सुप्रिया औटी व तारा लड्डा यांनी पटकाविला प्रथम क्रमांक - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Friday, August 6, 2021

सुप्रिया औटी व तारा लड्डा यांनी पटकाविला प्रथम क्रमांक

 सुप्रिया औटी व तारा लड्डा यांनी पटकाविला प्रथम क्रमांक

प्रयास व दादी-नानी ग्रुपच्या तिरंगा वेशभुषा स्पर्धेला महिलांचा प्रतिसाद


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः वास्तुशास्त्र अंधश्रद्धा नसून ते ऊर्जा शास्त्र आहे. आपल्या वास्तू कोणत्या योग्य दिशेला असाव्या याचे ज्ञान वास्तुशास्त्रातून मिळते. दिशेच्या प्रभावाने निर्माण होणार्या ऊर्जेचा जीवनात चांगल्या पध्दतीने उपयोग होण्यासाठी वास्तुशास्त्राची माहिती असणे गरजेचे बनले आहे. प्रत्येक दिशेचे वेगळे महत्त्व असून, दिशेनुसार घराचे व्यवस्थापन केल्यास ते फायदेशीर ठरत असल्याचे प्रतिपादन वास्तुशास्त्र तज्ञ पूजा गुंदेचा यांनी केले.  
प्रयास व दादी-नानी ग्रुपच्या वतीने महिलांसाठी आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात गुंदेचा बोलत होत्या. यावेळी ग्रुपच्या अध्यक्षा अलकाताई मुंदडा, उपाध्यक्षा अनिता काळे, स्वच्छता दूत शारदा होशिंग, शोभा पोखर्णा, नीता माने, चंद्रकला सुरपुरिया आदिंसह ग्रुपच्या महिला उपस्थित होत्या.
पुढे गुंदेचा यांनी महिलांना स्वयंपाक घर प्रसन्न ठेवण्यासाठी करावयाच्या कृतीचे प्रात्यक्षिक करून दाखविले. तसेच स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून तिरंगा संकल्पनेवर वेशभुषा स्पर्धा घेण्यात आली. तिरंगा संकल्पनेवर विविध प्रकारे आकर्षक पेहराव करुन महिला स्पर्धेत सहभागी झाल्या होत्या. या स्पर्धेत सुप्रिया औटी व तारा लड्डा यांनी प्रथम क्रमांक पटकाविले. उपस्थित पाहुण्यांच्या हस्ते विजेत्या महिलांना बक्षिस देण्यात आले. ग्रुपच्या उपाध्यक्षा तथा जिजाऊ ब्रिगेडच्या अध्यक्षा अनिता काळे यांच्या सामाजिक व शैक्षणिक कार्याची दखल घेऊन त्यांना सरपंच सेवा संघाचा आदर्श महिला समाज भूषण पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल त्यांचा ग्रुपच्या वतीने सत्कार करण्यात आला.
शारदा होशिंग म्हणाल्या की, आयुष्य ऊर्जायुक्त असते. मात्र मनुष्य सकारात्मक ऊर्जेकडे लक्ष न देता अहंकाराला जवळ करतो. लोभाच्या मागे धावतो. कुटुंब व्यवस्था बळकट करण्यासाठी घरात आध्यात्मिक वातावरणातून सकारात्मक ऊर्जा तयार करणे आवश्यक आहे. यासाठी परमेश्वराचे नामस्मरण करणे आवश्यक असल्याचे, त्यांनी समर्थ रामदासांचे विविध दाखले देऊन गोष्टीरूपाने सांगितले. कार्यक्रमाची सुरुवात नीता माने यांच्या सुरेल स्वागत गीताने झाली. प्रास्ताविकात अनिता काळे यांनी ग्रुपच्या विविध उपक्रमाची माहिती दिली. कोरोनाचे नियम पाळून उपस्थित राहिल्याबद्दल ग्रुपच्या अध्यक्षा अलकाताई मुंदडा यांनी सर्वांचे आभार मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी दिप्ती मुंदडा यांनी परिश्रम घेतले.

No comments:

Post a Comment