संतांनी माणसाला माणूस म्हणून जगण्याचे शिकविले ःबालयोगी अमोल महाराज - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Saturday, February 6, 2021

संतांनी माणसाला माणूस म्हणून जगण्याचे शिकविले ःबालयोगी अमोल महाराज

 संतांनी माणसाला माणूस म्हणून जगण्याचे शिकविले ःबालयोगी अमोल महाराज

संत भगवान बाबा व वामनभाऊ पुण्यतिथी सोहळ्यानिमित्त आयोजित सप्ताहाची सांगता

नगरी दवंडी/प्रतिनिधी

अहमदनगर ः राष्ट्रसंत भगवानबाबांनी महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात कीर्तनाच्या माध्यमातून शैक्षणिक, सामाजिक, नैतिक व सांस्कृतिक प्रबोधन केले. भक्तिमार्ग, कर्ममार्ग व ज्ञानमार्ग यांचा त्रिवेणी समन्वय त्यांनी साधला होता. तो त्यांच्या कीर्तनातही दिसून येई.  आपल्या कीर्तनांतून ते जातिभेद, धर्मभेद, अज्ञान, अंधश्रद्धा, अनिष्ट रुढी-परंपरा यांच्यावर प्रहार करीत.  विठूनामाचा प्रचार करतानाच त्यांनी समता, बंधुता, एकता, मानवता यांसारख्या आधुनिक विचारांचा आयुष्यभर प्रचार केला. त्यामुळेच वारकरी धर्माला आधुनिक रूप देणारे संत म्हणून त्यांना ओळखले जाते. तर  वामनभाऊ महाराज हे एक अवतारी सिध्दपुरुष, साक्षात्कारी संत होते. त्यांनी आपले संपूर्ण जीवन वारकरी सांप्रदायाला समर्पित केले होते. वामनभाऊ महाराज यांनी अध्यात्मातून अठरा पगड जातींच्या लोकांमध्ये चांगल्या विचारांची पेरणी केली. या संतांनी माणसाला माणूस म्हणून जगण्याचे शिकविले, असे अनेक उदाहणातून संतांच्या कार्याचा उल्लेख हभप बालयोगी अमोल महाराज यांनी केले.
   सारसनगर येथे संत भगवान बाबा सेवाभावी प्रतिष्ठानच्यावतीने आयोजित सप्ताहाच्या समारोपप्रसंगी काल्याचे किर्तनात अमोल महाराजांनी मार्गदर्शन केले. याप्रसंगी नगरसेवक प्रकाश भागानगरे, हभप झुंबर आव्हाड, रामदास बडे, म्हातारदेव घुले, भगवान ढाकणे, देवराम घुले, बबन घुले, भगवान आव्हाड, मच्छिंद्र दहिफळे, अनिल पालवे, उद्धव ढाकणे, दादा कर्हाड, भैरु सानप आदि उपस्थित होते.
   यावेळी नगरसेवक प्रकाश भागानगरे म्हणाले, संत भगवान बाबांनी समाजात असलेल्या अनिष्ट रूढी, चुकीच्या परंपरा व अंधश्रद्धा बंद करण्याचा उपदेश केला. प्रबोधनकार्यासाठी त्यांनी आंध्रप्रदेश, कर्नाटकासह उभा महाराष्ट्र पिंजून काढून मोठी जागृती केली. दरवर्षी या भागात होत असलेल्या सप्ताहामुळे परिसरात धार्मिक वातावरण निर्माण होऊन भाविकांनी ही एक पर्वणीच असते. धार्मिक उपक्रमांमुळे मनुष्याला मन:शांती लाभत असल्याने आयोजकांना कौतुक केले.
   यावेळी झुंबर आव्हाड म्हणाले, गेल्या 13 वर्षांपासून संत भगवान बाबा व संत वामनभाऊ यांच्या पुण्यस्मरणानिमित्त या सप्ताहाचे आयोजन करण्यात येत असते. यात महाराष्ट्रातील नामवंत किर्तनकार व प्रवचनकार सेवा देत असल्याने भाविकांची अध्यात्मिक भूक भागविली जाते. या सप्ताहासाठी अनेकांचे सहकार्य लाभत असल्याने हा सप्ताह यशस्वी होत आहे. यापुढील काळातही ही सेवा अखंड सुरु ठेवण्यासाठी प्रतिष्ठानचे कार्यकर्ते प्रयत्नशील राहतील, असे सांगितले.
    यावेळी हभप संजय महाराज महापुरे, हपभ शेंडे महाराज, हभप प्रभाताई भोंग, हभप हांडे महाराज, ज्ञानेश्वर खेडकर, नंदकुमार शिकरे, प्रताप घोडके, गाढवे सर, पवार सर, झांबरे, सांगळे, शेख मामू, संतोष हरबा आदि उपस्थित होते.

No comments:

Post a Comment