औटींच्या वारसांना 15 लाखांची मदत आ. निलेश लंके यांच्या पाठपुराव्यास यश ! - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Monday, July 19, 2021

औटींच्या वारसांना 15 लाखांची मदत आ. निलेश लंके यांच्या पाठपुराव्यास यश !

 औटींच्या वारसांना 15 लाखांची मदत 

आ. निलेश लंके यांच्या पाठपुराव्यास यश !


नगरी दवंडी/प्रतिनिधी
पारनेर ः पारनेर शहरानजीकच्या गावनदीलगत तरसाने केलेल्या हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्या शहरातील वरखेड मळा येथील उत्तम अर्जुन औटी यांच्या वारसांना वनविभागाच्या वतीने पंधारा लाखांची मदत देण्यात आली. आमदार नीलेश लंके यांनी त्यासाठी वनविभागाकडे पत्रव्यवहार करून पाठपुरावा केला होता.  औटी यांच्या पत्नीकडे आ. नीलेश लंके यांच्या हस्ते पाच लाखांचा धनादेश सुपूर्द करण्यात आला. उर्वरीत दहा लाख रूपये  त्यांच्या वारसांच्या नावावर ठेव स्वरूपात ठेवण्यात आले आहेत.
दि. 23 मे रोजी सायंकाळी गावनदीलगतच्या झुडूपात रक्तभंबाळ अवस्थेतील मृतदेह असल्याचे तेथील शेतकर्‍याच्या निदर्शनास आले. त्यांनी पोलिसांना माहीती दिल्यानंतर पोलिस निरीक्षक घनश्याम बळप पथकासह तेथे दाखल झाले. मृतदेहाच्या चेहर्‍यावरच मोठया जखमा असल्याने तो ओळखणे अवघड झाले होते. पारनेरच्या ग्रामिण रूग्णालयात मृतदेह नेण्यात आल्यानंतर वरखेडमळा परिसरातील व्यक्तीने तो मृतदेह उत्तम अर्जुन औटी यांचा असल्याचे ओळखले. तोपर्यंत औटी यांचा घातपात झाला किंवा काय याबाबत तर्कवितर्क लढविण्यात येत होते.
मृतदेहाचे शवविच्छेदन होउन अहवाल  प्राप्त झाल्यानंतर हिंस्त्र जंगली प्राण्याने चावा घेतल्याने त्यांचा मृत्यू झाल्याचे कारण पुढे आले. पोलिसांनी त्याबाबत वनविभागास कळविल्यानंतर वनपरिमंडल अधिकारी संदीप भोसले यांनी घटनास्थळी जाउन पाहणी केली असता तेथे तरसाच्या पाऊलखुना  आढळून आल्या. त्यामुळे औटी यांचा मृत्यू तरसाच्या हल्ल्यात झाल्याचा निष्कर्ष काढण्यात आला. वनविभागाच्या वतीने पंचनामा करण्यात येऊन वरीष्ठ कार्यालयाकडे अहवाल पाठविण्यात आला.
वन्य प्राण्याच्या हल्ल्यात औटी यांचा मृत्यू झाल्याने त्यांच्या वारसाला वनविभागाकडून मदत मिळाली पाहिजे अशी भुमिका घेत आ. नीलेश लंके यांनी त्यांच्या वारसांना तसा अर्ज वनविभागाकडे सादर करण्याच्या सुचना दिल्या. अर्ज सादर केल्यानंतर आ. लंके यांनी सबंधित अधिकार्‍यांशी पत्रव्यवहार करून या कुटूंबाला तात्काळ मदत देण्याच्या सुचना दिल्या होत्या. त्यानुसार औटी यांच्या वारसांना नुकताच  पाच लाख रूपयांचा धनादेश आ. लंके यांच्या हस्ते सुपूर्द करण्यात आला. उर्वरीत दहा लाख रूपये वारसांच्या नावे ठेव ठेवण्यात आले.
धनादेश सुपूर्द करताना वनविभागाचे सहाययक वनसंरक्षक सुनिल पाटील, वनक्षेत्रपाल सिमा गोरे,वनपरिमंडल अधिकारी संदीप भोसले, वनरक्षक अश्विनी सोळंके, विजय औटी, मंगेश औटी आदी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment