नाभिक समाजाच्या शासनाकडील प्रलंबित मागण्यांसाठी आजी-माजी आमदारांनी प्रयत्न करावे - विजय क्षीरसागर - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Friday, January 29, 2021

नाभिक समाजाच्या शासनाकडील प्रलंबित मागण्यांसाठी आजी-माजी आमदारांनी प्रयत्न करावे - विजय क्षीरसागर

 नाभिक समाजाच्या शासनाकडील प्रलंबित मागण्यांसाठी आजी-माजी आमदारांनी प्रयत्न करावे - विजय क्षीरसागर

बबनराव पाचपुते-राहुल जगताप यांना निवेदन


श्रीगोंदा -
2020 हे वर्ष संपूर्ण जगाला त्रासदायक गेले. यामधून कोणीही सुटले नाही. नाभिक समाजाला तर कोरोना हा एक शाप होता कि काय? अशी परिस्थिती सलून कारागिरांवर आली होती. लॉकडाऊनमुळे दुकाने बंद, हातावर पोट भरणारे कारागिर अक्षरश: हवालदिल झाले होते. अशा परिस्थितीत आत्महत्या हा पर्याय काहीनी शोधला तर काहींनी शासनाकडे मदत मागितली पण आर्थिक सहकार्य मिळाले नाही. तरी आमच्या शासनाकडील प्रलंबित मागण्यांसाठी आता तालुक्यातील आजी - माजी आमदारांनी पाठपुरावा करुन त्या मागण्या पूर्ण कराव्यात, असे प्रतिपादन  महाराष्ट्र नाभिक महामंडळाचे श्रीगोंदा तालुका अध्यक्ष विजय क्षीरसागर यांनी केले.श्रीगोंद्याचे आमदार बबनराव पाचपुते व माजी आमदार राहुल जगताप यांना निवेदन देण्यात आले, यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी तालुक्यातील महामंडळाचे युवक अध्यक्ष अजय रंधवे, सचिव इंद्रजित कुटे, माजी सभापती दत्ताभाऊ कोठारे, परिट समाजाचे युवक जिल्हाध्यक्ष गणेश कदम, शहराध्यक्ष राजेंद्र कुटे, बारा बलुतेदार महासंघाचे कांतीलाल कोकाटे, जिल्हा उपाध्यक्ष सोमनाथ कदम, संपर्कप्रमुख गणेश शिंदे, सचिव महेश शिंदे, युवक शहराध्यक्ष महेश क्षीरसागर, रोहन रंधवे, सामाजिक कार्यकर्ते भाऊसाहेब डांगे, घनश्याम जाधव, निखिल क्षीरसागर, दिलीप शिंदे, शरद शिंदे व पदाधिकारी उपस्थित होते.

     क्षीरसागर पुढे म्हणाले की, आत्महत्याग्रस्त कुटूंबास 10 लाख रुपये आर्थिक मदत, सलून कारागिरास दरमहा 15 हजार रुपये पेंशन योजना, अनुसूचित जातीत समावेश करण्यासाठी राज्य शासनाने केंद्राकडे पाठपुरावा करावा, रोहिणी आयोगाची अंमलबजावणी करावी, या मागण्या तातडीने पूर्ण झाल्यावर कुठेतरी नाभिक समाजाला हातभार लागेल, असे ते म्हणाले.यावेळी आमदार पाचपुते यांनी निवेदन स्वीकारुन या मागण्यांचा विधानसभेत / विधान परिषदेत मुद्दे उपस्थित करुन शासनाकडे पाठपुरावा करु असे सांगितले. तर माजी आ.राहुल जगताप यांनी या समाजाला न्याय देण्यासाठी संघटनेच्या पाठिशी राहून नाभिक समाजाच्या मागण्यांबाबत सहानुभूतीपूर्वक विचार करु, असे सांगितले.अजय रंधवे यांनी यावेळी सांगितले की, महाराष्ट्र राज्याचे नाभिक महामंडळाचे प्रांताध्यक्ष कल्याणराव दळे व प्रांत उपाध्यक्ष माऊली गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली आज हे निवेदन दिले. मुख्यमंत्र्यांकडे मागण्या केल्या आता तालुक्यातील लोकप्रतिनिधींना निवेदने दिली. सर्व बाजूंनी प्रयत्न केला आता तरी शासन दखल घेईल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.यावेळी नाभिक महामंडळासह परिट समाजाचे मार्गदर्शक रविंद्र क्षीरसागर, कुंभार समाजाचे जिल्हाध्यक्ष दत्तात्रय काळे, वडार समाजाचे जिल्हाध्यक्ष बबनराव पवार तसेच बारा बलुतेदार महासंघाचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

No comments:

Post a Comment