विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक पुन्हा लांबणीवर! - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Tuesday, December 28, 2021

विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक पुन्हा लांबणीवर!

 विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक पुन्हा लांबणीवर!


मुंबई -
आवाजी पद्धतीने विधानसभा अध्यक्ष पदाची निवडणूक घेण्यास राज्यपालांचा विरोध असताना काँग्रेस पक्षाचा ही निवडणूक आज कुठल्याही परिस्थितीत घेण्याचा आग्रह असला तरी शिवसेना व राष्ट्रवादीच्या नेत्यांनी शहाणपणा दाखवत निवडणूक लांबणीवर टाकली आहे. राज्यपालांचं मत डावलून निवडणूक घेतल्यास त्यांच्याकडून तीव्र प्रतिक्रिया उमटू शकते. राष्ट्रपती राजवटही लावली जाऊ शकते. त्यामुळे ही निवडणूक घेऊ नका, असं आघाडीतील काही नेत्यांचं म्हणणं पडलं. त्यामुळेही घटनात्मक पेचप्रसंग आणि राष्ट्रपती राजवटीची बला टाळण्यासाठी आघाडीने दोन पावलं मागे जाण्याचा निर्णय घेतला आहे.
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आज सकाळी 11 वाजता सरकारला एक बंद लिफाफा पाठवून त्यांना पुन्हा एकदा आपलं मत कळवलं. त्यानंतर वेगाने सूत्रे हलली. सत्ताधारी नेत्यांनी या पत्रानंतर मुख्यमंत्र्यांशी संपर्क साधून चर्चा केली. यावेळी स्वत: अजित पवार यांनी राज्यपालांचं मत डावलून निवडणूक घेण्यास विरोध केला. राज्यपालांचं मत डावलून निवडणूक घेतल्यास घटनात्मक पेच निर्माण होऊ शकतो. तसेच राज्यपालांकडून तीव्र प्रतिक्रिया उमटू शकते, असं मत अजित पवार यांचं व्यक्त केलं. त्यानंतर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांचा मुख्यमंत्र्यांना फोन आला. कायदेशीरबाबी तपासून चर्चा केली आहे. निवडणुका घेऊ नका, असा सल्ला शरद पवारांनी मुख्यमंत्र्यांना दिल्याचं सांगितलं जातं. पवारांच्या या फोननंतर मुख्यमंत्र्यांनीही निवडणुका न घेण्यावर सहमती दर्शविल्याचं सांगितलं जातं.
राज्यपालांच्या विरोधानंतरही सर्व तामझाम करून आघाडी सरकारने निवडणूक घेण्याचा निर्णय घेतला.मात्र, आधी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी निवडणुकीला केलेला विरोध आणि राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी निवडणूक न घेण्याचा दिलेला सल्ला यामुळे अखेर विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक न घेण्याचा निर्णय घेण्यात आल्याचं सूत्रांनी सांगितलं.

No comments:

Post a Comment