अडथळ्यांची शर्यत पार करुन नगरमध्ये दाखल झालेला ऑक्सिजनचा टँकर पडला बंद - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Wednesday, April 21, 2021

अडथळ्यांची शर्यत पार करुन नगरमध्ये दाखल झालेला ऑक्सिजनचा टँकर पडला बंद

 शहरात ऑक्सिजनसाठी ठरली कत्तलची रात्र

अडथळ्यांची शर्यत पार करुन नगरमध्ये दाखल झालेला ऑक्सिजनचा टँकर पडला बंद

शेवटी राष्ट्रवादीचे पदाधिकारी व पोलीसांच्या मदतीने टँकर झाला पोहोच

शहरात ऑक्सिजन अभावी मोठी जीवीत हानी होण्याचे टळले

जबाबदार अधिकारी साखर झोपेत



नगरी दवंडी

अहमदनगर- शहरात ऑक्सिजनचा साठा संपुष्टात येत असताना, मंगळवारी मध्यरात्री अनेक अडथळ्यांची शर्यत पार करुन पुणे येथूल आलेला ऑक्सिजनचा टँकर दिल्लीगेट रोड येथील हुतात्मा स्मारक समोर बंद पडल्याने अनेकांची त्रेधा उडाली. राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी व तोफखाना पोलीस स्टेशनचे अधिकारी, कर्मचारी यांच्या मदतीने बंद पडलेला ऑक्सिजनचा टँकर दुरुस्त करुन जिल्हा रुग्णालय व एमआयडीसी येथील ऑक्सिजन प्लांटला रवाना करण्यात आला. शहराच्या हॉस्पिटलमधील ऑक्सिजन संपत असताना शेवटच्या क्षणाला युवक व पोलीसांच्या प्रयत्नाने संजीवनीरुपी ऑक्सिजन मिळाल्याने अनेक कोरोना रुग्णांचे जीव वाचले. तर शहरात ऑक्सिजन अभावी मोठी जीवीत हानी होण्याचे टळले.

शहरातील अनेक खाजगी रुग्णालयासह जिल्हा रुग्णालयात कोरोनाचे रुग्ण उपचार घेत आहे. मंगळवारी सकाळीच खाजगी रुग्णालयाच्या डॉक्टरांनी ऑक्सिजन संपण्याची शक्यता वर्तवून रुग्णांच्या नातेवाईकांना स्पष्ट कल्पना दिली होती. तसेच या गंभीर परिस्थितीबद्दल जिल्हाधिकारी यांना सांगून ऑक्सिजनची मागणी केली होती. जिल्हा रुग्णालयातील ऑक्सिजन देखील संपण्याच्या मार्गावर होता. ऑक्सिजन नसेल तर उपचार कसे होणार? या गंभीर प्रश्‍नाने सर्वच हतबल झाले होते. शहरातील ही गंभीर परिस्थिती राष्ट्रवादीच्या पदाधिकार्‍यांनी आमदार संग्राम जगताप यांना सांगितली असता, त्यांनी प्रशासनाच्या माध्यमातून पुणे येथून तातडीने ऑक्सिजनचा टँकर मागविण्यात आला असल्याची माहिती दिली. तर सर्व राष्ट्रवादीचे पदाधिकारी व डॉक्टर या ऑक्सिजन टँकरच्या प्रतिक्षेत होते. या ऑक्सिजनच्या टँकरला रांजणगाव येथे आरटीओनी अडवले. यामध्ये देखील काही वेळ वाया गेला. पुढे हा टँकर अहमदनगर जिल्ह्याच्या हद्दीत पोलीस बंदोबस्तामध्ये आनण्यात आला. मात्र शहरातील हुतात्मा स्मारकासमोर हा टँकर बंद पडल्याने सर्वांची त्रेधा उडाली. तर दुसरीकडे व्हेंटिलेटरवर असलेल्या रुग्णांचे नातेवाईक व हॉस्पिटलचे डॉक्टर ऑक्सिजनच्या प्रतिक्षेत जीव मुठीत घेऊन बसले होते.

