रात्री राडा; सकाळी गुलाल! - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Wednesday, June 30, 2021

रात्री राडा; सकाळी गुलाल!

 रात्री राडा; सकाळी गुलाल!

शिवसेनेच्या दोन नगरसेवकांत हाणामारी; कोतवाली पोलिस ठाण्यात तक्रार अर्ज दाखल

 काल रात्री शिवसेनेच्या दोन नगरसेवकांमध्ये चांगलीच हाणामारी झाली. नगरसेविकेचा पती निलेश भाकरे यांनी मला मारहाण झाल्याचा आरोप केला आहे. शिवसेनेचे कार्यकर्ते अनिल शिंदे आणि संभाजी कदम यांनी मारहाण केल्याचा आरोप निलेश भाकरे यांनी केला आहे. निलेश भाकरे यांनी एक व्हिडीओ प्रसिद्ध केला आहे. यामध्ये ’मुख्यमंत्र्यांच्या दारात मी माघार घेतली होती. मला जातीवरून शिव्या देऊन मारहाण केली. अनिल शिंदे आणि संभाजी कदम यांनी आपल्याला दिवसभर दारू पाजली. आमच्यात बोलणं सुरू असताना वाद झाला होता. त्यामुळे या दोघांनी मला बेदम मारहाण केली’, असे सांगणारा निलेश भांगरे याचा व्हिडिओ प्रसिद्धी माध्यमांमध्ये रात्रीच व्हायरल झाला आहे.


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः अहमदनगर महापालिकेचे महापौर, उपमहापौर यांच्या नावाची अधिकृत घोषणा आज सकाळी होण्यापूर्वीच रात्री शिवसेना नेत्यांमध्ये राडा झाला शिवसेनेच्या दोन नगरसेवकांत हाणामारी होत असतानाच शिवसेना संपर्क प्रमुख भाऊ कोरेगावकर यांनाही धक्काबुक्की झाली असल्याच्या बातम्या प्रसिध्दीमाध्यमातून प्रसारित झाल्या. काल मध्यरात्रीदरम्यान प्रसिद्धी माध्यमांसमोर हाणामारीचे व्हिडिओ प्रसारित होत असतानाच संपर्कप्रमुखांनी मला याबाबत काही माहिती नाही व मला धक्काबुक्की झाली नसून शिवसेनेत कोणतेही गटतट नसल्याचे सांगितले. रात्री राडा झाल्यानंतर सकाळी महापौरपदी शिवसेनेच्या रोहिणी शेंडगे यांच्या निवडीची घोषणा होताच शिवसैनिकांनी, शिवसेना नेत्यांनी, नगरसेवकांनी गुलाल उधळला.
अहमदनगरचे शिवसेनेचे संपर्कप्रमुख भाऊ कोरेगावकर यांच्यासमोर ही घटना घडली, त्यांनाही धक्काबुक्की  झाल्याची चर्चा होती. मात्र मला धक्काबुक्की झाली नाही, असे त्यांनी सांगितले आहे. मात्र, नगरसेविकेच्या पतीला मारहाण केली असून याप्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात सध्या तरी गुन्हा दाखल झालेला नाही. आज ऑनलाईन पद्धतीने महापौर आणि उपमहापौर यांची निवडणूक होणार आहे. त्याआधीच या राड्यामुळे नगरमध्ये खळबळ उडाली आहे.दरम्यान, एकमेंकांमधील काही वैचारिक वादाचे जे काही रूपांतर घडले त्याची मी संपूर्ण माहिती घेऊन योग्य ती कार्यवाही करणार असल्याची प्रतिक्रिया संपर्कप्रमुख कोरेगावकर यांनी दिली आहे. परंतु निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्याच दोन नगरसेवकात झालेल्या या हाणामारीमुळे शिवसेनेतील अंतर्गत कलह चव्हाट्यावर आला आहे. नगर पालिकेत भाजप आणि राष्ट्रवादीची सत्ता होती. त्यानंतर महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यानंतर स्थानिक पातळीवरही राष्ट्रवादी, शिवसेना आणि काँग्रेसने एकत्र येण्याची भूमिका घेतली. नगरमध्ये तिन्ही पक्षांनी एकमेकांना मदत करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे नगरमध्ये महापौरपदाची निवडणूक ही महाविकास आघाडी म्हणून लढणार असल्याचा निर्णय झाला आहे. यात महापौर पद हे शिवसेनेला तर उपमहापौर पद हे राष्ट्रवादीला देण्याचे ठरले. मात्र शिवसेनेकडून महापौर पदासाठी नगरसेविका रोहिणी शेंडगे आणी रिता भाकरे हे दोन उमेदवार इच्छुक असल्याने शिवसेनेतील मतभेदाबाबत जोरदार चर्चा रंगू लागल्या होत्या.अखेर त्या चर्चेवर पडदा टाकत शिवसेनेच्या नगरसेविका रिता भाकरे यांनी महापौर पदाच्या रिंगणातून माघार घेतली.
शिवसेनेच्या भाकरे यांनी माघार घेतल्याने नगरसेविका शेंडगे यांचा महापौर पदाचा मार्ग मोकळा देखील झाला. मात्र निवडणुकीच्या पूर्वसंध्येला निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना नगरसेवक अनिल शिंदे आणी निलेश भाकरे यांच्यात चांगलीच हाणामारी झाली. मी महापौर पदाच्या निवडणुकीतुन माघार घेतल्यानंतर देखील मला मारहाण करण्यात आली असल्याची प्रतिक्रिया निलेश भाकरे यांनी दिली आहे तसा तक्रार अर्ज देखील त्यांनी कोतवाली पोलीस ठाण्यात दिला आहे.

No comments:

Post a Comment