महाराष्ट्र विकासात देशात एक क्रमांकावर असावा - नितीन गडकरी. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Saturday, October 2, 2021

महाराष्ट्र विकासात देशात एक क्रमांकावर असावा - नितीन गडकरी.

 महाराष्ट्र विकासात देशात एक क्रमांकावर असावा - नितीन गडकरी.

3 हजार 28 कोटींच्या महामार्गाचं भूमिपूजन.. 1 हजार 46 कोटींच्या महामार्गांचे लोकार्पण..
शरद पवार यांनी केली नितीन गडकरींची प्रशंसा..


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः महाराष्ट्र ही साधुसंतांची पावन भूमी आहे येथील संत-महापुरुषांच्या विचारांचा वारसा मला मिळाला आहे. मी महाराष्ट्राचा असल्याने नवी दिल्लीत महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करतो. त्यामुळे महाराष्ट्र नेहमीच विकासात देशात एक क्रमांकावर असावा अशीच माझी इच्छा आहे असे प्रतिपादन केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांनी केला आहे. अहमदनगर जिल्ह्यातील महामार्गांचे लोकार्पण व कोनशिला समारंभ आज पार पडला. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत झालेल्या कार्यक्रमात नितीन गडकरी यांनी विकासाचे अनेक मुद्दे अधोरेखित करीत त्यांचे मनातील व्हिजन भाषणात व्यक्त केलं.
गडकरी पुढे म्हणाले की, आज नगर जिल्ह्यातल्या अनेक कामांचं भूमीपूजन होतंय आणि लोकार्पण पण होतंय. स्वाभाविकपणे खासदार सुजय विखेंनी आपल्या भाषणात सांगितलं की नगर जिल्ह्याला राष्ट्रीय महामार्गातून सर्वाधिक निधी मिळाला. त्यांनी हे उद्गार काढले. याबद्दल मी त्यांचा आभारी आहे. पण मी ज्या ज्या जिल्ह्यांत जातो तिथला खासदार हेच म्हणतो, तर ज्या राज्यांत जातो तिथले मुख्यमंत्रीही आम्हालाच अधिक मिळालं, असं सांगत असतात. खरं म्हणजे आपल्या देशाचा विकास झाला पाहिजे, त्यासाठी 4 गोष्टी महत्त्वाच्या आहेत. वॉटर, पॉवर, ट्रान्सपोर्ट आणि कम्युनिकेशन, आपल्या देशामध्ये जर उद्योग सुरु व्हायचे असतील तर कोणताही उद्योजक पहिल्यांदा विचार करतो की या चार गोष्टी देशात आहेत का? असेल तर तिथे उद्योग येतात. त्यामुळे अनेक रोजगार निर्माण होतात., असं ही गडकरी म्हणाले.
या कार्यक्रमात राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांची मुक्तकंठाने स्तुती केलीएखादा नेता देशाच्या उभारणीत कसं योगदान देतो हे गडकरींकडे पाहून लक्षात येतं, अशी स्तुती शरद पवार यांनी केली आहे. नगरमधील विविध विकासकामांच्या भूमिपूजनाच्या निमित्ताने शरद पवार आणि नितीन गडकरी आज एकाच मंचावर आले होते. त्यावेळी पवारांनी गडकरींची मुक्तकंठाने स्तुती केली. हा कार्यक्रम या जिल्ह्याच्या विकासाला दिशा देणारा कार्यक्रम आहे. मला दुसरीकडे एक कार्यक्रम होता, पण मला रोहित पवार यांच्याकडून निरोप मिळाला की गडकरी यांनी मी यावं असं सांगितलं. त्यामुळे मला येणं भाग पडलं. इतर कार्यक्रमाला गेलं की वर्षानुवर्षे काही बदल दिसत नाही. पण गडकरी यांच्या कार्यक्रमाला गेलं की दोन चार दिवसांत फरक दिसतो. एखादा नेता देशाच्या उभारणीत कसं योगदान देतो हे गडकरी यांच्याकडे पाहून लक्षात येतं, असं पवार म्हणाले. कोणताही लोकप्रतिनिधी त्यांच्याकडे गेला तर ते त्याला पक्ष न पाहता मदत करतात, असंही त्यांनी सांगितलं. सगळ्या वाहतुकीत रस्त्यावरची वाहतूक समाजाच्या हिताची असते. हे काम गडकरी यांनी आपल्या हातात घेतला आहे. गडकरी यांनी ही जबाबदारी घेण्याआधी देशात 5 हजार किलोमीटर काम होत होत ते आता 12 हजार किलोमीटरवर गेलं आहे, असं त्यांनी सांगितलं.
केंद्रात फक्त नितीन गडकरी यांच्याच खात्याचे काम उठावदार आहे. गडकरी हजारो कोटी रुपयांची कामे करतात, आकडे पाहूनच आमचे डोळे पांढरे होतात, अशा शब्दात मुश्रीफ यांनी गडकरींच्या कामाची प्रशंसा केली. नगर जिल्ह्यातील नवीन कामाच्या मागणीकडे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी लक्ष वेधले.
या कार्यक्रमाला नितीन गडकरी, शरद पवार, मंत्री हसन मुश्रीफ, मंत्री प्राजक्त तनपुरे, खासदार सुजय विखे, खासदार सदाशिवराव लोखंडे, आमदार रोहित पवार, माजी मंत्री बबनराव पाचपुते, माजी मंत्री राम शिंदे, संग्राम जगताप, अरुण काका जगताप, मोनिका राजळे, लहू कानडे, निलेश लंके, किरण लहामटे, राजश्री घुले पाटील उपस्थित होते.