सदर टँकर बंद पडल्याचे माहिती मिळताच रात्री 2 वाजता राष्ट्रवादी अल्पसंख्यांक विभागाचे शहर जिल्हाध्यक्ष साहेबान जहागीरदार, राष्ट्रवादी विद्यार्थी सेलचे शहर जिल्हाध्यक्ष वैभव ढाकणे व माजी नगरसेवक विपुल शेटीया घटनास्थळी दाखल झाले. तर तोफखाना पोलीस स्टेशनचे सहा.पो.नि. मेढे व त्यांचे सहकारी देखील मदतीला धाऊन आले. जहागीरदार यांनी टँकरला धक्का देऊन घेऊन जाण्यासाठी मध्यरात्री जेसीबी उपलब्ध केला. मात्र ऑक्सिजन टँकरचे वजन 20 टन पेक्षा अधिक असल्याने वाहन चालू करण्याशिवाय पर्याय उरला नाही. प्रशासनातील जबाबदार अधिकारी यांना फोन लावला असता कोणीही फोन उचलला नाही. राष्ट्रवादीच्या पदाधिकार्‍यांनी सदर प्रसंगाची माहिती आमदार संग्राम जगताप यांना फोनवर दिली. तसेच आमदार जगताप यांनी तातडीने हलचल करुन टँकर सुरु करण्यासाठी सूचना केल्या. राष्ट्रवादीचे पदाधिकारी व पोलीसांनी सर्जेपुरा येथील दुकान उघडून टँकरच्या वाहनाचे मशीन बेल्ट व फिटर उपलब्ध केले. ऑक्सिजनचा बंद पडलेला टँकर सुरु झाल्याने सर्वांनी सुटकेचा निश्‍वास सोडला. नंतर ऑक्सिजनचा टँकर जिल्हा रुग्णालयात नेण्यात आला. यामधील अर्धा टँकर रिकामा करुन, उर्वरीत अर्धा टँकर एमआयडीसी ऑक्सिजनच्या प्लँटमध्ये पाठविण्यात आला.

ऑक्सिजन घेऊन येणार्‍या टँकरच्या पुढे सबका मालिक एक, असे लिहिलेले होते. जणू हा संजीवनी घेऊन आलेला एकमेव टँकरच सर्वांच्या जीवाचा मालिक ठरला.

राष्ट्रवादीचे पदाधिकारी व पोलीसांच्या कार्यतत्परतेने वाचले अनेकांचे जीव. हा टँकर चालू नसता झाला, तर शहरात ऑक्सिजन येऊन देखील अनेक रुग्णांना ऑक्सिजन अभावी जीव गमवावा लागला असता.  

मध्यरात्री अनेकांचे जीव वाचविण्यासाठी मोठी गंभीर परिस्थिती निर्माण झाली होती. एकीकडे शहरात येऊन देखील बंद पडलेला ऑक्सीजनचा टँकर तर दुसरीकडे प्रशासनाचे जबाबदार अधिकारी झोपेत असल्याने फोन उचलण्यास तयार नव्हते. टँकर दुरुस्त करण्यास उशीर झाला असता, तर खाजगीव जिल्हा रुग्णालयातील ऑक्सिजन संपून अनेक कोरोना रुग्णांना जीव गमवावा लागला असता. या संकटकाळात प्रशासनातील जबाबदार अधिकार्‍यांनी चोवीस तास सतर्क राहून जबाबदारी सांभाळण्याची गरज आहे. राष्ट्रवादीचा प्रत्येक पदाधिकारी आमदार संग्राम जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली संकटकाळात जबाबदारी खांद्यावर घेऊन कार्य करीत आहे. कोरोनाची दुसरी लाट थोपवण्यासाठी राजकारण बाजूला ठेऊन, अनेकांना मदतीचा हात दिला जात आहे. -साहेबान जहागीरदार 

No comments:

Post a Comment