नेवासा तालुक्यातील उपसा सिंचन योजनांना गती द्या ः गडाख - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Tuesday, September 14, 2021

नेवासा तालुक्यातील उपसा सिंचन योजनांना गती द्या ः गडाख

 नेवासा तालुक्यातील उपसा सिंचन योजनांना गती द्या ः गडाख


नगरी दवंडी/प्रतिनिधी
नेवासा ः अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यात अस्तित्वात असलेल्या पानसवाडी-लोहगाव-मोरेचिंचोरे, घोडेगाव-लोहगाव-झापवाडी, मांडेगव्हाण-मोरगव्हाण- झापवाडी आणि लोहगाव-मोरेचिंचोरे-धनगरवाडी या चार उपसा सिंचन योजनांना गती देण्याचे निर्देश मृद व जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांनी दिले.
मंत्रालयात श्री. गडाख यांच्या अध्यक्षतेखाली नेवासा मतदारसंघातील उपसा सिंचन योजनांच्या सक्षमीकरणाबाबत आढावा बैठक झाली. या बैठकीला जलसंधारण विभागाचे अपर आयुक्त तथा मुख्य अभियंता व्ही.वी.नाथ, व्यवस्थापकीय संचालक श्री. कुशीरे, प्रादेशिक जलसंधारण अधिकारी राजेंद्र काळे, अवर सचिव दि.शा.प्रसाळे, अहमदनगर जिल्हा जलसंधारण अधिकारी पी.बी.गायसमुद्रे आदी उपस्थित होते.
जलसंधारण मंत्री श्री. गडाख म्हणाले, या उपसा सिंचन योजनांचे सर्वेक्षण व बंदिस्त नलिका प्रणालीच्या कामासाठी पुण्यातील खाजगी अभिकरणास कार्यादेश देण्यात आला होता. या एजन्सीने सर्वेक्षण व संकल्पन अहवाल दिला असून त्यानुसार 2395 हेक्टरपैकी 10 टक्के क्षेत्र सिंचनाखाली आले आहे. उर्वरित 90 टक्के क्षेत्र सिंचनाखाली पुर्नस्थापना करण्याची आवश्यकता आहे. सद्य:स्थितीत अस्तित्वातील खुल्या वितरण प्रणाली ऐवजी बंद नलिका वितरण प्रणालीद्वारे पाणी वितरीत करावे. तसेच ठिंबक व तुषार सिंचनाद्वारे मोठ्या प्रमाणात सिंचन करावे. संकल्प, परिगणके जसे विसर्ग, पाईपची लांबी-व्यास-जाडी, पंप हाऊस, पंप संख्या, वॉल, पाईप नेटवर्क आणि वीज इत्यादी बाबी अंतिम करुन घेण्याचे निर्देशही श्री. गडाख यांनी यावेळी दिले. उपसा सिंचन योजना स्थायी स्वरुपात कार्यान्वित करण्यासाठी सौर उर्जा प्रकल्पांची निर्मिती करण्याची गरज आहे. त्याप्रमाणे या उपसा सिंचन योजनेच्या सक्षमीकरणासाठी लवकरात लवकर कार्यवाही करण्याच्या सूचना देऊन या योजनांमुळे वहनव्यय कमी होऊन पाणी वापर कार्यक्षमता वाढेल,प्रत्यक्ष सिंचीत होणार्‍या क्षेत्रामध्ये वाढ होईल, त्यामुळे शेतकर्‍यांच्या उत्पन्नामध्ये वाढ होऊन शाश्वत सिंचनाची संकल्पना यशस्वी होईल, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.
या बैठकीच्यावेळी नेवासा तालुक्यातील रांजनगाव व सौंदाळा उपसा सिंचन योजनेचे पुनरुज्जीवन करण्याबाबतही चर्चा करण्यात आली.

No comments:

Post a Comment