दहशतवाद्यांचा खात्मा केलेल्या जवानाचा जेऊर येथे सत्कार - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Thursday, January 21, 2021

दहशतवाद्यांचा खात्मा केलेल्या जवानाचा जेऊर येथे सत्कार

 दहशतवाद्यांचा खात्मा केलेल्या जवानाचा जेऊर येथे सत्कार


नगरी दवंडी/प्रतिनिधी
अहमदनगर ः नगर तालुक्यातील डोंगरगण येथील भूमिपुत्र विकास वसंत पवार यांनी सैन्यदलात सेवा करताना तीन दहशतवाद्यांना कंठस्नान घालुन सेना पदक मिळविले त्याबद्दल त्यांचा सत्कार जेऊर ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आला.
संतुकनाथ सेवा मंडळ व बायजामाता आजी-माजी सैनिक संघटनेच्या वतीने विकास पवार यांच्या सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. 15 जानेवारी रोजी सेना दिनाच्या औचित्यावर भारतीय सेना प्रमुख जनरल मुकुंद नरवणे यांच्या हस्ते नवी दिल्ली येथील करिअप्पा परेड मैदानावर विकास पवार यांना सेनापदक  प्रदान करण्यात आले.
डिसेंबर महिन्यात हवालदार विकास पवार हे जम्मू काश्मीर येथे प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर कर्तव्य बजावत असताना पाच जवानांच्या टीमचे नेतृत्व करत होते. त्यावेळी सीमारेषा ओलांडून भारतीय हद्दीत प्रवेश करण्याच्या तयारीत असलेल्या तीन दहशतवाद्यांना हवालदार पवार यांनी यमसदनी धाडले त्यांच्या या पराक्रमाबद्दल त्यांना सेनापदक देऊन गौरविण्यात आले
विकास पवार हे मुळचे जेऊर येथील चाफेवाडी चे रहिवासी आहेत. आपल्या गावच्या भूमिपुत्राने देशाची सेवा बजावताना केलेल्या धाडसी कार्याचे कौतुक करण्यासाठी त्यांचा सत्कार सोहळा आयोजित केल्याची माहिती माजी सैनिक गिरीश मगर, युवा नेते सुनील पवार यांनी दिली. यावेळी विकास पवार यांनी दहशतवाद्यांचा खात्मा करताना केलेल्या घटनेचे चित्तथरारक प्रसंग ग्रामस्थांना सांगितले.
यावेळी माजी पंचायत समिती सदस्य गोविंद मोकाटे, माजी सरपंच मधुकर मगर, स्वप्निल तवले, बायजामाता आजी-माजी सैनिक संघटनेचे अध्यक्ष अण्णासाहेब दारकुंडे तसेच सदस्य, संतुकनाथ सेवा मंडळाचे सदस्य व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

No comments:

Post a Comment