गणेशाचे स्तवन! - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Monday, September 13, 2021

गणेशाचे स्तवन!

गणेशाचे स्तवन! 

अभंग साहित्यांचा महत्त्वपूर्ण भाग


अहमदनगर ः
श्री गणेशाचे स्तवन हा अभंग साहित्याचा महत्त्वपूर्ण भाग आहे. संत तुकारामांनी आपल्या अभंगातून श्री गणेशाचे ओमकार रूप वर्णिले आहे. ओमकार प्रधान रुप गणेशाचे, हे तिन्ही देवांचे जन्मस्थान अकार तो ब्रम्हा, उकार तो विष्णू, म कार महेशु जाणियेला ऐसे तिन्ही देव, जेथोनी उत्पन्न, तो हा गजानन मायबाप तुका म्हणे ऐसे आहे वेदवाणी, पहावे पुराणी व्यासाचिया सृष्टीच्या उत्पत्तीच्या वेळी जो पहिला नादमंत्र निर्माण झाला तो म्हणजे ओमकार होय. अकार, उकार, मकार या तीन मात्रांनी ओमकार सिद्ध होतो. यातील ’अ’ कार म्हणजे विश्वनिर्मितीचे अधिकारी ब्रह्मदेव, उकार मात्रा म्हणजे श्रीहरी आणि सृष्टीचे पालनकर्ते श्री शिवशंकर म्हणजे उदर होय. ब्रह्मा, विष्णू आणि महेश हे तीन देव मूळ गणेश तत्त्वापासून निर्माण झाले आहेत. तुकाराम महाराजांनी गाथेमध्ये श्री गणेशाची मानस पूजा सुंदर शब्दात मांडली आहे,
धरोनिया फरश करी, भक्तजनांची विघ्ने वारी ।
ऐसा गजानना महाराजा,
त्याचे चरणी लाहो माझा ॥
शेंदूर शमी बहु प्रिय त्याला, तुरा दुर्वांचा शोभला ।
उंदीर असे जयाचे वाहन,
माथा जडित मुकुट पूर्ण,
नाग यज्ञोपवीत रुळे,
शुभ्र वस्त्रे शोभित साजरे,
भाव मोदक हारा भरी,
तुका भावे पूजा करी ॥
अशी श्री गणेशाच्या चरणी भावगंधीत शब्दपुष्पे अर्पिली आहेत. गणेश सकल कलांचा अधिपती आहे. संत तुकाराम नर्तन करणार्‍या गणेशाचे संकीर्तन करताना म्हणतात,
श्री गणराया लवकर येई ।
भेटी सकळांशी देई,
नाचत आले हो गणपती,
पायी घागर्‍या वाजती ॥
या क्षेपक अभंगात ’विठ्ठल गणपती दुजा नाही’ असा उल्लेख आहे. हा अभंग भारुड व लळिताच्या प्रारंभी म्हणत असताना गणपती ऋद्धी-सिद्धीसह रंगमंचावर अवतरतात आणि बुद्धी दात्या, विघ्नहर्त्या गणपतीचे पूजन करून कलाविष्काराला प्रारंभ होतो. तसेच दुसर्‍या अभंगात तुकाराम महाराज श्री गणेशांना गुरूराजा असे संबोधतात.
नमिला गणपती माऊली सारजा, आता गुरूराजा दंडवत ।
गुरुराया चरणी मस्तक ठेविले आपल्या स्तुतीला द्यावी मती,
गुरुराया तुज ऐसा नाही सखा, कृपा करोनी रंका धरी हाती,
तुका म्हणे माता पिता गुरू बंधू, तूच कृपासिंधू गणराया ॥
अशाप्रकारे तुकाराम महाराजांनी माता, पिता, गुरू, बंधू अशा रुपांत या मंगलमूर्ती गणेशाचे दर्शन घडवले आहे. आणि ज्ञानप्राप्तीसाठी तसेच भौतिक व आधिभौतिक पातळीवरील अरिष्टे दूर करण्यासाठी श्री गणेशाचे चिंतन करण्याचा उपदेश केला आहे.

No comments:

Post a Comment