शेतकर्‍यांने केली ‘अफू’ ची शेती! - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Friday, February 26, 2021

शेतकर्‍यांने केली ‘अफू’ ची शेती!

 शेतकर्‍यांने केली ‘अफू’ ची शेती!

56 किलो अफूची झाडे जप्त; गुन्हा दाखल, शेतकरी गजाआड, जामखेड पोलिसांची कार्यवाही.


जामखेड : ‘अफू’ हा अमली पदार्थ आहे. राज्यात अफू बाळगणे किंवा विक्री करणे हा कायद्याने गुन्हा असताना जामखेड तालुक्यातील जातेगाव मधील शेतकरी वासुदेव महादेव काळे यांनी आपल्या शेतात अफूची झाडे लावली. जामखेड पोलिसांना याचा सुगावा लागल्यामुळे त्यांनी शेतात जाऊन 1 लाख 70 हजाराची 56 किलो अफूची झाडे जप्त करून वासुदेव काळे यांचे विरोधात गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली आहे. जातेगाव मध्ये पकडण्यात आलेली अफू व त्याचा वापर कशासाठी केला जाणार होता याचा शोध पोलीस घेणार आहेत. काही शेतकरी अफूची शेती ‘खसखस’ तयार करण्यासाठीही करतात ही अफूची शेती ‘खसखस’ साठी की अमली पदार्थसाठी करण्यात आली हा प्रश्न याप्रसंगी उपस्थित होत आहे.

उत्तर प्रदेश आणि आंध्र प्रदेशामध्ये ठराविक जिल्ह्यांत अफू उत्पादनाला परवानगी आहे. म्हणजे पीक म्हणून खसखस पेरता येते. त्याची नोंद करावी लागते. आलेले सर्व उत्पादन शासन खरेदी करते. महाराष्ट्रात या उत्पादनाला परवानगी नाही. भारतीय समाजाची एक मोठी परंपरा आहे. अगदी दुष्काळाच्या काळातही लोकांनी अन्नधान्याची मागणी करीत धान्याच्या गोदामांसमोर प्राण सोडले. कित्येक लोक भुकेने मेले, पण त्यांनी गोदामे फोडली नाहीत. नैतिकतेची चाड सर्वसामान्य भारतीय माणसाला आणि त्यातही शेतकर्‍यांना कायमच राहिली आहे. हा जो गावगाडा आहे, तो या नैतिकतेवरच चालतो याचे सम्यक भान शेेतकरी वर्गाने नेहमीच दाखवलेले आहे. मग अचानक अफूची शेती सापडली हे कसे काय झाले बुवा?
अफू हे 60 ते 120 सेंमी. उंचीचे झुडूप आहे. साधारण दीड महिन्यांच्या अंतराने याला फुले येतात. या झुडूपाच्या बोंडात ज्या बिया असतात त्यांनाच खसखस म्हणतात. या  कच्च्या बोंडांना चिरा पाडल्या जातात. त्यातून पाझरणार्‍या रसापासून अफू बनवली जाते. ही प्रक्रिया शेतकर्‍यांच्या शेतात किंवा घरी होत नाही. शेतकर्‍यांकडून ही अफूची बोंडे विकत घेतली जातात. व्यापार्‍यांकडून ही बोंडे वाळवून ती मादक पदार्थ तयार करणार्‍यांना चढ्या भावात विकली जातात. या बोंडांपासून अफू तयार करणारी मोठी आंतरराष्ट्रीय साखळी कार्यरत आहे. अफूचा वापर वैद्यकीय क्षेत्रात केला जातो. आपल्याकडे ग्रामीण भागात अल्प प्रमाणात या अफू बोंडांचा वापर महिला औषधांसारखा करतात. अफू पिकवणारा गुन्हेगार ठरवला जातो तर त्याचा व्यापार करणार्‍यांवर कार्यवाही केली जात नाही प्रत्यक्ष या मादक पदार्थांचे तस्कर कसे शोधून काढणार? आणि त्यांच्यावर गुन्हे दाखल कसे करणार? मुळात यांच्यावर कारवाई करणार का? हा ही प्रश्न या ठिकाणी उपस्थित होत आहे. शेतकर्‍यांवर कारवाई करून काहीच साध्य होणार नाही पण काहीतरी कारवाई केल्याचे याबाबत पोलिस सुत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, जामखेड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांना कोणीतरी माहिती दिली की
जामखेड तालुक्यातील जातेगाव येथे एका व्यक्तीने आपल्या शेतात अफुची झाडे लावली आहेत. मिळालेल्या माहिती नुसार पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड हे काल रोजी सायंकाळी पो. हे कॉ संजय लाटे, संदिप आजबे, संग्राम जाधव, आबासाहेब अवारे, विजय कोळी, सचिन पिरगळ, संदिप राऊत, अविनाश ढेरे यांचा समावेश असलेल्या पोलीस पथकासह त्या ठिकाणी गेले व खात्री करुन घेतली  असता आरोपी वासुदेव महादेव काळे रा. काळे वस्ती, जातेगाव याने त्याच्या मालकीच्या गट नंबर 1077 मधिल शेतात 56 किलो वजनाची हिरव्या रंगाची बोंडे व पाने असलेली 1 लाख 69  हजार 815 रुपये किमतीची अफुची झाडे लावल्याचे आढळून आले. त्यानुसार पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांनी या ठिकाणी छापा टाकून सर्व झाडे जप्त केली.
यावरून जामखेड पोलीस स्टेशनचे पो.हे.कॉ संजय लाटे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार आरोपी वासुदेव महादेव काळे च्या विरोधात अमली औषधी द्रव्य व मन प्रभावी (उत्तेजक) पदार्थ अधिनियम सन 1985 च्या कलम 15 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. व आरोपीस अटक केली आहे.
या घटनेचा पुढील तपास पोलीस अधिक्षक मनोज पाटील अपर पोलीस अधिक्षक सौरभ कुमार अग्रवाल उपविभागीय पोलीस अधिकारी आण्णासाहेब जाधव, यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड हे करत आहेत.

No comments:

Post a Comment