विकासकामात मलिदा लाटणार्‍यांचा खरा चेहरा नगरकर ओळखून आहेत - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Tuesday, May 18, 2021

विकासकामात मलिदा लाटणार्‍यांचा खरा चेहरा नगरकर ओळखून आहेत

 विकासकामात मलिदा लाटणार्‍यांचा खरा चेहरा नगरकर ओळखून आहेत

तपोवन रस्त्याच्या कामावरुन माजी महापौर अभिषेक कळमकर यांचा टोला


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः वेगाने विस्तार होत असलेल्या तपोवन रस्त्याचे राज्य शासनाच्या निधीतून होणारे काम निकृष्ट दर्जाचे झाल्याने शिवसेनेने वरिष्ठ पातळीवर पाठपुरावा केला. मागील वर्षी पहिल्याच पावसात या रस्त्याच्या कामाचे पितळ उघडे पडले. शिवसेना नेते माजी आमदार स्व.अनिल राठोड व शिवसेनेनं याबाबत आवाज उठवून रस्त्याचे काम नव्याने करण्यास भाग पाडले. त्यानुसार काम होत असताना आता परत फुकटचे श्रेय लाटण्याचे उद्योग सुरू झाले आहेत. यासाठी फोटो सेशन करून स्वतःची टिमकी वाजवून घेतली जात आहे. या कामाबाबत विद्यमान लोकप्रतिनिधी खरच गंभीर असते तर मागील वर्षी दर्जाहिन काम झालंच नसते. त्यांचे विकासकामांचे सोंग फोटो पुरतेच असल्याचे नगरकरांना चांगलेच माहीती झाले आहे. स्वतःच खोड्या करून चांगल्या कामात  खोडा घालण्याची त्यांची सवय नगर शहराची दुर्दशा करत आहे. स्वतःच खोडी करून विकासकामात खोडा घालायचा व आमच्या वर टिका करायची हे म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा आहे, अशी टीका माजी महापौर अभिषेक कळमकर यांनी केली आहे.
तपोवन रस्त्याचे नव्याने होत असलेल्या कामावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे लोकप्रतिनिधी व नगरसेवकांनी केलेल्या दाव्यावर प्रतिक्रिया देताना कळमकर यांनी विरोधकांचा समाचार घेतला. कळमकर म्हणाले की, तपोवन रस्त्याच्या दर्जेदार कामासाठी स्व.अनिलभैय्या राठोड व शिवसेना आग्रही होती. मागील वर्षी काम सुरू असतानाच शिवसेनेने दर्जाबाबत आवाज उठवला. त्यावेळी लोकप्रतिनिधींनी उलट्या बोंबा ठोकून फोटो सेशन करत कामाचा गवगवा केला. परंतु पहिल्याच पावसात नवीन रस्त्यांची चाळण झाली व श्रेय लाटणारेही उघडे पडले. शासनाच्या निधीचा अपव्यय झाल्याने शिवसेनेने आवाज उठवून शासनाला दखल घेणे भाग पाडले. असे असताना आता पुन्हा एकदा श्रेय लाटण्याची धडपड सुरू झाली आहे. मागील वर्षी या कामाचा दर्जा उघडा पडला होता. आताही काम झाल्याचा दावा करणार्यांचे पितळ पावसाळ्यात पुन्हा उघडे पडू शकते. कामांचे श्रेय मिळवण्यासाठी फोटो सेशन करताना त्या कामाचा दर्जा राखला जाईल हे सुध्दा त्यांनी पहावे. चांगले काम झाले तर आम्हीही तुमच्या फोटोला नक्की लाईक करू, तितका दिलदारपणा आमच्यात निश्चित आहे, असेही कळमकर यांनी म्हटले आहे.

No comments:

Post a Comment