भाग पाडण्यासाठी उमेदवारांसह पक्षाचे नेते समर्थकांनी मोठे प्रयत्न केल्याचे दिसून आले. नगर पंचायती सोबतच नगर शहरातील महानगरपालिकेच्या प्रभाग 9 क मधील एका जागेसाठी पोटनिवडणुकी साठी आज मतदान पार पडत आहे. भाजपचा तत्कालीन उपमहापौर श्रीपाद छिंदम याचे नगरसेकत्व रद्द झाल्याने ही पोटनिवडणुक होत आहे. मुख्य म्हणजे या प्रभागात छिंदमचे मोठे वर्चस्व असले तरी त्याच्या कुटुंबातील कोणीही निवडणुकीत नाही. या ठिकाणी भाजप विरुद्ध मविआ आघाडी कडून शिवसेना उमेदवारात मुख्य लढत आहे. या सकाळच्या सत्रात संथ गतीने आणि शांततेत मतदान होत असल्याचे दिसून आले. अकोला, कर्जत, पारनेर या ठिकाणी सकाळ पासूनच मतदानास सुरुवात होताच मतदानकेंद्रावर मोठी गर्दी दिसून आली नाही. एकूण दोन्ही ठिकाणी सकाळच्या सत्रात मतदानात संमिश्र प्रतिसाद दिसून येत होता. मात्र एकूण मतदानप्रक्रिया ही शांततेत सुरळीत सुरू असल्याचे चित्र सकाळच्या सत्रात दिसून आले. कर्जत आणि पारनेर या दोन्ही ठिकाणी परस्पर राजकीय संघर्ष मोठा आहे.
कर्जत मध्ये आ.रोहित पवार आणि राम शिंदे यांच्यात तर पारनेर मध्ये आ.निलेश लंके आणि शिवसेनेचे विजय औटी यांच्यात विळ्याभोपळ्याचे नाते आहे. निवडणूक प्रचारात याचे चित्र दोन्ही ठिकाणी दिसून आले आहे. ही निवडणूक दोन्ही बाजूंनी मोठी वर्चस्वाची आणि प्रतिष्ठेची करण्यात आल्याने प्रशासनावर निवडणुक प्रक्रिया शांततेत आणि भयमुक्त वातावरणात पार पाडण्याचे आव्हान असल्याने या दोन्ही ठिकाणी पोलीस बळ पुरेशा संख्येने तैनात करण्यात आले निवडणूक प्रशासनाने मतदान प्रकिया शांततेत पार पडावी म्हणून प्रयत्न केले. आज सर्वच मतदान केंद्रावर चोख बंदोबस्त ठेवला होता.
तिन्ही नगर पंचायतींच्या निवडणुकीत महाविकास आघाडीचे मंत्री व भाजपचे नेतेही प्रचारात उतरले. कर्जतला राष्ट्रवादीने भाजपचे उमेदवार फोडले. पारनेरला राष्ट्रवादी व शिवसेना अशा पक्षीय टीकाटिपणीपेक्षा लंके-औटी अशा टिपणीवर भर दिला गेला. तर अकोल्यात राष्ट्रवादी व शिवसेनेने काँग्रेसला दूर केल्याने तेथे काँग्रेसने स्वतंत्र अस्तित्व लढाई सुरू केली. महसूलमंत्री बाळासाहेब थोरातांनी पहिल्यांदा थोरातांनी भाजपऐवजी राष्ट्रवादीला टीकेचे लक्ष्य केले.
कर्जतमध्ये भाजपचे प्रा. शिंदे यांना पराभूत करून बारामतीच्या पवारांनी बाजी मारल्यावर कर्जतवर आपली आता मजबूत झाल्याचा त्यांचा दावा असला तरी आपणही अजून ताकद राखून आहोत, असे प्रा. शिंदेंचेही म्हणणे आहे. पारनेरलाही लंके व औटी यांची तर अकोल्यात डॉ. लहामटे व पिचड यांचीही अशीच स्थिती आहे. त्यामुळे या तिन्ही तालुक्यांवर नेमकी कोणाची व किती पकड आहे, हे तेथील तिन्ही नगर पंचायतींच्या निवडणूक निकालांतून स्पष्ट होणार आहे. आज होत असलेल्या नगर पंचायतीच्या निवडणुकीत या राजकीय ताकदीचा कस लागणार आहे. विधानसभेला मतदारांनी चूक केली की नाही केली, याचे स्पष्टीकरण कर्जत, पारनेर व अकोले नगरपंचायत निवडणुकांतून होणार आहे व या निकालावरच भविष्यात शिर्डी व नेवासे नगरपंचायत तसेच कोपरगाव, श्रीरामपूर, राहुरी, देवळाली प्रवरा, श्रीगोंदा, पाथर्ड़ी, जामखेड, शेवगाव, राहाता, संगमनेर या नगरपालिकांच्या निवडणुकांतील राजकीय हवा स्पष्ट होणार आहे.
प्रा. शिंदे, औटी व पिचड यांची वर्षानुवर्षाची सद्दी संपवून अनुक्रमे पवार, लंके व डॉ. लहामटे यांनी दोन वर्षांपूर्वी आपल्या विजयाचा झेंडा रोवला आहे. हा झेंडा डौलाने फडकत आहे की नाही, हे पाहण्याची संधी या तिन्ही आमदारांना त्यांच्या तालुक्यातील नगर पंचायतींच्या निवडणुकीत मिळाली आहे तर या झेंड्यांचा पाया भुसभुशीत झाल्याचे वास्तव मांडण्याची संधी या तिन्ही ठिकाणच्या माजी आमदारांना मिळाली आहे. या लढतींचे विशेष म्हणजे राज्यात शिवसेना-राष्ट्रवादी व काँग्रेस अशा तीन पक्षांचे महाविकास आघाडी सरकार असले तरी स्थानिक नगर पंचायतीच्या स्तरावर महाविकास विरुद्ध भाजप असे स्पष्ट चित्र नाही. कर्जत व अकोल्यात राष्ट्रवादी विरुद्ध भाजप तर पारनेरला राष्ट्रवादी विरुद्ध शिवसेना असे चित्र आहे. यात महाविकास आघाडीतील काँग्रेसचा तिसरा कोन कर्जत व पारनेरला फारसा दिसत नाही तर अकोल्यात मात्र स्वतंत्रपणे एकाचवेळी राष्ट्रवादी व भाजपला टक्कर देत आहे. त्यामुळेच या तिन्ही नगरपंचायतींचा निकाल काय लागेल यावरच आगामी राजकीय गणिते यापुढे आखली जाणार आहेत. या निकालावर भविष्यातील स्थानिक निवडणुकांसह लोकसभा व विधानसभेचीही बदलती राजकीय हवा स्पष्ट होणार आहे.

No comments:

Post a Comment