महापौर राष्ट्रवादीचाच ? राष्ट्रवादीचा शिवसेनेला चेकमेट ! - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Thursday, June 3, 2021

महापौर राष्ट्रवादीचाच ? राष्ट्रवादीचा शिवसेनेला चेकमेट !

 महापौर राष्ट्रवादीचाच?

राष्ट्रवादीचा शिवसेनेला चेकमेट !

शिवसेनेची भाजपाला टाळी.. भाजपाचा हात मागे..

आ. संग्राम जगतापांनी मागितला शरद पवारांना आशिर्वाद...

आगामी महापालिकेच्या महापौर पदाच्या निवडणुकीत महाविकास आघाडीच्या घटक पक्षात फाटाफूट झाली तर भाजपचा पाठिंबा मिळावा, यासाठी शिवसेना नगरसेवक व पदाधिकारी खासदार सुजय विखे यांच्या भेटीला पोहोचले. या नेत्यांनी विळद घाटामध्ये खासदार विखे यांची भेट घेत महापौरपदाच्या निवडणुकीसाठी मदत मागितली. अहमदनगर महापालिकेच्या महापौरपदाची निवडणूक जवळ येऊ लागली आहे. महाविकास आघाडीचं (शिवसेना-राष्ट्रवादी-काँग्रेस) जुळलं तर राष्ट्रवादीच्या सपोर्टवर शिवसेनेचा महापौर होणे शक्य आहे. मात्र राष्ट्रवादीने दगाफटका दिल्यास भाजपचा पाठिंबा घेऊन महापौरपद पटविण्याचा डाव शिवसेनेचा आहे. त्यासाठीच शिवसेनेनं खा. सुजय विखेंनं पुढे प्रस्ताव ठेवला. शिवसेनेच्या या प्रस्तावावर खासदार विखे यांनी काहीच निर्णय घेतला नसल्याचे समजते. मात्र या शिवसेना नेत्यांनी लोकसभा निवडणुकीचा संदर्भ देत महापौरपदासाठी सहकार्य मागितले आहे. आता विखे काय भूमिका घेतात, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. त्यासाठी नगरकरांना महापौर पदाच्या निवडणुकीची प्रतीक्षा करावी लागणार आहे.


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः “आत्ता नाही तर मग पुढे काहीच नाही” या इराद्याने महापौरपदासाठी फिल्डिंग लावत असणार्‍या शिवसेनेला राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांनी शरद पवार यांची भेट घेवून शहरातील राजकीय समीकरणे सांगत नवा महापौर राष्ट्रवादीचाच असेल असा विश्वास व्यक्त करुन चेकमेट दिला आहे. राष्ट्रवादीची ही चाल ओळखून शिवसेनेने खा. सुजय विखे यांची भेट घेवून टाळी दिली खरी पण शहरातील भाजपा नगरसेवक पदाधिकार्‍यांचा राष्ट्रवादीशी असलेला घरोबा ओळखून टाळीसाठी हात पुढे करण्यास भाजपाने असमर्थतता व्यक्त केली. विळद मधील मंथनात राष्ट्रवादीबरोबर युती की घटस्फोट याबाबत निर्णय झाला नसला तरी उपमहापौर भाजपाकडेच राहील या दृष्टीने हालचाली सुरू असल्याचे समजते.

