श्रीशिवप्रतिष्ठान हिन्दुस्थानतर्फे नवरात्रौत्सवात श्रीदुर्गामाता दौड. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Saturday, October 2, 2021

श्रीशिवप्रतिष्ठान हिन्दुस्थानतर्फे नवरात्रौत्सवात श्रीदुर्गामाता दौड.

 श्रीशिवप्रतिष्ठान हिन्दुस्थानतर्फे नवरात्रौत्सवात श्रीदुर्गामाता दौड.

शहरासह जिल्हाभर नियोजन बैठक, जय्यत तयारी सुरु.


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः श्रीशिवप्रतिष्ठान हिन्दुस्थानतर्फे सालाबादप्रमाणे नवरात्रौत्सवात श्रीदुर्गामाता दौडची जय्यत तयारी करण्यात आली असून नगर शहरासह जिल्हाभर नियोजन बैठका घेण्यात आल्या आहेत. या बैठकांना मोठा प्रतिसादही मिळाला आहे. नवरात्रौत्सवात श्रीदुर्गामाता दौडचे आयोजन करण्याची परंपराच निर्माण झाली असून ती जतन करण्यासाठी श्रीशिवप्रतिष्ठान हिन्दुस्थानचे धारकरी व धर्माभिमानी अथक परिश्रम घेत आहेत, अशी माहिती श्रीशिवप्रतिष्ठान हिन्दुस्थानचे जिल्हा प्रमुख बापू ठाणगे यांनी दिली.
ते म्हणाले, श्रीशिवप्रतिष्ठान हिन्दुस्थानच्या माध्यमामधून प्रतीवर्षीच्या नवरात्रौत्सवामध्ये श्रीदुर्गामाता दौडचे आयोजन अत्यंत श्रध्देने करण्यात येते. हिंदू तरूणांमध्ये प्रखर राष्ट्रप्रेम आणि धर्मप्रेम निर्माण करण्याची ताकद दुर्गामाता दौडमध्ये असल्याचे निदर्शनास येऊ लागले आहे. अनेकांनी ते अनुभवलेही आहे. नवरात्र उत्सवामध्ये सकाळच्या मंगलमय वातावरणात हिंदू संस्कृतीस साजेसा पेहराव करून परिसरातील देवी मंदिरांमध्ये दर्शनास जाण्यासाठी काढण्यात येणारी ही प्रभात फेरी प्रखर राष्ट्र भक्तीचे दर्शनच घडवते. या फेरीमध्ये तरूण स्वयंस्फूर्तीने सहभागी होतात. हिंदू धर्म कार्यात आपणही खारीचा वाटा उचलला पाहिजे ही भावना मना-मनात निर्माण होते. दौडमध्ये सहभागी झालेल्या हिंदू धर्मप्रेमींचे संघटन धर्मप्रेम आणि राष्ट्रप्रेम वृध्दींगत करण्याची मोलाची कामगिरीच पार पाडते.
घटस्थापना ते विजयादशमी दरम्यान दररोज नगर शहरात नेहमीप्रमाणे माळीवाडा बसस्थानकाजवळील छत्रपती श्री शिवाजी महाराज चौकापासून श्रीदुर्गामाता दौड निघेल. शहरातील विविध मार्गावर परंपरेप्रमाणे श्री दुर्गामाता दौड जात राहिल. नगर जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातही श्रीदुर्गामाता दौड परंपरेप्रमाणे नवरात्र उत्सवात पार पडेल. नगर तालुक्यामध्ये श्रीदुर्गामाता दौडचे नियोजन तालुकाप्रमुख संदिप खामकर आणि ऋषभ गादिया यांनी परिश्रमपूर्वक केले आहे. यावर्षी प्रथमच सावेडीमधील प्रोफेसर कॉलनी चौकामधून श्रीदुर्गामाता दौडची आखणी करण्यात आली आहे. सावेडीमधील युवकांची श्रीदुर्गामाता दौड सावेडी परिसरातही व्हावी अशी उत्स्फूर्त इच्छा असल्याने संपूर्ण नवरात्र उत्सवात प्रोफेसर कॉलनी चौकामधून श्रीदुर्गामाता दौड सकाळी 6 वाजता निघत राहिल. शासनाने घालून दिलेल्या कोरोना प्रतिबंधासाठीच्या सर्व नियमांचे तंतोतंत पालन करीत या दौडमध्ये सावेडीमधील हिंदू धर्मप्रेमी युवकांनी सहभागी व्हावे, असे जाहीर आवाहन श्रीशिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे जिल्हा प्रमुख बापू ठाणगे यांच्यासह परमेश्वर गायकवाड, विनोद काशीद, पै.आशिष क्षीरसागर, पै. नरेंद्र दातीर, अमोल शिंदे, अमोल हुंबे, अंकुश तरवडे, अनिल राऊत आदींनी केले आहे. श्री दुर्गा माता दौड आपल्या गल्लीत, कॉलनीत, परिसरात येणार असल्याची माहिती घेऊन परिसर सडा टाकून रांगोळ्यांनी सजवावा. आकर्षक रंगीबेरंगी रांगोळ्यांच्या पायघड्या घालाव्यात. दौडचे आगमन होताच फटाक्यांची जोरदार आतषबाजी करावी. फुलांची वृष्टी करत जल्लोषात स्वागत करावे. उच्चस्वरामध्ये आई जगदंबेचा जयघोष करून वातावरण दणाणून सोडावे. गेली दोन वर्षे बंद असलेली मंदिरे घटस्थापनेच्या पहिल्याच माळेपासून सुरू करण्याचा महत्वपूर्ण निर्णय मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी घेतला असून या निर्णयाचे स्वागत म्हणून नवरात्रौत्सव मोठ्या उत्साहात पार पाडताना कोरोनाचे विघ्न पुढे येणार नाही याची दक्षता डोळ्यात तेल घालून घ्यावी, असेही आवाहन श्रीशिवप्रतिष्ठान हिन्दुस्थानने केले आहे. श्री दुर्गामाता दौड आपल्या भागात केव्हा येणार हे जाणून घेण्यासाठी वा अधिक माहितीसाठी 9422229887, 9657873427 किंवा 9270773987 या भ्रमणध्वनीवर संपर्क साधावा.

No comments:

Post a Comment