राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंतीनिमित्त 32 नागरिकांचा मरणोत्तर नेत्रदान करण्याचा संकल्प - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Tuesday, January 12, 2021

राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंतीनिमित्त 32 नागरिकांचा मरणोत्तर नेत्रदान करण्याचा संकल्प

 राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंतीनिमित्त

फिनिक्स फौंंडेशनच्या मोफत नेत्र तपासणी, मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिरास प्रतिसाद

32 नागरिकांचा मरणोत्तर नेत्रदान करण्याचा संकल्प


नगरी दवंडी/प्रतिनिधी

अहमदनगर ः राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या जयंती निमित्त फिनिक्स सोशल फाऊंडेशनच्या वतीने नागरदेवळे (ता. नगर) येथे मोफत नेत्र तपासणी, मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबीर घेण्यात आले. या शिबीरात 452 रुग्णांची तपासणी करण्यात आली. शिबीरास ज्येष्ठ नागरिकांचा उत्सफुर्त प्रतिसाद लाभला. मोतीबिंदू शस्त्रक्रियेसाठी 74 रुग्णांची निवड करण्यात आली आहे. तर फाऊंडेशनने केलेल्या अवयवदानाच्या आवाहनाला प्रतिसाद देत 32 नागरिकांनी मरणोत्तर नेत्रदान करण्याचा संकल्प केला.
राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेस अभिवादन करुन या शिबीराचे उद्घाटन नगर तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष योगेश गुंड व सचिव दत्ता इंगळे यांच्या हस्ते झाले. यावेळी फिनिक्स फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष जालिंदर बोरुडे, जितेंद्र आढाव, वैभव दानवे, बाबासाहेब धीवर, किरण कवडे, सौरभ बोरुडे, तुषार मरकड, विठ्ठल राहिंज आदी उपस्थित होते.
   योगेश गुंड म्हणाले की, मुलांमध्ये शिवाजी महाराजांसारखे संस्कार घडविण्यासाठी राजमाता जिजाऊंच्या विचारांची गरज आहे. तर स्वामी विवेकानंदांच्या विचाराने सक्षम युवा पिढी निर्माण होणार आहे. विवेकानंदांनी मनुष्यरुपी ईश्वराची सेवा करण्याचा संदेश दिला. तर जिजाऊंनी रयतेला मुलांप्रमाणे जपण्याचे संस्कार शिवरायांमध्ये घडविले. आज कोरोना व महागाईच्या संकटामुळेअनेक गरजू आरोग्य सुविधेपासून वंचित आहे. मनुष्यरुपी सेवेतूनच ईश्वरसेवा करण्यासाठी फिनिक्स फाऊंडेशनेने सुरु केलेले सामाजिक कार्य प्रेरणादायी असल्याचे त्यांनी सांगितले. दत्ता इंगळे यांनी देखील फिनिक्स फाऊंडेशनने गरजू रुग्णांसाठी आरोग्य शिबीर घेऊन त्यांना आधार देण्याचे काम केले असल्याचे सांगितले.  
   जालिंदर बोरुडे म्हणाले की, समाजातील महापुरुषांनी वंचितांना नेहमीच आधार देण्याचे कार्य केले. त्यांचे कार्य आजही सर्व समाजाला दिशादर्शक व प्रेरणादायी आहे. त्यांचे आदर्श समोर ठेऊन समाजातील अनेक गरजू घटकांना आरोग्य सुविधा मिळण्यासाठी फिनिक्स फाऊंडेशन विविध मोफत आरोग्य शिबीर घेत आहे. तर काळाची गरज ओळखून अवयवदानाप्रती जनजागृती करण्यात येत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. गावातील संत सावता महाराज मंदिर येथे घेण्यात आलेल्या या शिबीरात रुग्णांची तपासणी करण्यात आली. तसेच गरजूंना अल्पदरात नंबरचे चष्मे देखील उपलब्ध करुन देण्यात आले होते. नगर तालुका पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी योगेश गुंड व सचिवपदी दत्ता इंगळे यांची निवड झाल्याबद्दल फिनिक्स फाऊंडेशनच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. शिबीर यशस्वी करण्यासाठी फाऊंडेशनचे सदस्य व नागरदेवळे ग्रामस्थांनी परिश्रम घेतले.

No comments:

Post a Comment