हसन मुश्रीफांवर भ्रष्टाचाराचे आरोप! - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Monday, September 13, 2021

हसन मुश्रीफांवर भ्रष्टाचाराचे आरोप!

 हसन मुश्रीफांवर भ्रष्टाचाराचे आरोप!  नगर जिल्हा पालकमंत्री..

2700 पानांचे पुरावे असल्याचा भाजपा नेते किरीट सोमय्या यांचा दावा..
 सोमय्यांनी कोल्हापुरात येऊन खातरजमा करावी ः हसन मुश्रीफ.


मुंबई -
भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी ठरल्याप्रमाणे आज दुपारी 1 च्या सुमारास पत्रकार परिषद घेऊन राज्य सरकारमधील अजून एका मंत्र्यावर भ्रष्टाचाराचे आणि शेकडो कोटींचा घोटाळा केल्याचे आरोप केले आहेत.अनिल परब, अनिल देशमुख अशा सत्ताधारी मंत्र्यांनंतर आता किरीट सोमय्या यांनी आपला मोर्चा राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार नगर जिल्ह्याचे पालकमंत्री राज्याचे ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडे वळवला आहे. मुश्रीफ यांनी केलेल्या घोटाळ्यांचे तब्बल 2700 पानी पुरावेच आपण आयकर विभागाकडे सादर केल्याचं किरीट सोमय्या यांनी आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत जाहीर केलं. तसेच, फक्त हसन मुश्रीफच नाही, तर त्यांच्या पूर्ण कुटुंबाच्या नावे हे पुरावे असल्याचं ते म्हणाले. त्याशिवाय, यासंदर्भात मंगळवारी ईडीकडे अधिकृत तक्रार दाखल करणार असल्याचं ते म्हणाले.
मी राज्य सरकारमधील 11 भ्रष्टाचारी मंत्र्यांची यादी जाहीर केली होती. पण दुर्दैवाने 11 जणांच्या टीममध्ये राखीव खेळाडूंची संख्या वाढायला लागली आहे. हसन मुश्रीफ यांच नाव राखीव खेळाडूंमध्ये आम्ही वाढवत आहोत. हसन मुश्रीफ परिवाराने शेकडो कोटींचे घोटाळे केले आहेत. बोगस कंपन्या, सेल कंपन्यांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणार आर्थिक गैरव्यवहार, बेनामी संपत्ती केल्याचे माझ्याकडे 2700 पानांचे पुरावे आहेत. ते मी आयकर विभागाला सोपवले आहेत, असा आरोप किरीट सोमय्या यांनी केला आहे.
सीआरएम इथे प्रविण अगरवाल ऑपरेट करतात. या कंपनीतून हसन मुश्रीफ यांचे सुपुत्र नाविद मुश्रीफ यांनी दोन कोटींचं लोन घेतल्याचं दाखवलंयय. या कंपनीवर 2017-18मध्ये प्रतिबंध आला होता. त्या कंपनीतून ज्यांनी एंट्री घेतली, त्यांच्यावर कारवाई सुरू झाली आहे. त्याच कंपनीतून नाविद मुश्रीफ यांनीही निवडणुकीसाठी फॉर्म भरला होता. त्यांच्या निवडणूक प्रतिज्ञापत्रात दाखवलंय की सीआरएम कंपनीत 2 कोटी 45 लाख 354 एवढी रक्कम दाखवली आहे. सीआरएम ही शेल कंपनी असल्याचं सिद्ध झालं आहे, असा दावा सोमय्या यांनी पत्रकार परिषदेत केला. मरू भूमी कंपनीत 3 कोटी 5 लाख रक्कम दाखवली आहे. बाप-बेटे दोघांविरोधात 127 कोटींचे तर पुरावे आहेत आमच्याकडे. हसन मुश्रीफ यांच्या विधानसभा निवडणूक प्रतिज्ञापत्रात पत्नीच्या अकाऊंटमध्ये सर संताजी घोरपडे साखर कारखान्याचे 3 लाख 78 हजार 340 रुपयांचे शेअर्स दाखवले आहेत. शाएदा हसन मुश्रीफ यांच्या नावाने. 2018-19 मध्ये मुश्रीफ परिवारावर आयकर विभागाचे सर्च झाले. त्यातून आलेली माहिती दडपण्याचा प्रयत्न झाला. त्यात 147 कोटी रुपयांचे पुराव्यानिशी बेनामी व्यवहार सिद्ध झाले आहेत. हसन मुश्रीफ आणि त्यांच्या कुटुंबाने सर सेनापती संताजी-धनाजी साखर कारखान्यात 100 कोटींहून अधिक भ्रष्टाचाराचा पैसा पार्क केला आहेत, असे गंभीर आरोप किरीट सोमय्या यांनी केले आहेत.
उद्या मुंबई ईडीकडे अधिकृत तक्रार दाखल करणार आहे. 2700 पानांचे पुरावे त्यांना देणार आहे. परवा दिल्लीला अर्थविभाग, ईडी, कंपनी मंत्रालय इथे देखील हे पुरावे मी सादर करणार आहे. ठाकरे सरकारच्या डर्टी घोटाळा 11 मध्ये राखीव खेळाडूंची भरती चालूच राहणार आहे. माझ्याकडे 2 मंत्र्यांच्या फाईल तयार होत्या. राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना. आज एनसीपीच्या एका मंत्र्याचा घोटाळा उघड केला आहे. काही दिवसांनी शिवसेनेच्या मंत्र्याचा देखील घोटाळा उघड करू, असा इशारा किरीट सोमय्या यांनी दिला आहे. दरम्यान, या प्रकरणांमध्ये नेमका घोटाळा कसा होतो, हे देखील किरीट सोमय्या यांनी सांगितलं आहे. समजा, एखाद्याकडे जर करप्शनचे पैसे आले, तर तो रोख पैसे ऑपरेटरला देतो. शेल कंपन्यांचे ऑपरेटर असतात. या प्रकरणात प्रवीण अगरवाल आहेत, भुजबळांच्या केसमध्ये जैन म्हणून होता. त्यांना आपण कॅश देतो. ही कॅश घेतल्यानंतर शेल कंपनी ऑपरेटर त्यांची लेअर बनवतात. आधी एका कंपनीत टाकतात. मग त्या कंपनीतून चेक घेऊन दुसर्‍या कंपनीत करतात. मुश्रीफांच्या प्रकरणात नाविदच्या खात्यात सीआरएम कंपनीने 2 कोटींचा चेक दिला. सीआरएमच्या खात्यात तो चेक अजून एका लेअरवाल्या कंपनीतून आला. त्या कंपनीमध्ये कॅश भरली गेली. सगळ्यात शेवटी ती कॅश कुणाला मिळाली, ते पाहायचं असतं, असं सोमय्या म्हणाले.

