26 जानेवारीला अहमदनगरमध्ये ’ट्रॅक्टर तिरंगा रॅली’ - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Wednesday, January 20, 2021

26 जानेवारीला अहमदनगरमध्ये ’ट्रॅक्टर तिरंगा रॅली’

 26 जानेवारीला अहमदनगरमध्ये ’ट्रॅक्टर तिरंगा रॅली’

दिल्ली किसान आंदोलनाच्या सहभागासाठी अ.भा.किसान संघर्ष समन्वय समितीचा निर्णय.

नगरी दवंडी/प्रतिनिधी

अहमदनगर ः अहमदनगर येथील हमाल पंचायतच्या ऑफिसमध्ये अ.भा.किसान संघर्ष समन्वय समितीच्या आज झालेल्या बैठकीत 26 जानेवारीला अहमदनगरमध्ये ’ट्रॅक्टर तिरंगा रॅली’ काढण्याचा निर्णय घेण्यात आला.

दिल्ली येथे भारतभरातील शेतकरी संघटना आपल्या न्याय्य हक्कासाठी 26 नोव्हेंबर पासून आंदोलन करत आहेत. शेतकरी, कामगार व सर्वसामान्य भारतीयांच्याविरोधात असलेले आणि जागतिक भांडवलदारांच्या दबावाखाली केलेले तीन नवीन देशविरोधी कृषी कायदे रद्द करणे आणि कामगार, कर्मचारीविरोधी श्रमसंहितेलाला विरोध करण्यासाठी दिल्लीत आंदोलन सुरू आहे. सरकार देशप्रेमी अन्नदाता शेतक-यांचे ऐकायला तयार नाही. भारताच्या उज्ज्वल भविष्यासाठी हे जाचक कायदे रद्द झालेच पाहिजे. ही भूमिका व भावना देशभरातील लोकांची आहे.
   महाराष्ट्रातील शेतकरी कामगार संयुक्त मोर्चाची बैठक दि.12 जानेवारी रोजी मुंबई येथे पार पडली. त्यामधे 23 ते 26 जानेवारीला मुंबईत आझाद मैदान येथे महापडाव आणि ध्वजवंदन करण्याचे ठरवले आहे. ज्यांना तेथे जाणे शक्य नाही त्यांनी आपापल्या गावी, वाडी, वस्ती व शेतात आपल्या ट्रॅक्टरला तिरंगा लावून मी दिल्ली येथील शेतकरी आंदोलकांसोबत आहे. असे सरकारच्या निदर्शनास आणून द्यावे.
येथे आज झालेल्या बैठकीत  26 जानेवारी रोजी अहमदनगर जिल्ह्यात ठिकठिकाणी आणि अहमदनगर शहरात सकाळी 11 वाजता एसटी स्टँड येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून ट्रॅक्टर तिरंगा रॅलीची सुरूवात होईल. रॅलीचा मार्ग पुढे विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळा, चांदनी चौक, स्टेट बँक चौक, इदगाह मैदान, डीएसपी चौक आणि पत्रकार चौकातील शहीद भगतसिंह यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करत अभिवादन करून रॅलीची सांगता होईल.
  सदर बैठकीस राज्य कर्मचारी संघटनेचे नेते रावसाहेब निमसे, सुभाष तळेकर, भा.क.प.चे राज्य सहसचिव अ‍ॅड.कॉ.सुभाष लांडे, मा.क.प.चे कॉ.प्रा.डॉ.महेबुब सय्यद, हमाल पंचायतचे अध्यक्ष अविनाश घुले, विडीकामगार संघटनेचे अंबादास दौंड, अ.भा.किसानसभेचे अ‍ॅड.कॉ. बन्सी सातपुते, पीस फौंडेशनचे आर्कि.अर्शद शेख, ग्रामपंचायत आणि पतसंस्था कर्मचारी संघटनेचे अ‍ॅड.कॉ.सुधीर टोकेकर, कामगार संघटना महासंघाचे भैरवनाथ वाकळे आदी उपस्थित होते.
  अहमदनगर जवळपासच्या ट्रॅक्टरधारक शेतकरी बांधवांनी आपापल्या ट्रॅक्टरवर तिरंगा लावुन आपली जबाबदारी म्हणून या रॅलीत सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
   ज्यांना ट्रॅक्टरसह या रॅलीमधे सहभागी व्हायचे आहे त्यांनी अविनाश घुले - 9765161616, भैरवनाथ वाकळे 9405401800 या व्हॉट्सअ‍ॅप क्रमांकावर नोंदणी करावी. असे कॉ भैरवनाथ वाकळे यांनी कळविले आहे.

No comments:

Post a Comment