सर्वांच्या सहकार्याने कोरोनावर विजय मिळवू ः प्राजक्त तनपुरे - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Friday, June 18, 2021

सर्वांच्या सहकार्याने कोरोनावर विजय मिळवू ः प्राजक्त तनपुरे

 सर्वांच्या सहकार्याने कोरोनावर विजय मिळवू ः प्राजक्त तनपुरे

कृषी विभागातील अधिकारी व कर्मचार्‍यांचे कौतुक


नगरी दवंडी/प्रतिनिधी
अहमदनगर ः मागील जवळजवळ सव्वा वर्षापासून आपण कोरोनासारख्या भयंकर महामारीचा सामना करीत आहोत. आपल्या जवळचे अनेकजण काळाने हिरावून नेले. सध्याचा काळ हा एकमेकांना आधार देण्याचा आहे. हा काळही लवकर निघून जाईल. सर्वांनी शासन नियमांचे पालन केल्यास व जाणीवपूर्वक प्रयत्न केल्यास आपण कोरोनावर निश्चितच विजय मिळवू. या काळात शासनाच्या विविध विभागांनी प्रशंसनीय काम केले आहे. यामध्ये कृषी विभागाचे योगदान खूप मोलाचे आहे. अधिकारी व कर्मचार्यांनी आपली भूमिका चोख बजावली आहे. कृषी विभागाने चांगले बियाणे शेतकर्यांना चांगले बियाणे उपलब्ध करून दिले असून, शेतकर्यांनी तांत्रिक मार्गदर्शन घेऊन उत्पादन वाढवावे, असे प्रतिपादन राज्यमंत्री ना. प्राजक्त तनपुरे यांनी केले.
कृषी विभाग आत्माअंतर्गत डोंगरगण, मांजरसुंबा व पिंपळगाव माळवी येथे नाविन्यपूर्ण बाब योजनेंतर्गत शेतकर्यांना राज्यमंत्री ना. प्राजक्त तनपुरे यांच्या हस्ते बाजरी व बेबीकॉर्न बियाण्यांचे, तसेच निविष्ठाचे वितरण करण्यात आले. यावेळी प्रांताधिकारी श्रीनिवास अर्जुने, तहसीलदार उमेश पाटील, बीडीओ घाडगे, तालुका कृषी अधिकारी पोपटराव नवले, जेऊर मंडळ कृषी अधिकारी सूर्यकांत शेकडे, कृषी पर्यवेक्षक विजय सोमवंशी, अभिजीत डुक्रे, संजय मेचकर, श्रीमती सुमीधा वाणी, कृषी सहाय्यक उमेश डोईफोडे, सीताराम पटारे, मारुती गवारे, रामदास भुतकर, मीराबाई काळे, श्रीतेज पवार, सोमनाथ तोडमल, भास्कर मगर, दिनेश पाटोळे, मोहन तवले, विलास मोहिते, शशिकांत गायकवाड, गोपीनाथ वाघुले, विजय कदम, अजय कदम आदी उपस्थित होते.
ना. तनपुरे पुढे म्हणाले की, शेतकर्यांनी बीबीएफ तंत्रज्ञानाद्वारे पेरणीचा अवलंब केला पाहिजे. या तंत्रत्रानाद्वारे पेरणीचे अनेक फायदे आहेत. शेतकर्यांनी आपल्या अडीअडचणींबाबत प्रगतीशील शेतकर्यांशी, तसेच कृषी अधिकारी व कर्मचार्यांशी वेळोवेळी संवाद केला पाहिजे. त्यामुळे तुमच्या अडचणी दूर होतील. शेतकर्यांच्या पीक उत्पादन वाढीसाठी व त्यांच्या उत्पन्नवाढीसाठी जाणीवपूर्वक अधिक प्रयत्न व्हावेत, असे सांगितले.
श्री. नवले म्हणाले की, शासनाकडून शेतकर्यांसाठी राबविल्या जाणार्या विविध योजना कृषी विभागाच्या माध्यमातून अधिक सक्षमपणे राबविण्यावर आम्ही भर देत आहोत. पूर्वीपेक्षा सद्य परिस्थितीत महिला शेतकरी मोठ्या संख्येने विविध कार्यशाळांना उपस्थित राहत आहेत. कुटुंबाला हातभार लावत आहेत. कोरोना काळात कृषी विभागाने आपली जबाबदारी ओळखत शेवटच्या स्तरापर्यंत अधिक चांगले काम करण्याचा प्रयत्न केल्याचे सांगितले.

No comments:

Post a Comment