समन्वय आणि नियंत्रण समितीची स्थापना करून आ. लंके यांचा समावेश करा - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Sunday, April 25, 2021

समन्वय आणि नियंत्रण समितीची स्थापना करून आ. लंके यांचा समावेश करा

 समन्वय आणि नियंत्रण समितीची स्थापना करून आ. लंके यांचा समावेश करा 

कोरोनाचे संकट : जिल्हा स्वयंसेवी संस्थांच्या महासंघाची मुख्यमंत्रयांकडे मागणी पारनेर : प्रतिनिधी 

कोरोना संसर्गामुळे निर्माण झालेल्या अभूतपूर्व संकटाचा मुकाबला करण्यासाठी जिल्हास्तरीय समन्वय आणि नियंत्रण समितीची स्थापना करून त्यात आमदार नीलेश लंके यांच्याप्रमाणे खरोखर ज्यांनी उत्तम स्थितीत लोकसहभागातून काम केले अशा लोकप्रतिनिधींचा समोवश करण्याची मागणी अण्णा हजारे प्रणित नगर जिल्हा स्वयंसेवी संस्थांच्या महासंघाने रविवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे पत्राद्वारे  केेली. 

मुख्यमंत्री उद्धव  ठाकरे यांना लिहिण्यात आलेल्या पत्रामध्ये नमुद करण्यात आले आहे की, ऑक्सीजनचा तुटवडा, रेमडेसिविर आणि इतर जिवनावष्यक औषधांचे दुर्भीक्ष आणि काळाबाजार, ऑक्सिजन व व्हेंटिलेटरची उपलब्धता असलेल्या खाटांची कमी संख्या, काही खाजगी रूग्णालयांकडून लावली जाणारी भरमसाठ बिले अशा परिस्थितीमुळे लोकांमध्ये मोठा असंतोष निर्माण झालेला आहे. लवकरच लोकांच्या भुकेचा मोठा प्रश्‍न निर्माण होणार आहे. उपाशी लोकांना घरपोच अन्न दिले नाही तर कोरोना संसर्ग टाळण्याचे सर्व प्रयत्न विफल ठरू शकतात अशी भिती या पत्रामध्ये व्यक्त करण्यात आली आहे. 

अशा परिस्थितीत प्रशासन, सामाजिक संस्था आणि संघटना यांचे प्रतिनिधी, वैद्यकिय व्यवसायातील जबाबदार डॉक्टर्स, संवेदनशील आणि प्रत्यक्ष कृतिशील असलेल्या आ. नीलेश लंके यांच्यासारखे लोकप्रतिनिधी, धार्मिक, सहकारी आणि शिक्षण संस्थांचे प्रतिनिधी यांच्या समन्वय आणि नियंत्रण समितीकडे सध्याच्या स्थितीतील सर्व निर्णय अधिकार दिले जावेत अशी सुचना या स्वयंसेवी संस्थांनी केली आहे. नगर जिल्हयाचे पालकमंत्री, इतर मंत्री यांचा अपवाद वगळता आमदार आणि खासदार सध्या समन्वयासाठी आणि लोकांचे प्रश्‍न सोडविण्यासाठी उपलब्ध नाहीत. गंभीर वैद्यकिय प्रश्‍न सोडविण्यात व्यस्त असलेल्या प्रशासकीय अधिकाऱ्यांना सध्या समस्याग्रस्त लोकांशी, वैद्यकिय व्यवसायिकांशी, विविध केअर सेंटरशी, औषधांचा पुरवठा करणाऱ्या पुरवठादारांशी संवाद आणि समन्वय ठेवताना मर्यादा येत आहेत. त्यामुळे संभाव्य  आराजकाची परिस्थिती टाळण्यासाठी अशा समन्वय समितीचा उपयोग होईल अशी आशा या पदाधिका-यांनी व्यक्त केली आहे. 

या पत्रावर शाम आसावा, अजित माने, अनिकेत कौर, सुलक्षणा अहिरे, पुजा पोपळघट, शबाना शेख, शाहिद शेख, अजित कुलकर्णी, तुलसीभाई पालीवाल, मिरेन गायकवाड, अजय वाबळे, संतोष धर्माधिकारी, प्रियंका सोनवणे, प्रवीण मित्याल, विपुल शेटीया, नाना भोरे, किशोर मुनोत, महेश सुर्यवंशी, सागर फुलारी, हनिफ शेख यांच्या सहया आहेत. 


आ. लंके यांच्याप्रमाणे हवेत, चमकोगिरी करणारे नको !

आमदार नीलेश लंके यांच्याप्रमाणे खरोखर ज्यांनी कठीण स्थितीत उत्तम काम लोकसहभागातून केले ते  लोकप्रतिनिधी या समन्वय समितीमध्ये असावेत. राजकिय चमकोगिरी करणारे राजकिय नेते त्यात घेतल्यास समितीचा उद्देश विफल होईल असेही मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रामध्ये महासंघाने नमुद केले आहे.

No comments:

Post a Comment