कोरोनाचे नियम मोडणार्‍यांकडून सहा कोटी 60 लाखांचा दंड वसूल ! - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Saturday, July 31, 2021

कोरोनाचे नियम मोडणार्‍यांकडून सहा कोटी 60 लाखांचा दंड वसूल !

 कोरोनाचे नियम मोडणार्‍यांकडून सहा कोटी 60 लाखांचा दंड वसूल !


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः कोरोना दुसर्‍या टप्प्यामध्ये नगर जिल्ह्यामध्ये पोलीस प्रशासनाने वेगवेगळ्या प्रकारच्या कारवाया केल्या असून आत्तापर्यंत सहा कोटी 60 लाख रुपयांचा दंड वसूल केला आहे. कोरोनाच्या कालावधीमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या कारवाया जिल्ह्यामध्ये करण्यात आलेल्या होत्या. सरकारने नियम लावून दिलेले आहेत, त्याची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याच्या सूचना देण्यात आलेल्या होत्या. मात्र अनेक ठिकाणी या नियमांचे उल्लंघन झाले असल्याचे दिसून आलेले आहे. जिल्हा पोलिस प्रशासनाने दुसर्‍या टप्प्यामध्ये धडक कारवाई मोहीम हाती घेतली होती. विना मास्क फिरणारे, सोशल डिस्टंसिंग न पाळणारे तसेच संचार बंदीचे उल्लंघन करणे अशा प्रकारच्या कारवाया केलेल्या होत्या. दुसर्‍या टप्प्यामध्ये पोलिसांनी दोन लाख 19 हजार 365 केसेस दाखल केलेल्या आहेत. दुसरी लाट ही 19 फेब्रुवारी पासून सुरू झालेली होती. कलम 188 अंतर्गत या कारवाया पोलीस प्रशासनाने जिल्ह्यात केलेल्या आहेत.
ज्यांनी नियमांचे उल्लंघन केलेले आहे अशांवर दंडात्मक कारवाई करण्याचे आदेश सुद्धा देण्यात आलेले होते. 19 फेब्रुवारी ते 31 मार्च या अखेरपर्यंत 53 हजार 18 केसेस दाखल करण्यात आल्या असून एक लाख 21 हजार 100 रुपयाचा दंड वसूल केलेला आहे. एप्रिल ते 31 मे या काळात 97 हजार 22 केसेस दाखल केल्या असून तीन कोटी 23 लाख 70 हजार 200 रुपयांचा दंड वसूल केलेला आहे. तर एक जून ते 25 जून अखेर 35 हजार 17 केसेस दाखल केल्या असून एक कोटी पाच लाख 38 हजार 600 रुपयांचा दंड वसूल केलेला आहे. तर 26 जून ते आजपर्यंत 34 हजार 308 केसेस दाखल केले असून एक कोटी 39 हजार 300 रुपयांचा दंड वसूल केलेला आहे. आतापर्यंत पोलिसांनी जिल्ह्यामध्ये सहा कोटी 60 लाख 56 हजार दोनशे रुपयांचा दंड वसूल केलेला आहे.
नियमांचे उल्लंघन करणार्‍यांवर कारवाई करण्यासंदर्भातले आदेश जिल्हाभरामध्ये देण्यात आलेले होते. ठिकठिकाणी नाकाबंदी करून वाहनांची तपासणी सुद्धा केली जात होती. सरकारने जे नियम व अटी दिलेल्या होत्या त्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी जिल्हा पोलिसांनी हा दंड वसूल केलेला असून आगामी काळामध्ये अशा प्रकारच्या कारवाया पुढे सुरु राहतील, अशी माहिती जिल्हा पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांनी दिली.

No comments:

Post a Comment