किरीट सोमय्यांनी माझ्या पक्षाविरुद्ध, पवारसाहेबांविरुद्ध बिनबुडाचे आरोप केले आहेत. सोमय्यांनी माझ्यावर 127 कोटींच्या घोटाळ्याचा आरोप केला. किरीट सोमय्यांच्या सीए पदवीबद्दलच शंका आहे. कारण त्यांनी जी कागदपत्र दाखवली ती खजउ च्या वेबसाईटवर उपलब्ध आहेत. जर ती खोटी असती तर त्याचवेळी समोर आलं असतं. आम्ही निवडणूक आयोगालाही कागदपत्र दिली आहेत. आपण नवं काय करतोय असा राणाभीमदेवी थाटात आरोप सोमय्यांनी केला. माझ्यावर इन्कम टॅक्सने धाड टाकली त्यात काहीच मिळालं नाही. अडीच वर्ष झाली धाड टाकून, त्यावर काही कारवाई नाही. आता किरीट सोमय्या उठून आरोप करत आहेत. मला वाटतंय किरीट सोमय्यांना काही माहिती नसावी. आमचे कोल्हापूरचे नेते चंद्रकांत पाटील, समरजीत घाटगे यांनी माहिती दिली असेल. सोमय्यांनी कोल्हापुरात येऊन खातरजमा करायला हवी होती.
- हसन मुश्रीफ

No comments:

Post a Comment