त्यांनी पळवलेले पाणी आम्ही बुर्‍हानगरांना उपलब्ध करून देणार : प्रा. गाडे - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Monday, January 11, 2021

त्यांनी पळवलेले पाणी आम्ही बुर्‍हानगरांना उपलब्ध करून देणार : प्रा. गाडे

 त्यांनी पळवलेले पाणी आम्ही बुर्‍हानगरांना उपलब्ध करून देणार : प्रा. गाडे

बुर्‍हानगर ग्रामपंचायतीच्या निवडणुकीतील परिवर्तन पॅनलच्या उमेदवारांच्या प्रचाराचा शुभारंभ


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः बुर्‍हानगरच्या 30 वर्षाच्या इतिहासात प्रथमच लोकशाही पद्धतीने ग्रामपंचायतची निवडणुक होत आहे. त्यामुळे इथल्या नेत्यांच्या दडपशाही व गुंडशाही न घाबरता बुर्‍हानगरची जनता या निवडणुकीत निर्भीडपणे मतदान करतील. लोकशाही काय असते हे त्यांना आता कळेल. बुर्‍हानगरचा विकास केला - विकास केला  असे सांगणार्‍या नेत्यांनी गावाचा, जनतेचा विकास न करता स्वतःचाच विकास केला. त्यामुळे त्यांच्या प्रॉपर्टीत एक हजार कोटींनी वाढ झाली आहे. यांनी गावाचे पाणी दुसरीकडे पळवल्याने गावातील नागरिकांना 15 -15 दिवस पाणी मिळत नाहीये. बुर्‍हानगर प्रादेशिक योजनेचे पाणी त्यांनी शेतीसाठी वळवले. फक्त स्वताच्या घराकडील रस्त्यांचे डांबरीकरण केले. मात्र आता मंत्री प्राजक्त तनपुरे व आम्ही मिळून यात लक्ष घालणार असून शेती कडे वळवलेले पाणी बुर्‍हानगरच्या नागरिकांना उपलब्ध करून देणार आहोत. आमचे डीपॉझीट जप्त न होता बुर्‍हानगरच्या सर्वच्या सर्व जागांवर महाविकास आघाडीचे उमेदवारांचा विजय निश्चीत आहे. तालक्यातील 50 हून अधिक ग्रामपंचायती महाविकास आघाडी जिंकणार आहे, असे प्रतिपादन जिल्हाप्रमुख प्रा. शशिकांत गाडे यांनी केले.
नगर तालुक्यातील बुर्‍हानगर ग्रामपंचायतीच्या निवडणुकीतील महाविकास आघाडीच्या परिवर्तन पॅनलच्या उमेदवारांच्या प्रचाराचा शुभारंभ आज सकाळी तुळजाभवानी मातेच्या मंदिर परिसरात राहुरीच्या माजी नगराध्यक्षा उषा तनपुरे यांच्या हस्ते झाले. यावेळी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख प्रा. शशिकांत गाडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष उध्दव दुसुंगे, राहुरीच्या नगराध्यक्षा अनिता पोपळघट, अमोल जाधव, अ‍ॅड.विजय भगत, बाबासाहेब कर्डिले, अ‍ॅड. अभिषेक भगत, रोहिदास कर्डिले, माजी महापौर भगवान फुलसौंदर, शहर प्रमुख दिलीप सातपुते आदींसह शिवसेनेचे नगरसेवक, स्थानिक नागरिक व उमेदवार उपस्थित होते.
राहुरीच्या माजी नगराध्यक्षा उषा तनपुरे यांनी महाविकास आघाडीच्या सर्व उमेदवारांना शुभेच्छा दिल्या, त्या म्हणाल्या, बुर्‍हानगरच्या विकासासाठी आता परिवर्तन घडवत महाविकास आघाडीला जनतेनी साथ द्यावी. बुर्‍हानगरच्या ग्रामस्थांच्या बरोबर संपूर्ण तनपुरे कटुंब आहे. उध्दव दुसुंगे म्हणाले, ग्रामपंचायतच्या निवडणुकी मध्ये या गावातील सद्दामशाही आता संपणार आहे. तालुक्याचा विकास दादापाटील शेळके यांनीच केला. त्यांनी काहीच केले नाही. जनताच त्यांना आता पुन्हा एकदा जागा  दाखवणार आहे. अ‍ॅड. अभिषेक भगत म्हणाले, 30 वर्षांनी बुर्‍हानगरच्या जनतेने ग्रामपंचायतची निवडणूक हाती घेतली आहे. त्यामुळे गावाच्या विकासासठी आता परिवर्तन होणार असून महाविकास आघाडीचे सर्व उमेदवार निवडून येतील. रोहिदास कर्डिले म्हणाले, बुर्‍हानगरच्या ग्रामपंचायत निवडणुकी साठी मी व माझ्या पत्नीने उमेदवारी अर्ज भरल्यानंतर त्यांनी प्रशासनावर दबाव टाकून सूड बुद्धीचे राजकारण करत अर्ज बाद करण्याचा प्रयत्न केला. मात्र न्यायदेवतेने मला न्याय दिल्याने आमचे अर्ज वैध ठरले आहेत. बुर्‍हानगरची सर्व जनता आमच्या बरोबर आहे. दडपशाहीला न घाबरता आमचे परिवर्तन पॅनलचा विजय निश्चीत आहे.
यावेळी महाविकास आघाडीच्या परिवर्तन पॅनलचे उमेदवार सुवर्णा कर्डिले, अश्विनी जाधव, कुणाल भगत, सुभाष भगत आदींसह गिरीष जाधव, अ‍ॅड. अशोक कोठारी, नगरसेवक बाळासाहेब बोराटे, संग्राम शेळके, अमोल येवले, विशाल वालकर, संग्राम कोतकर, सोमनाथ जाधव, भगवान हरबा, राजू भगत आदी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment