तालुकास्तरावर ऑक्सीजन बेड्स आणि व्हेंटीलेटर बेड्सची संख्या वाढविण्याच्या विभागीय आयुक्त गमे यांच्या सूचना - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Thursday, May 6, 2021

तालुकास्तरावर ऑक्सीजन बेड्स आणि व्हेंटीलेटर बेड्सची संख्या वाढविण्याच्या विभागीय आयुक्त गमे यांच्या सूचना

 तालुकास्तरावर ऑक्सीजन बेड्स आणि व्हेंटीलेटर बेड्सची संख्या वाढविण्याच्या विभागीय आयुक्त गमे यांच्या सूचना



 

नगरी दवंडी

अहमदनगर: जिल्ह्यातील वाढता कोरोना संसर्ग रोखण्यासाठी जिल्हा प्रशासन करीत असलेल्या उपाययोजनांचा आज विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी आढावा घेतला. पुढील १० दिवसात संभाव्य रुग्णांची संख्या लक्षात घेऊन किमान एक हजार ऑक्सीजन बेड्सची उपलब्धता वाढविण्याचे नियोजन करण्यात आले असून तालुकास्तरावर ऑक्सीजन बेडस्ची संख्या वाढविण्याबरोबरच व्हेंटिलेटरची उपलब्धता वाढविण्याच्या सूचना त्यांनी केल्या.  विनाकारण रस्त्यावर तसेच सार्वजनिक ठिकाणी फिरणाऱ्यांची अॅण्टीजेन चाचणी करण्यासाठी अॅण्टीजेन कीटस् उपलब्ध करुन देण्यात येतील, असे त्यांनी स्पष्ट केले. नागरिकांनीही आता कोरोना संसर्गाची गती पाहता प्रतिबंधात्मक नियमांची स्वताहून अंमलबजावणी केली पाहिजे, असे त्यांनी  स्पष्ट केले.

विभागीय आयुक्त श्री.  गमे यांनी आज अहमदनगर येथे भेट दिली. यावेळी येथील जिल्हाधिकारी कार्यालय येथे कोरोना प्रतिबंधक उपाययोजनांचा त्यांनी आढावा घेतला. विभागीय उपायुक्त गोरक्षनाथ गाडीलकर ,जिल्हाधिकारी डॉ राजेंन्द्र भोसले ,जिल्हा पोलिस अधीक्षक मनोज पाटील, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र क्षीरसागर, मनपा आयुक्त शंकर गोरे, निवासी उपजिल्हाधिकारी संदीप निचित, अपर पोलिस अधीक्षक सौरभ अग्रवाल, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ सुनील पोखरणा, उपजिल्हाधिकारी तथा नोडल अधिकारी उदय किसवे, उर्मिला पाटील, उज्ज्वला गाडेकर, जयश्री आव्हाड, रोहिणी नऱ्हे, मनपा उपायुक्त यशवंत डांगे, जिल्हा नियोजन अधिकारी निलेश भदाणे, जिल्हा साथरोग सर्वेक्षण अधिकारी डॉ. दादासाहेब साळुंके आदींची यावेळी उपस्थिती होती.

यावेळी श्री. गमे यांनी जिल्ह्यातील कोरोना संसर्गासंदर्भातील सद्यस्थिती, रुग्णवाढ, कोणत्या भागात जास्त प्रादुर्भाव आहे, त्याची कारणे, त्याठिकाणी करण्यात येत असलेल्या उपाययोजना, रेमडेसीवीर उपलब्धता आणि वितरण, लसीकरण मोहिम, आरटीपीसीआर आणि अॅण्टीजेन चाचण्यांचे तालुकानिहाय प्रमाण, रुग्णबाधित निघण्याचे प्रमाण याबाबत तपशीलवार माहिती घेतली. जिल्हाधिकारी डॉ. भोसले यांनी जिल्हा प्रशासन करीत असलेल्या उपाययोजनांची माहिती  त्यांना दिली,  कोरोना संसर्ग आटोक्यात आणण्यासाठी महानगरपालिका क्षेत्र, जिल्ह्याचा इतर नागरी भाग तसेच ग्रामीण भागातील उपाययोजना आणि प्रतिबंधक कार्यवाहीची माहिती यावेळी त्यांना देण्यातआली.

विभागीय आयुक्तांनी या वेळी दूरदृश्य प्रणालीद्वारे प्रांताधिकारी आणि तहसीलदार यांच्याशीही संवाद साधला. त्याठिकाणी करण्यात येत असलेल्या उपाययोजनांची माहिती त्यांनी घेतली. तालुकापातळीवरील आरोग्य सेवा बळकट केल्या तर जिल्हापातळीवरील ताण काही प्रमाणात कमी करण्यास मदत होऊ शकेल, तसेच तालुकापातळीवरच उपचार मिळाल्याने रुग्ण लवकर बरे होतील, त्यादृष्टीने ऑक्सीजन बेडस आणि व्हेंटिलेटरची उपलब्धता वाढविण्यासाठी तालुकास्तरीय यंत्रणांनी कार्यवाही करण्याच्या सूचना त्यांनी केल्या. रेमडेसीवीर इंजेक्शनच्या बाबतीतही ते रामबाण औषध नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे त्याच्या वापराबाबत रुग्णांती स्थिती पाहून डॉक्टरच निर्णय घेऊ शकतात, असे त्यांनी सांगितले,

ऑक्सीजनची उपलब्धता आता बऱ्यापैकी  होत आहे. मात्र, जिल्ह्यातील बेड्स संख्या वाढविण्याच्या सूचना जिल्हा प्रशासनाला दिल्या आहेत. याशिवाय, प्रत्येक तालुक्यासाठी १०० ऑक्सीजन कॉन्सन्ट्रेटर घेण्यात येणार आहे. जिल्हाधिकारी स्तरावर त्याबाबतची कार्यवाही सुरु आहे. प्रत्येक ग्रामीण रुग्णालयासाठी प्रत्येकी दोन ड्युरा सिलींडरचे नियोजन जिल्हा प्रशासनाने केले आहे.  ऑक्सीजननिर्मितीच्या १२ प्रकल्पांनाआता मंजूरी मिळाली आहे, त्याचेही काम लवकरच सुरु होईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

जिल्ह्यात कोरोना बाधित रुग्णाच्या संपर्कातील व्यक्तींच्याही आरटीपीसीआर चाचण्या होणे गरजेचे आहे. किमान एका बाधित रुग्णामागे किमान २० व्यक्तींच्या चाचण्या केल्या जाणे आवश्यक आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.

No comments:

Post a Comment