दिलीप गांधींची काढली आठवण...
  उड्डाणपूल तसेच नगरमधील अन्य रस्त्यांच्या कामासांठी दिलीप गांधी यांनी कमीत कमी आठ दहा चकरा मारल्या. भूमीपूजनासाठीही त्यांनी बोलवले होते. आज हा कार्यक्रम होत असताना दिलीप गांधी आपल्यात नाही याची आठवण येते. ते आज असायला हवे होते. जिल्ह्यात भूसंपादनाच्या अनेक अडचणी आहेत. त्यादृष्टीने पालकमंत्री व जिल्हाधिकार्यांनी लक्ष घालून भूसंपादनाची अडचण दूर करा. नगरमधील उड्डाणपूल प्रगतीपथावर आहेच. रिंग रोडवरील पूल व नदीनाल्यांचे खोलीकरण करावी. सुरत-नाशिक-अहमदनगर-सोलापूर हा संपूर्ण नवीन महामार्ग तयार करीत आहोत. - नितीन गडकरी, केंद्रीय मंत्री

जिथं जाईल.. तिकडचे खासदार, मुख्यमंत्री असंच म्हणतात..
  नगर जिल्ह्याला रस्त्यांसाठी सर्वाधिक निधी मिळाला. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी नगरवर विशेष लक्ष दिलंंय, अशा शब्दात नगरचे खासदार सुजय विखे यांनी गडकरींचं कौतुक केलं. त्यावर गडकरींची भाषणाची वेळ येताच त्यांनी कोटी केली. तुम्ही काढलेल्या उद्गारांबद्दल आभारी आहे पण मी जिथे जिथे जाईल तिथले खासदार, मुख्यमंत्री असंच बोलत असतात, असं गडकरी म्हणाले. त्यावर मंचावर बसलेल्या सुजय विखे आणि माजी मंत्री बबनराव पाचपुतेंना हसू अनावर झालं.

महाराष्ट्राच्या सुसंस्कृत राजकीय संस्कृतीचं दर्शन..
  राजकारणाच्या नगर पॅटर्नची महाराष्ट्रात नेहमी चर्चा असते. राज्यात कशीही परिस्थिती असली तरी इथलं राजकारण काहीतरी वेगळं असतं. आजही कट्टर विरोधक असलेले भाजपा-राष्ट्रवादी-काँग्रेसचे नेते कार्यकर्ते कार्यक्रमात एकत्र दिसले. या सोहळ्याकडे नगरसह महाराष्ट्राचं लक्ष लागलं होतं. महाराष्ट्राच्या सुसंस्कृत राजकीय संस्कृतीचं दर्शन या कार्यक्रमात घडलं. अहमदनगरचे भाजप खासदार सुजय विखे पाटील यांनी यांनी राष्ट्रवादीच्या नेत्यांचं जंगी स्वागत केलंशरद पवार आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या स्वागताला नगरमधील सगळे राजकीय नेते हेलिपॅडवर जमले होते. त्यावेळी सुजय विखे यांनी नगरचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या पाया पडून त्यांचे आशीर्वाद घेतले तर आमदार रोहित पवार यांना हँडशेक करुन त्यांची खुशाली विचारली. हेलिपॅडवर शरद पवार आणि नितीन गडकरींचं स्वागत करण्यासाठी राष्ट्रवादी आणि भाजपच्या नेते कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती. खासदार सुजय विखे पाटील, माजी मंत्री राम शिंदे, माजी आमदार शिवाजीराव कर्डिले, तर राष्ट्रवादीकडून मंत्री हसन मुश्रीफ, संग्राम जगताप, रोहित पवार यावेळी उपस्थित होते. यावेळी भाजप नेत्यांनी राष्ट्रवादीच्या नेत्यांसोबत गप्पा मारल्या, काही वेळ हास्यविनोदात देखील दंग झाले.

No comments:

Post a Comment