जिल्ह्यात एकूण 12 केंद्रांवर होणार आरोग्य कर्मचार्‍यांचे लसीकरण - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Saturday, January 16, 2021

जिल्ह्यात एकूण 12 केंद्रांवर होणार आरोग्य कर्मचार्‍यांचे लसीकरण

 जिल्ह्यात एकूण 12 केंद्रांवर होणार आरोग्य कर्मचार्‍यांचे लसीकरण

अहमदनगर जिल्हा कोरोना लसीकरण मोहिमेसाठी सज्ज


नगरी दवंडी/प्रतिनिधी
अहमदनगर ः कोरोना लसीकरण मोहिमेसाठी जिल्हा प्रशासन आणि आरोग्य यंत्रणा सज्ज झाली आहे. केंद्र आणि राज्य शासन आणि आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या निर्देशानुसार शनिवार, 16 जानेवारी रोजी ही मोहिम राबविण्यात येणार आहे. जिल्ह्यात एकूण 12 केंद्रांवर पहिल्या टप्प्यात ही मोहिम राबविण्यात येणार असून यात जिल्हा सामान्य रुग्णालय, जिल्ह्यातील आठ ग्रामीण रुग्णालये आणि महानगरपालिका क्षेत्रातील 4 नागरी आरोग्य केंद्रांचा समावेश आहे.

कोरोना लसीकरणासंदर्भातील सर्व तयारी आरोग्य विभागाने पूर्ण केली आहे. दिनांक 13 रोजी पुण्याहून लसीचे डोस योग्य त्या प्रोटोकॉलनुसार अहमदनगर येथे आणण्यात आले. तेथून जिल्हा परिषद येथे त्याची साठवणूक करण्यात येऊन दिनांक 14 रोजी या लसीचे वितरण संबंधित लसीकरण केंद्रांना करण्यात आल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुनील पोखरणा, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संदीप सांगळे आणि महानगरपालिका आरो्ग्य अधिकारी डॉ. अनिल बोरगे यांनी दिली.
दिनांक 16 जानेवारी रोजी जिल्हा सामान्य रुग्णालयासह उपजिल्हा रुग्णालय पाथर्डी, उपजिल्हा रुग्णालय कर्जत, शेवगाव ग्रामीण रुग्णालय, श्रीरामपूर ग्रामीण रुग्णालय, राहाता ग्रामीण रुग्णालय, संगमनेर ग्रामीण रुग्णालय, अकोले ग्रामीण रुग्णालय येथे लसीकरण मोहिम राबविण्यात येणार आहे. याचबरोबर, महानगरपालिका क्षेत्रातील तोफखाना नागरी आरोग्य केंद्र, जिजामाता नागरी आरोग्य केंद्र, केडगाव नागरी आरोग्य केंद्र आणि नागापूर नागरी आरोग्य केंद्र येथे ही मोहिम राबविण्यात येणार आहे.
लसीकरण मोहिमेची सर्व तयारी पूर्ण झाली आहे. संबंधित लसटोचक आणि पर्यवेक्षक यांचे प्रशिक्षणही पूर्ण झाले आहे. लसीकरण मोहिमेतील या पहिल्या टप्प्यात केवळ आरोग्य कर्मचार्यांना लस दिली जाणार आहे. या लसीकरण मोहिमेचा एक भाग म्हणून दिनांक आठ जानेवारी रोजी संपूर्ण राज्यात कोरोना लसीकरणासाठी सरावफेरी घेण्यात आली. त्यासंदर्भात राज्य शासन आणि आरोग्य विभागाने दिलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार अहमदनगर जिल्ह्यातही महानगरपालिका आणि ग्रामीण भागात या लसीकरण मोहिमेचे प्रात्यक्षिक झाले. महानगरपालिकेच्या तोफखाना नागरी आरोग्य केंद्र, वाळकी येथील प्राथमिक आरोग्य केंद्र आणि जिल्हा सामान्य रुग्णालय येथे ही सरावफेरी पार पडली होती.
जिल्हा सामान्य रुग्णालय येथे सकाळी या मोहिमेस प्रारंभ होईल. जिल्ह्यात 31 हजार 196 आरोग्य कर्मचार्यांची नोंद पोर्टलवर करण्यात आली आहे. त्यात सुरुवातीच्या टप्प्यात या 12 केंद्रांतर्गत येणार्या आरोगय कर्मचार्यांचे लसीकरण केले जाणार आहे. जिल्हयासाठी 39 हजार लशीचे डोस प्राप्त झाले आहेत. दरदिवशी 100 जणांना प्रत्येक केंद्रांवर लस दिली जाणार आहे.
लसीकरणासाठीचा प्रोटोकॉल ठरवून देण्यात आला असून सुरुवातीला पोर्टलवर नोंदणी केलेल्या आरोग्य कर्मचार्यांची ओळख पटविली जाईल. त्यानंतर त्यांना प्रतीक्षा कक्षात बसवले जाईल. तेथून प्रत्यक्ष लसीकरण केले जाईल.  नंतर लस दिलेल्या कर्मचार्यांना अर्धा तास विश्रांती घेण्यासाठी सांगितले जाईल.  कोणताच त्रास होत नाही, असे जाणवल्यावर त्यांना घरी सोडण्यात येईल.  

No comments:

Post a Comment