खडीक्रेशरच्या धुळीने अरणगाव शेतकरी हैराण. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Monday, August 16, 2021

खडीक्रेशरच्या धुळीने अरणगाव शेतकरी हैराण.

 खडीक्रेशरच्या धुळीने अरणगाव शेतकरी हैराण.

अनेकांना जडले धुळीमुळे श्वसनाचे आजार.
शेतकर्‍यांचे स्वातंत्र्यदिनी उपोषण.


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः अरणगाव हद्दीत मोठ्या प्रमाणात शेतकरी शेती करुन आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवित आहे. दिवसंदिवस या भागात खडी क्रेशरची संख्या झपाट्याने वाढ झाली आहे. मागील चार ते पाच वर्षापासून खडी क्रशरमुळे शेतातील पिकांवर मोठ्या प्रमाणात धुराळा उडून पिकांची नासधूस होत आहे. एका वर्षात चार ते पाच खडी क्रेशर चालकांना परवाना देण्यात आल्याने संपुर्ण परिसर धुळीने माखत आहे. यामुळे शेतकर्यांना पीक घेणे देखील अवघड झाले असून, धुळीच्या त्रासामुळे शेतीचे नुकसान होऊन शेतकरी कुटुंबीयांना श्वसनाचे आजार देखील सुरु झाले आहेत. खडी क्रेशरबद्दल जिल्हा प्रशासनाकडे वारंवार निवेदन, तक्रार करुन देखील हा प्रश्न सोडविण्यात आलेला नाही. खडी क्रेशरच्या धुळीने शेतीचे नुकसान होत असल्याने अरणगाव (ता. नगर) हद्दीतील खडी क्रेशरचे परवाने रद्द करावे व नवीन परवाने देणे थांबविण्याच्या मागणीसाठी शेतकर्‍यांनी स्वातंत्र्य दिनी शेतासमोर काम बंद ठेऊन उपोषण केले.  वारंवार निवेदन देऊन व पाठपुरावा करुन प्रश्न सुटत नसल्याने आदोलक शेतकर्यांनी शेतीचे औजारे व साहित्य उपोषण स्थळी ठेऊन प्रशासनाच्या निषेधार्थ घोषणा दिल्या. सदर प्रश्नी मार्ग निघत नाही तो पर्यंत उपोषण सुरु ठेवण्याचा आक्रमक पवित्रा शेतकर्यांनी घेतला आहे.    
शेती करताना मोठ्या प्रमाणात बियाणे, खत आदी शेती साहित्याला खर्च करुन देखील धुळीमुळे उत्पन्न मिळत नसल्याने अरणगाव भागातील सर्व शेतकरी कर्जबाजारी होण्याच्या मार्गावर आहेत. शेतजमीनीत शेतकरी पीक घेत असताना खडी क्रेशरला परवानगी कशी दिली जाते?, ग्रामपंचायतकडून ना हरकत दाखला घेत असताना त्याच्यावर शेतकर्यांऐवजी खडी क्रेशर चालकांच्याच स्वाक्षर्या घेण्यात आल्या आहेत. या भागात मोठ्या प्रमाणात खडी क्रेशर असून आनखी नवीन खडी क्रेशर चालकांना परवानगी देण्याचे प्रकार सुरु आहे. खडी क्रशर चालकांना धुळीचा त्रास कमी करण्यास सांगितले असता शेतकर्यांना धमकाविण्याचे प्रकार घडत असल्याचा आरोप आंदोलकांनी केला. तर खडी क्रेशरचे परवाने रद्द करुन नवीन परवाने देणे थांबविण्याची मागणी स्थानिक शेतकर्यांनी केली आहे. या आंदोलनास भाकपचे जिल्हा सहसचिव अ‍ॅड. कॉ. सुधीर टोकेकर, जिल्हा परिषद सदस्य संदेश कार्ले, शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष विशाल कांबळे, महाराष्ट्र ड्रायव्हर सेवा संघटनेचे अध्यक्ष गोरख कल्हापूरे यांनी भेट देऊन पाठिंबा दिला.
अरणगाव खडी क्रेशर विरोधी शेतकरी कृती समितीच्या वतीने करण्यात आलेल्या या उपोषणात नारायण पवार, अ‍ॅड. कॉ. सुधीर टोकेकर, सतीश पवार, बबन शिंदे, भानुदास गव्हाणे, अंबादास कल्हापूरे, शिवाजी खंडागळे, संदीप साखरे, परशुराम पवार, संदीप खंडागळे, अंजनाबाई पवार, भिमाबाई साखरे, सखुबाई पवार, केशरबाई गव्हाणे, ललीता शिंदे आदी शेतकरी कुटुंबीय सहभागी झाले होते.

No comments:

Post a Comment