अर्बन बँकेतील व्हाईटकॉलर गुन्हेगारांनी केलेल्या घोटाळ्यांची शिक्षा कर्मचार्‍यांना देऊ नये - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Thursday, June 24, 2021

अर्बन बँकेतील व्हाईटकॉलर गुन्हेगारांनी केलेल्या घोटाळ्यांची शिक्षा कर्मचार्‍यांना देऊ नये

 अर्बन बँकेतील व्हाईटकॉलर गुन्हेगारांनी केलेल्या घोटाळ्यांची शिक्षा कर्मचार्‍यांना देऊ नये

अन्यथा जनांदोलन करण्यात येईल; कामगार संघटना महासंघाने दिला इशारा !

नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः अहमदनगर येथील कामगार संघटना महासंघाचे कॉ.प्रा.डॉ.महेबुब सय्यद, कॉम्रेड भैरवनाथ वाकळे आणि कॉ.रामदास वागस्कर यांनी आज दि.23 रोजी नगर अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेचे प्रशासक महेंद्रकुमार रेखी यांना मागणीपत्र देत इशारा दिला आहे कि, अर्बन बँकेतील व्हाईटकॉलर गुन्हेगारांनी केलेल्या आर्थिक घोटाळ्यांची शिक्षा कामगार कर्मचारी यांंना देऊ नये, त्यांची पगार कपात करू नये; अन्यथा आपल्या विरोधात जनांदोलन करण्यात येईल. या ईमेलच्या प्रती त्यांनी रिजर्व्ह बँक ऑफ इंडिया, मुख्यमंत्री उध्दव बाळासाहेब ठाकरे, जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र ब. भोसले आणि जिल्हा पोलिस अधिक्षक पाठविल्या आहेत. कामगार संघटना महासंघाच्या वतीने प्रशासकांसह वरील सर्वांना सविस्तर इमेल पाठविला आहे. त्यात म्हटले आहे कि,
आज दि.23 जून 2021 रोजी दुपारी 12:30 च्या दरम्यान आपल्या दालनात अर्बन बँक बचाव समिती यांनी आपणास निवेदन दिले की गेल्या काही वर्षांपासून आपल्या बँकेत विविध आर्थिक घोटाळे झालेले आहेत. त्याचा तपशिल आपल्याला वेळोवेळी देण्यात आला होता. तसेच या संदर्भात समिती सातत्याने पाठपुरावा करत आहे. घोटाळ्यांमुळे बँकेचा एनपीए मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे. तो कमी होऊन अहमदनगरची वैभवशाली बँक वाचली पाहिजे. त्यावर आपण प्रशासक म्हणून कडक कारवाई करत घोटाळ्यांतील कर्जाची रक्कम वसूल करावी. आपण कार्यभार स्विकारल्यापासून काहीच कारवाई केलेली दिसुन येत नाही. उलट बँकिंग कारभाराचा आरसा असलेला ‘ऑडिट रिपोर्ट’ सभासदांना दिला जावा, या अत्यंत साध्या आणि घटनात्मक मागणीसाठी समिती सदस्य आज आपल्या दालनामध्ये आले होते. त्यांना आजही ऑडिट रिपोर्ट दिला गेला नाही. हि खेदजनक बाब आहे.
यावेळी आपण त्यांना सांगितले की आम्ही काही उपाययोजना करत आहोत. त्यामधे बँकेच्या (असेट्स) मालमत्तेच्या रिव्हॅल्युएशन करत आहोत, ज्यामुळे बँकेचा नफा वाढलेला दिसेल. त्याचबरोबर कामगार कर्मचारी यांची पगार कपात (वेतन कपात) करणार आहोत, ज्यामुळे बँकेचा खर्च वाचेल. पगार कपातीवर बँक समिती सदस्यांनी हरकत घेतली. आपण काहीच उत्तर दिले नाही. आणखी काही विषयांवरील चर्चा सुरू असताना आपण दालन सोडून निघून गेलात.
आम्ही कामगार संघटना महासंघ म्हणून आपणास मागणी करत आहोत की, अहमदनगरची वैभवशाली अर्बन बँक शेतकरी, कष्टकरी, सर्वसामान्य व्यापारी, शहरातील नागरिक यांच्या कष्टाच्या पैशामधून उभी राहिलेली आहे. या बँकेचा मोठा गौरवशाली इतिहास आहे. अहमदनगर शहराच्याच नव्हे तर जिल्ह्याच्या विकासातही एव्हढेच नव्हे तर जिल्ह्याची कामधेनु असलेल्या अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेच्या स्थापनेत अर्बन बँकेचा सिंहाचा वाटा आहे. मागील पिढीतील अनेक मोठमोठ्या व्यक्तिंनी या बँकेसाठी त्याग केलेला आहे. असो.
काही व्हाईटकॉलर गुन्हेगारांच्या लुटप्रवृत्तीच्या घोटाळ्यांमुळे बँकेचा एनपीए वाढलेला आहे. तो कमी करण्यासाठी बोगस कर्जप्रकरणातील मालमत्ता विकून पैसा उभा केला पाहिजे. त्यासाठी बँक बचाव समिती आपणास सक्रिय सहयोग देण्यास तयार आहे. कर्जवसुली करून ही बँक सुरळीत चालवण्यासाठीच आपणास रिजर्व्ह बँकेने नियुक्त केले आहे.
आपण आपले काम करताना बँकेच्या उभारणीमधे, विकासामधे ज्या कामगार कर्मचारी यांचा मोठा वाटा आहे, त्यांच्या खिशाला पर्यायाने संसाराला कात्री लावू नये. असे आम्ही आग्रहाने सांगत आहोत. कर्मचारी यांना अनेक वर्षांपासुन हक्काची पगारवाढ तसेच इतर सोयीसवलती मिळालेल्या नाहीत. कर्मचारी संचालकपदही भ्रष्टाचारी प्रवृत्तीने काढून टाकले आहे. आपण कर्जवसुलीकडे दुर्लक्ष करत कामगार कर्मचारी यांचा पगार कपात करणार असाल तर आम्ही जिल्हाभरातील कामगार संघटना महासंघाचे कार्यकर्ते आपल्या चुकिच्या निर्णयाविरूध्द जनांदोलन सुरू करू. याची आपण नोंद घ्यावी. आपण घोटाळ्यातील कर्ज रक्कम संबंधित व्यक्तींकडून वसूल करावी. त्यासाठी अर्बन बँकेच्या कामगार कर्मचारी यांची पगार कपात (वेतन कपात) करून घरच्या म्हातारीचे काळ होऊ नये, अशी मागणी केली आहे.या मागणीबाबत कामगार संघटना महासंघ आग्रही असुन भविष्यात आर्थिक घोटाळ्यांची वसुली म्हणून कामगार कर्मचारी पगार कपात (वेतन कपात) करून करूच नये यासाठी जनांदोलन उभारण्याची तयारी करणार असल्याचे अध्यक्ष कॉ.प्रा.डॉ.महेबुब सय्यद, सेक्रेटरी कॉम्रेड भैरवनाथ वाकळे तसेच सहसेक्रेटरी कॉ.रामदास वागस्कर यांनी सांगितले.

No comments:

Post a Comment