शासनाने झोपेचं सोंग घेतलंय का? - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Thursday, September 16, 2021

शासनाने झोपेचं सोंग घेतलंय का?

 शासनाने झोपेचं सोंग घेतलंय का?

शेतकर्‍याच्या मुलाचा उद्विग्न सवाल ! दिला जलसमाधीचा इशारा !


नगरी दवंडी/प्रतिनिधी
नेवासा ः कृषी पदविका हा अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर पुढील शिक्षणासाठी विद्यार्थ्यांना थेट पदवीच्या दुसर्‍या वर्षाला प्रवेश दिला जात असे. परंतु विद्यार्थ्यांना कोणतीही पूर्वसूचना न देता सध्या हा प्रवेश बंद करण्यात आला असून तो पूर्ववत करण्यात यावा अन्यथा जलसमाधी घेण्याचा इशारा संबंधित विद्यार्थ्यांकडून देण्यात आला आहे.  
राज्यातील चार कृषी विद्यापीठांतर्गत जवळजवळ सात हजार विद्यायांनी कृषी पदविका हा अभ्यासक्रम पूर्ण केला आहे. यापूर्वी हा अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर पदवीच्या दुसर्‍या वर्षाला प्रवेश दिला जात होता परंतु तो आता विद्यार्थ्यांना काही पूर्वसूचना न देता बंद केला, त्यामुळे विद्यार्थी आणि पालकांसमोर मोठा यक्षप्रश्न निर्माण झालेला आहे.
सर्व विद्यार्थ्यांचे पूर्णपणे शिक्षणच खंडित झाले आहे. हे सर्व विद्यार्थी सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील मुले आहेत. बीएसस्सी ऍग्रीचे शिक्षण पूर्ण करता यावे यासाठी त्यांनी कर्ज काढून शिक्षण घेतले. परंतु संबंधित खात्याने त्यांची दिशाभूल करून त्यांचे शिक्षण बंद पाडले आहे अशी तक्रार विद्यार्थी प्रतिनिधी यज्ञेश संजय नागोडे यांनी केली आहे.
या संदर्भात देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे कि, या मागणीसाठी कृषी मंत्री दादा भुसे, विद्यापीठाचे कुलगुरू, एमसीएईआर चे वरिष्ठ अधिकारी यांना वेळोवेळी भेट देऊन, पत्रव्यवहार करून तसेच फोन करूनही काहीही उपयोग झाला नाही. आम्ही ठिकठिकाणी आंदोलन केले, दि.26 जुलै 2021 रोजी उपोषण केले त्यावेळी कृषी शिक्षणपरिषदेचे वरिष्ठ अधिकारी कौसडीकर सर यांच्या ठोस आश्वासनानंतर उपोषणाला स्थगिती देण्यात आली होती. परंतु त्याचाही उपयोग झाला नाही. त्यामुळे आम्ही सर्व विद्यार्थी, विद्यार्थिनी व त्यांचे कुटुंबिय पूर्णपणे नैराश्यात गेलेलो आहे. संबंधित खाते आम्हाला उडवाउडवीचे उत्तर देतात. शासन आणि प्रशासन व संबंधित खाते झोपेचं सोंग घेऊन विद्यार्थ्यांची दिशाभूल करतात त्यामुळे आम्ही सर्व विद्यार्थी शासनाच्या धोरणाला वैतागलो असून 1 नोव्हेंबर 2021 पर्यंत विद्यार्थीहिताचा निर्णय न घेतल्यास शासनाला कुठलीही पूर्वकल्पना न देता मिळेल त्या नदीत आणि मिळेल त्या विहिरीत आम्ही जलसमाधी घेऊ आणि त्याची सर्वस्व जबाबदारी शासनाची व संबंधित खात्याची राहील असे विद्यार्थी प्रतिनिधी यज्ञेश संजय नागोडे यांनी निवेदनात म्हटले आहे.
निवेदनाच्या प्रती एमसीएईआर,पुणे, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेब, विरोधी पक्षनेते देवेंद्रजी फडवणीस साहेब, राज्यपाल, कृषी मंत्री दादाजी भुसे, जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख पाटील, मा.बच्चुभाऊ कडू, समाज सेवक अण्णा हजारे, जिल्हाधिकारी साहेब अहमदनगर, पोलीस अधीक्षक साहेब अहमदनगर यांना निवेदनाच्या प्रती देण्यात आल्या आहेत.

No comments:

Post a Comment