एक लाखाचे सव्वा दोन लाख व्याज घेणारा सावकार कर्जत पोलिसांच्या जाळ्यात - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Sunday, May 30, 2021

एक लाखाचे सव्वा दोन लाख व्याज घेणारा सावकार कर्जत पोलिसांच्या जाळ्यात

 खाजगी सावकाराच्या मागे पोलीस लागले हाथ धुवून 

एक लाखाचे सव्वा दोन लाख व्याज घेणारा सावकार कर्जत पोलिसांच्या जाळ्यात



नगरी दवंडी

कर्जत (प्रतिनिधी):- तालुक्यात मोठ्या प्रमाणावर सुरू असलेल्या विना परवाना खाजगी सावकारकीचे नवनवीन किस्से कर्जत पोलिसांच्या आवाहनामुळे समोर येऊ लागले आहेत. आपल्या मनाप्रमाणे व्याजाचे दर ठरवून संबंधितांकडून अव्वाच्या-सव्वा रक्कम वसुल करायची, कधीकधी तर घेतलेल्या रकमेपेक्षा तिप्पट-चौपट रक्कम देऊनही जमिनीचे खरेदी खत नावावर करून घ्यायचे किंवा स्वाक्षरी करून घेतलेले धनादेश वटवायचे अशा अनेक घटना उघड होत असून अशा निष्ठुर सावकाराच्या पाठीमागे कर्जत पोलीस हाथ धुवुन मागे लागले असल्याने तालुक्यातील खाजगी सावकाराचे धाबे दणाणले आहेत.

             राशीन येथील किराणा दुकानदार संदेश सावंत (नाव बदलले आहे) याच्याकडुन तक्रारदार विजय निंभोरे, रा.राशीन यांनी सन २०१४ साली ५% व्याजदराने १ लाख रुपये घेतले होते. रक्कम देण्यापूर्वी बँकेचा एक धनादेशही घेतला होता. पैसे देण्यासाठी मध्यस्ती आणि वेळोवेळी व्याजाचे पैसे आणणे यासाठी आणखी एकजण रा. जानभरे वस्ती, राशीन हा होता. तक्रारदाराने जुन २०१४ ते एप्रिल २०१८ पर्यंत प्रतीमहिना ५००० रु. प्रमाणे २ लाख ३० हजार एवढी रक्कम दिली मात्र तरीही सावकारांनी ऑगस्ट २०१८ साली घेतलेल्या धनादेशावर ३ लाख रुपये टाकून धनादेश वटवला. खात्यात रक्कम नसल्याने चेक बाऊन्स झाला. त्यावरून सावकाराने कोर्टात चेक बाऊन्सचा गुन्हा दाखल केला. सदरची केस एप्रिल २०२१ पर्यंत न्यायालयात चालु होती. एवढी मोठी रक्कम व्याजापोटी देऊनही आणखी ३ लाख रुपयांचा तगादा लावल्याने तक्रारदार निंभोरे यांनी कर्जत पोलिस ठाण्याकडे धाव घेतली. कर्जतचे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी याअगोदर सावकारकीची प्रकरणे हाताळून नागरिकांना न्याय मिळवून दिला होता. तक्रारदार पोलिसांकडे तक्रार देण्यासाठी आले असता आपल्या विरुद्ध गुन्हा दाखल होणार या धास्तीपोटी संबंधित खटला न्यायालयातून मिटवून घेत सदरचा व्यवहार सावकाराने परस्पर मिटून घेतला. सध्या कर्जत पोलिसांच्या धास्तीने अनेक प्रकरणे आपापसात मिटवून घेतली जात आहेत. तक्रारदार विजय निंभोरे आणि कुटुंबीयांनी पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांचे यामुळे आभार मानले.

  नागरीकांनो, कुणालाही न घाबरता पुढे या!

         तालुक्यात अवैधरित्या सुरू असलेल्या सावकारकीच्या जाचाला कंटाळून अनेक कुटुंबे धुळीस मिळत आहेत.अशा प्रकरणातून अनेक अनुचित प्रकारही घडतात. त्यामुळे नागरिकांनी कुणालाही न घाबरता कर्जत पोलिसांकडे याबाबत तक्रार द्यावी.त्यांना योग्य न्याय मिळवून देण्याचा प्रामाणिक प्रयत्न राहील.

            -चंद्रशेखर यादव, पोलीस निरीक्षक कर्जत

No comments:

Post a Comment