गणपती बाप्पांचं उद्या आगमन; बाजारपेठेत उत्साह. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Thursday, September 9, 2021

गणपती बाप्पांचं उद्या आगमन; बाजारपेठेत उत्साह.

 गणपती बाप्पांचं उद्या आगमन; बाजारपेठेत उत्साह.

शहरातील सर्वच रस्त्यांवर तुफान गर्दी.. गणेश मूर्ती खरेदीसाठी झुंबड...

गणेशोत्सवामुळे बाजारपेठेत उत्साह संचारला आहे. गणेशाच्या आगमनासाठी सजावट साहित्य खरेदीसाठी बाजारात गर्दी झाली आहे. विद्युत रोषणाई, घरगुती आरास करण्यासाठीच्या साहित्याने बाजारपेठ फुलली आहे. याशिवाय गणेश चतुर्थीचे मुहूर्त साधून इलेक्ट्राॉनिक साहित्य, मोबाईल, वॉशिंग मशिन, फ्रीज आदी साहित्यालाही मागणी वाढली आहे. गणेश स्थापनेचे मुहूर्त साधून खरेदीसाठी ग्राहकांनी पसंती दिली आहे.कोरोनाचे निर्बंध असले तरी, घरगुती गणेशोत्सवाला यंदा चांगला उत्साह दिसून येत आहे. यंदा कोरोनाचे निर्बंध गतवर्षीपेक्षा बर्‍यापैकी शिथिल केलेले आहेत. शिवाय दिवसभर दुकाने उघडी ठेवण्यासाठी परवानगी दिलेली असल्याने बाजारात उत्साह आहे. बाप्पांच्या आगमनासाठी मूर्ती बाजारात गर्दी आहे. दोन वर्षांपासून मूर्ती बाजाराला मंदी होती. यंदा मात्र सार्वजनिकसह गल्लीतील मंडळांचा उत्साह दुणावला आहे. मंडप, छोट्या आरास आणि आरोग्यदायी कार्यक्रम राबविण्यावर यंदा मंडळांचा भर आहे. गर्दी टाळण्यासाठी यंदा देखावे राहणार नाहीत.


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः
उद्या गणपती बाप्पांचे आगमन होणार आहे. गणपती बाप्पांच्या स्वागतासाठी नगरकर आजपासून तयारीला लागले आहेत.  एकीकडे शहरात कोरोनाचे रुग्ण वाढत असताना दुसरीकडे शहरात गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर तोबा गर्दी दिसून येत आहे. शहरातील बाजारपेठेत खरेदीसाठी कमालीची गर्दी दिसून येत आहे. गर्दी टाळण्याचं आवाहन करूनही मार्केटमध्ये झुंबड दिसून येत आहे. चितळे रोड, गंज बाजार, नगर कल्याण रोडवर चालायलाही जागा नाही, अशी परिस्थिती पाहायला मिळत आहे. गणेशोत्सव अवघ्या काही तासांवर आला आहे. मात्र साधेपणाने उत्सव साजरा करण्याचं आवाहन करूनही बाजारपेठात प्रचंड गर्दी आहे. खरेदी करण्यासाठी नागरिक गर्दी करत आहेत. कोरोना नियमांचे उल्लंघन करत गर्दी होत आहे. अशी स्थिती शहरातील सर्वच रस्त्यांवर दिसून येत आहे. गणेश मूर्ती व फुलं खरेदीसाठी नागरिकांची अक्षरशः झुंबड उडाली आहे. अनेक लोक मास्क न घालता गर्दी करत आहेत. रूग्णसंख्या नियंत्रणात ठेवण्याचं मनपासमोर आव्हान आहे. असे असताना होणारी गर्दी चिंतेत भर टाकत आहे.
फूलमाळा, नवीन माळा, मोगर्‍याच्या माळा, झेंडू माळा, मोत्यांचे लटकन आदी साहित्य बाजारात आले असून त्याच्या किंमतीत 25 टक्के वाढ झाली आहे. विविध आकारातील मखरही विक्रीस आले आहेत. याशिवाय मिठाईच्या दुकानांतही मोदक आकारातील पेढे विक्रीसाठी उपलब्ध आहेत. फूलमाळा, मखर, मोत्यांचे लटकन आदी साहित्याला मोठी मागणी आहे. गतवर्षीपेक्षा सजावटीच्या साहित्याचे दर 25 टक्के वाढले आहेत. घरगुती गणेशोत्सव साजरा होत असल्याने यंदा खरेदीसाठी चांगला उत्साह आहे. गणेश चतुर्थीला टीव्ही, मोबाईल खरेदी करण्यासाठी ग्राहकांनी बुकिंग केले आहे. ग्रामीण भागातूनही ग्राहक नगरमध्ये येत आहेत. गणेशोत्सवामध्ये बाजारपेठेत चांगली उलाढाल होणार असल्याचे दिसून येत आहे. पीओपीच्या मूर्ती वजनाला हलक्या, स्वस्त आणि हाताळण्यास व आकर्षक असल्याने या मूर्तींना मागणी आहे. शाडू मातीचे गणपती सर्वसामान्य ग्राहकांना परवडत नाहीत. शाडूच्या मूर्ती मोठ्या प्रमाणावर शिल्लक आहेत. गतवर्षीपेक्षा मूर्तीच्या किमतीमध्ये 40 ते 50 टक्के वाढ झाली आहे. उद्या शुक्रवारी (दि. 10) सूर्योदयापासून ते दुपारी 1.30 वाजेपर्यंत घरगुती गणेश मूर्तींची स्थापना करता येणार आहे. सार्वजनिक गणेश मंडळांनी सायंकाळी सातपर्यंत गणेश मूर्तीची स्थापना करावी, असे जिल्हा पुरोहित संघाचे अध्यक्ष किशोर जोशी यांनी सांगितले. पार्थिव गणेशमूर्ती असल्याने मध्यान्ह कालापर्यंत प्रतिष्ठापना करता येते, असेही त्यांनी सांगितले.

No comments:

Post a Comment