“महापौर” पदासाठी भाजपाकडे अनुसूचित जाती महिला प्रवर्गासाठी राखीव उमेदवार नसला तरी सध्या असलेली राष्ट्रवादीबरोबरची युती तोडावी की उपमहापौर पदासह अन्य काही पदरात पाडून घेण्यासाठी खा. विखे यांच्या ‘विळद’ घाटात काल वैचारिक मंथन करण्यात आले. अडीच वर्षांच्या सत्ताकाळात काहीना भाजपाच्या पदरात काहीच न पडल्याचा साक्षात्कार झाला. तर काहींनी सत्तेत सहभागी होण्याचा सल्ला दिला. खा. विखे ही नगरसेवक व पदाधिकार्‍यांच्या वेगवेगळ्या भूमिकांमुळे संभ्रमात पडले आहेत.
महापालिकेतील संख्याबळ पाहता महापौर पदासाठी कोणाचातरी सपोर्ट घ्यावाच लागणार आहे. सत्तेत सहभागी झाले तर विकास कामे होतात. त्यामुळे सत्तेत सहभागी व्हावे, त्यातून एखादे पद मिळावे, अशी अपेक्षा नगरसेवकांनी खासदार विखे यांच्यासमोर व्यक्त केली. कोणा मागे फरफटत जायचे नाही, सन्मानाने काही मिळत असेल तर घ्यायचे, असा निर्णय यावेळी झाला. महाविकास आघाडी असली तरी नगरमध्ये मात्र शिवसेना आणि राष्ट्रवादीच जमत नाही. महापौरपदाच्या निवडणुकीत शिवसेना आणि राष्ट्रवादीचे फाटलं तर मुंबईतून आलेल्या आदेशानुसार एकाला सपोर्ट करून भाजपने सत्तेत सहभागी व्हायचं, असाही एक सूर या बैठकीत निघाला. तत्पूर्वी खासदार भाजपच्या पदाधिकार्‍यांची बैठक घेऊन त्यांची मते जाणून घेतली. पदाधिकार्‍यांनी अडीच वर्षाच्या सत्ता कार्यकाळात पक्ष संघटनेला काय लाभ मिळाला,?असा प्रश्न करत त्यावर खल केला. अहमदनगर महापालिकेची सर्व परिस्थिती खासदार विखे हे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या समोर मांडतील. त्यानंतर ते सांगतील तो आदेश सर्वांनी एकसंघपणे पालन करावयाचा आहे, असा निर्णय यावेळी घेण्यात आला.
राज्यात महा विकास आघाडीची सत्ता असली तरी शहरात राष्ट्रवादी धोका देणार असल्याची शक्यता गृहीत धरून शिवसेनेचे नगरसेवक अनिल शिंदे, माजी शहरप्रमुख संभाजी कदम, संजय शेंडगे, नगरसेवक शाम नळकांडे, दत्ता कावरे यांनी विळद घाटातील हॉस्पिटलमध्ये खा. सुजय विखे यांची भेट घेऊन महापौरपदासाठी भाजपाने पाठबळ द्यावी यासाठी त्यांना टाळी दिली पण खा. विखे यांनी टाळीसाठी हात पुढे केला नसल्याचे समजते.
महापौर पद अनुसूचित जाती महीलेसाठी राखीव असल्याने शीला चव्हाण यांना महापौर पद मिळवणे यासाठी माजी महापौर दिप चव्हाण यांनी राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप आणि काँग्रेसचे नेते मंत्री बाळासाहेब थोरात यांची भेट घेत महापौर पदाची आडाखे पक्के केले. मात्र काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांच्यावर आरोपांच्या फैरी झाडल्या. त्यामुळे नगर राष्ट्रवादी नाराज झाली आहे. काँग्रेसच्या पदाधिकार्‍यांनी एका बाजूला आरोप करायचे आणि दुसर्‍या बाजूला नगरसेवकाने महापौरपदासाठी पाठिंबा मागयाचा हा विरोधाभास राष्ट्रवादीच्या नगरसेवकांना रुचला नाही. काळे यांच्या भूमिकेने दीप चव्हाण एकाकी पडल्याचे चित्र आहे. तरीही चव्हाण यांनी महापौरपद पत्नी शीला यांना मिळावे यासाठी धावपळ सुरू ठेवली आहे. पक्षाचे 5 नगरसेवक असले तरी चार एका बाजूला आणि जिल्हाध्यक्ष काळे दुसर्या बाजूला असे चित्र आहे. या दोघांमध्ये मात्र चव्हाण यांची कोंडी झाली आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here