मनरुपी पटलावर उमटलेले भावतरंग म्हणजे साहित्य ! ः प्रा. भणगे - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Monday, September 6, 2021

मनरुपी पटलावर उमटलेले भावतरंग म्हणजे साहित्य ! ः प्रा. भणगे

 मनरुपी पटलावर उमटलेले भावतरंग म्हणजे साहित्य ! ः प्रा. भणगे

18वे ग्रामीण साहित्य संमेलन व ‘वादळी स्वातंत्र्य’चा वर्धापनदिन व विशेषांकाचे प्रकाशन

सामाजिक, राजकीय, पत्रकारिता, कृषी, आरोग्य, सहकार क्षेत्रातील मान्यवरांना वादळी सन्मान पुरस्कारांचे वितरण



नगरी दवंडी/प्रिंतनिधी
श्रीगोंदा ः
शब्द हे शब्द असतात. प्रत्येक शब्दाला एक इतिहास असतो. प्रत्येक इतिहास हा शब्दातून लिहिला जातो. शब्दाचा अर्थ शोधताना मनरुपी पटलावर उमटलेले भावतरंग म्हणजे साहित्य.साहित्यामधील कल्पनांचा अविष्कार शोधताना बालपणी झालेल्या संस्कारांमधूनच साहित्य निर्माण होते. माझ्या शालेय जीवनातील गुरूंनी दिलेल्या शब्दरुपी धनाने मला आज या श्रीगोंद्यातील 18व्या साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद भूषविण्याची संधी उपलब्ध करून दिली, अशी भावना साहित्य संमेलनाचे अध्यक्ष प्रा. डॉ. शैलेंद्र भणगे यांनी व्यक्त केले.
काल श्रीगोंदा येथील रत्नमंगल कार्यालयात 18 वे ग्रामीण साहित्य संमेलन व ‘साप्ताहिक वादळी स्वातंत्र्य’चा वर्धापनदिन व विशेषांकाचा प्रकाशन सोहळा विविध मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला. या संमेलनात जिल्ह्यातील अनेक कवींनी कविता सादर करून श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले.
याप्रसंगी प्रा. भणगे पुढे म्हणाले की, या साहित्य संमेलनात नवकवींनी सादर केलेल्या कविता ऐकणे हा माझ्या आयुष्यातील सुवर्णक्षण आहे. राष्ट्रवादीचे नेते घनःश्याम शेलार यांनी साहित्य संमेलनाचे संस्थापक अशोक शर्मा व साप्ताहिक वादळी स्वातंत्र्यचे संपादक जितेंद्र पितळे यांच्या कार्याचे कौतुक केले. भाजपा नेत्या सुवर्णाताई पाचपुते, सामाजिक कार्यकर्ते अ‍ॅड. सुभाष डांगे यांनी अशी संमेलने, समारंभ आयोजित करण्यामागे किती कष्ट पडतात याची जाणीव करून दिली. दै. नगरी दवंडीचे कार्यकारी संपादक राजकुमार कटारिया यांनी दैनिके, साप्ताहिके चालविण्यासाठी येणार्‍या अडचणी सांगून पत्रकारितेतील अपप्रवृत्तींवर प्रहार केले. प्रतिक्षा नेखरे, प्रकाश कदम, डॉ. पी. बी. बाणखेले, आनंदा सायवे, मदन गडदे, स्वाती ठुबे, अनिता उपाध्ये, वर्षा खामकर, प्रियका मदने या कवी-कवयित्रींनी या संमेलनात कविता सादर केल्या.
बेलवंडी गावच्या सरपंच सुप्रिया पवार, अखिल भारतीय ग्राहक पंचायतीचे जिल्हाध्यक्ष विलास जगदाळे, श्रीगोंद्याच्या नगराध्यक्षा शुभांगी पोटे, साईसेवा पतसंस्थेचे चेअरमन ज्ञानदेव माऊली पाचपुते, संतोष रोडे, पत्रकार बाळासाहेब काकडे, वादळी स्वातंत्र्याचे संपादक जितेंद्र पितळे, संमेलनाचे संस्थापक अशोक शर्मा यांनी याप्रसंगी आपले विचार मांडले. कार्यक्रमाचे सूत्रसंचान अ‍ॅड. महेंद्र शिंदे यांनी केले. सामाजिक, कृषी, सहकार, आरोग्य, पत्रकारिता क्षेत्रातील विविध मान्यवरांचा वादळी सन्मान पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला.

No comments:

Post a Comment